आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुक्मिणीबाई : दांभिक समाजाला सणसणीत चपराक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'उत्सव'च्या अखेरीला वसंतसेना पुन्हा आपल्या वेश्यालयाकडे परतली आणि तिनं नकोशा असलेल्या संस्थानकाला (पदच्युत राजाच्या मेहुण्याला) आपलं दार उघडून दिलं. तत्कालीन समाजातल्या वसंतसेनेच्या स्थानाच्या -हासाची सुरुवात झाली होती, त्याचंच ते द्योतक होतं. राजेशाह्यांच्या -हासाबरोबर कलावंतीण-तवायफ वर्गाला लाभणार्‍या राजाश्रयाला ओहोटी लागली. आणि या समाजाची उतरती कळा सुरू झाली. ब्रिटिश अमदानीत भारतीय समाजात नवी सामाजिक-नैतिक मूल्यं रुजू लागली.

या समाजाच्या आणि त्यांच्या कलेच्या पदरी हेटाळणीच केवळ येऊ लागली. आर्थिक विपन्नतेपायी आणि या हेटाळणीपायी संगीत-नृत्याची जोपासना करणं कठीण झालं आणि अर्थार्जनासाठी उरला तो हिडीस शरीरव्यापार. समाजाच्या मनातल्या तिरस्काराला आणखीनच खतपाणी मिळू लागलं. तरी ह्यआपण कलावंत' हा पीळही काहींचा गेला नाही. त्याला मग काहीसं बढाईचं रूप आलं. ते त्यांच्या हातातलं हत्यारही बनलं. सहानुभूती मिळवण्याचं साधनही बनलं. भारतीय लोकप्रिय चित्रपटांनी मात्र तवायफ समाजाच्या एकेकाळच्या कलावैभवाची आणि त्यांच्या आलीशान, प्रासादतुल्य कोठ्यांची ग्लॅमरस चित्रं रंगवून प्रेक्षकांना मनोरंजनाच्या गुंगीत ठेवण्याचाच परिपाठ कित्येक वर्षं राखला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या ह्यमंडी'नं प्रथमच या ग्लॅमरस झळाळत्या थाटाला थेट आडवा छेद दिला. ह्यमंडी'ची नायिका रुक्मिणीबाई (शबाना आझमी) आणि तिचा कोठा किंवा भरड शब्दात सांगायचं तर कुंटणखाना यांनी या जगाचं वास्तव प्रथमच प्रेक्षकापुढे मांडलं.

कलावंतीण-वेश्या परंपरेचे अवशेष आणि त्या अवशेषांचाही वेगाने -हास होत त्याला येणारं नवं हिडीस रूप असे दोन पदर रुक्मिणीबाईच्या कोठ्यावर पाहायला मिळतात. ह्यमंडी'तली मध्यमवयीन रुक्मिणी कोठा चालवते. ती स्वत: कधी काळी गात-नाचत होती की नाही, माहीत नाही. ती गुणगुणते त्यावरून तिला गाणारा गळा असावा, असं फारसं वाटत नाही. पण अर्थात वेळ पडताच ह्यहम लोगां कलाकार हैं, कलाओं में हमारी साँस बसती है... हुनर और मेहनत से कलाकार हैं हम, लेकिन किस्मत लाके इस कीचड में पटक दिए' म्हणून गळा काढते. एकीकडे तारुण्यात नुकतंच पदार्पण केलेली आणि गाण्याचं अंग असलेली तिची लाडकी लेक ज़ीनत (स्मिता पाटील) आहे. तिला तिनं उस्ताद वगैरे ठेवून शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताचं शिक्षण देववून तयार केलं आहे. ज़ीनत बैठकीच्या ठुमर्‍या गाते, लग्न समारंभांतून तिचं गाणं ठेवलं जाऊ लागलं आहे. तिच्या गाण्याची आणि तारुण्याची ख्याती पंचक्रोशीत पसरू लागली आहे. मात्र खानदानी तवायफ परंपरेनुसार रुक्मिणीबाई ज़ीनतचं कौमार्य डोळ्यात तेल घालून जपते आहे. तिची ह्यनथ उतरवण्या'ची चांगली किंमत येणं, हे त्यावर अवलंबून आहे.

दुसरीकडे रुक्मिणीबाईच्या कोठ्यावर बाहेरून आलेल्या-विकत घेऊन, फसवून आणून वेश्या व्यवसायाला लावलेल्या परवीना, नादिरा वगैरे मोठ्या आणि अनुभवी मुली आहेत. एक लेकुरवाळीदेखील (इला अरुण) आहे. तर एखादी फूलमणीसारखी फसवून आणली मुलगी आहे. श्रीकांत (एम. के. रैना)सारखे पुरुष गावातल्या मुलीला लग्न करून फसवून तिला रुक्मिणीच्या कोठ्यावर आणून विकतात. या मुली कलावंत वगैरे नाहीत. त्या शरीराचा सौदा करतात. या दोहोंच्या मधली फळी आहे, ती बसंती (नीना गुप्ता)ची. बसंती मुजरा नृत्य करते, आणि ज़ीनतच्या गाण्याबरोबरच तिचा मुजराही होतो, पण बसंती ही बाहेरून विकत घेतलेली मुलगी आहे. ती काही रुक्मिणीची लेक नाही. ती गि-हाइकंही घेते. ज़ीनतला माडीवरची खास स्वतंत्र खोली आहे. तशी बसंतीला नाही. ज़ीनतच्या गाण्याच्या रियाज़ासाठी साजिंदे येतात. आपल्यालाही रियाज़ करायचा आहे आणि साथ हवी आहे, म्हणून बसंती हट्ट करते, तेव्हा रुक्मिणी उदारपणे ह्यतुझा रियाज़ झाला की त्यांना खाली बसंतीकडे पाठवून दे हं' म्हणून ज़ीनतला ओरडून सांगते. बसंतीला ज़ीनतचा थोडा हेवाही वाटतो आणि रुक्मिणीची मर्जी संपादन करण्याचा जरासा प्रयत्नही ती करत असते.
कालच्या गि-हाइकानं परत ही बक्षिसी दिली' म्हणून अगदी प्रामाणिकपणे ती ते पैसे रुक्मिणीबाईकडे देऊ पाहते आणि रुक्मिणीबाई उदारपणे ह्यते ठेव तुला' म्हणते. कोणत्या मुलीशी कसं वागायचं, हे रुक्मिणीचे ठोकताळे ठरलेले आहेत. नवख्या आलेल्या, घाबरलेल्या फूलमणीला ती व्यवस्थित चुचकारते. नादिरा (सोनी राज़दान) तिला घाईनं आणि जबरदस्तीनं धंद्याला लावू पाहते, तेव्हा रुक्मिणी तिला रोखते, फूलमणीच्या कलानं घेते. तिला समजावते, ह्यह्यअब इसको कौन समझाए कि धोका इसको श्रीकांत ने दिया। हम लोगां ने नहीं। कटी पतंग की तरह ज़िंदगी होती है हम औरतों की।" पालुपदासारखं तिचं चालू होतं, ह्यह्यमैं कभी शिकायत नहीं करती। पर मेरेको भी धोका देके ले आया एक मरद। मेरा प्रेम सच्चा था, पर मेरा प्रेम ठुकरा के चला गया... रो मत बेटी, रो मत।"

कोठा चालवणार्‍या बाईला जबरदस्त मुत्सद्देगिरीची गरज असते, चिवट झुंज देण्याची ताकद असावी लागते, तिच्यात. इतकी की, चुकीच्या जागी पडली असं वाटावं. राजकारणात पडली असती तर विलक्षण यश मिळवलं असतं, असं रुक्मिणीला पाहून वाटल्याशिवाय राहात नाही. गि-हाइकाला भुलवण्यासाठी करावा लागला नसेल इतका विविध प्रकारचा अभिनय तिला कोठा चालवताना करावा लागतो आणि ती सगळी आव्हानं ती लीलया पेलते. हम है तो समाज है' असं वेळेप्रसंगी सुनावणारी रुक्मिणी म्हटलं तर तशी एकाकी आहे. बाहेरचा समाज तिच्या विरोधात आहे, कोठ्यावरच्या मुली कधी विद्रोह करतील त्याचा नेम नाही. ज़ीनतला जपताना नाकी नऊ येतंय. परंतु ती कौशल्यानं स्वत:ला एकटं पडू देत नाही, सगळ्यांशी मुत्सद्देगिरीनं वागते आणि जिंकते. ह्यहम हैं तो समाज है' असं वेळप्रसंगी सुनावणारी रुक्मिणी ओळखून आहे की समाजातल्या या सगळ्याच घटकांना आपली गरज आहे आणि तिचा वापर कसा करायचा हेही तिला चांगलंच ठाऊक आहे.

पुरातनपल्लीच्या भर वस्तीत तिचा कोठा आहे. गुप्ता (कुलभूषण खरबंदा) या बिझिनेसमननं नुकतंच ते घर मूळ मालकाकडून - शाकिरभाईकडून - खरेदी केलंय. गुप्ता हा जमिनीचे व्यवहार करणारा पक्का व्यापारी आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याने गावाबाहेरची दोन लाखाची एक पडीक जमीन केवळ पस्तीस हजारात विकत घेतली आहे. त्यानं या पडीक जमिनीचं भविष्य हेरलेलं आहे. हाच गुप्ता आता रुक्मिणीबाई राहते त्या घराचा नवा मालक झाला आहे. हा नवा मालक आपल्याला घर खाली करायला लावतो की काय, ही नवी भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी हा नवा मालक घर बघायला येतो, तेव्हा रुक्मिणी कौशल्यानं तो धोका टाळते. नेमकं त्याच वेळी, तिच्या दुर्दैवानं फूलमणी पळून जायचा प्रयत्न करते, तिला पकडताना एकच गोंधळ माजतो. तरी रुक्मिणी लगेचच बाजू सावरून घेत म्हणते, ह्यह्यगुप्ताजी, आजके हंगामे के वास्ते माफी चाहती हूँ। अब बदकिस्मती का क्या करें? हुनर और मेहनत से कलाकार हैं हम। लेकिन किस्मत लाके इस कीचड में पटक दिए।" गुप्ता रुक्मिणीला तिथे राहू देतो. त्यात त्याचा स्वार्थ आहेच. लवकरच आमच्याकडे तुमची मैफल होणार असल्याचंही तो तिला सांगतो. रुमिणीला आठवतं, लवकरच अगरवाल (सईद जाफरी) आणि गुप्ताजी व्याही होणार असतात. अर्थातच तिला ते अगरवालकडून कळलेलं असतं. अगरवालशी संबंध जुने असतात! घराचा एक प्रश्न मिटतो.

पण म्युनिसिपल कमिटीची मेंबर, समाज कार्यकर्ती आणि ह्यनारी निकेतन'ची संचालिका शांतिदेवी (गीता सिद्धार्थ) ही भर वस्तीतला रुक्मिणीबाईचा कोठा तिथून हलवलाच पाहिजे, वस्तीची नैतिकता सांभाळलीच पाहिजे, म्हणून आग्रह धरते. ह्यवेश्यावृत्ती हटाओ, नगर बचाओ' अशा घोषणा देत ती रुक्मिणीच्या घरावर मोर्चा घेऊन जाते. कोठ्यावरच्या मुली अस्वस्थ होतात, चिडतात, ह्यगंदा काम छोड़ दो' म्हणणार्‍या शांतिदेवीला ह्यऔर रोटी कहाँ से खाएँगे?' म्हणून विचारतात. रुक्मिणी मात्र शांत असते. काही एक बेत तिनं आखलेला असतो. ती शांतिदेवीला आत येऊ द्या म्हणते. खानदानी स्त्रीप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन शांतिदेवीचं स्वागत करते. नुकतीच ती एकादशीनिमित्त देवळात जाऊन आलेली असते, तो एकादशीचा प्रसाद शांतिदेवीला आणि तिच्या साथीदारणींना देते.

प्रसाद म्हटल्यावर शांतिदेवीचा नाइलाज होतो. असं एकेक पाऊल उचलत रुक्मिणी शांतिदेवीला नामोहरमच करते. कोठ्यावर कुणा तरी मुलीला जबरदस्तीनं आणून डांबून ठेवलंय, असं शांतिदेवीला कळलेलं असतं. ती तलाशी घ्यायचं म्हणते. त्यावर रुक्मिणी अगदी सहजपणे वाटावं अशी अनुमतीही देते आणि मग हळूच पुढे जोडते, "हालाँकि बगैर वॉरंट के ऐसा काम करना गैरकानूनी है' आणि शांतिदेवीचे दात तिच्याच घशात घालते. शांतिदेवी बढाईखोरपणे, ह्यमी म्युनिसिपल कमिटी मेंबर असून नारी निकेतन चालवते, तुम्हाला घर खाली करायला लावीन' वगैरे सांगत तिला घाबरवू पाहते; तर रुक्मिणी लगेचच मधाळपणे त्याचा उपयोग करून घेते, बहुत पुण्य का काम करते शांतिदेवी। वर्ना दुनिया की निगाहों में गिरी हुई, बेबस, बेघर औरतों की फिक्र कौन करता है? शांतिदेवी, नारी निकेतन के वास्ते मैं कुछ मदद करना चाहूँगी।" आम्ही लाच घेत नाही, असं बाणेदारपणे म्हणणार्‍या शांतिदेवीला ती शांतपणे म्हणते, ह्यह्यमैं चोर नहीं, आप हवालदार नहीं। आपको घूस कायको देने लगी?" - ती एका दगडात दोन पक्षी मारून टाकते. शांतिदेवीकडे एव्हाना काही युक्तिवाद उरलेला नाही. त्यामुळे ती परत तेच टुमणं लावते, ह्यह्यतुम्हाला हा धंदा बंद करावा लागेल. आता मैदान रुक्मिणीच्या हातात असतं, ह्यह्यधंदा? हम लोगां कलाकार हैं। कलाओं में हमारी साँस बसती है। कल को आप बोलेंगे साँस लेना बंद कर दो, तो क्या हम बंद कर देंगे?" एवढं सगळं होता होता शांतिदेवीचाच एक कार्यकर्ता एका वेश्येच्या खोलीत शिरताना पकडला जातो आणि रुक्मिणी परिस्थितीवर स्वारच होते.

ती उदारपणे हवालदाराला त्याला सोडून द्यायला सांगते. म्हणते, ह्यह्यजाने दो न, शांतिदेवी का नाम बदनाम हो जाएगा." शांतिदेवी पुरती नामोहरम होऊन जाऊ लागते, तेव्हा "नारी निकेतन के नाम चेक ज़रूर भिजवा दूँगी" म्हणून तिच्या जखमेवर मीठ चोळून रुक्मिणी आपली करमणूक करून घेते. शांतिदेवीच्या दांभिकतेचा जबाब ती आपल्या मुत्सद्देगिरीनं देते. शांतिदेवी गेल्यावर मात्र तिची आतली खदखद व्यक्त होते, ह्यह्यबड़ी आयी नारी निकेतनवाली. अपने दामाद के साथ इश्क लड़ाती, क्या हमको नहीं मालूम?" रुक्मिणी प्रतिष्ठित समाजाच्या दांभिकपणावर वेळोवेळी नेमकं बोट ठेवते. एवढी काळजी वाटते तर आपल्या पुरुषांना बांधून ठेवावं घरात, असा बिनतोड युक्तिवाद आहे तिचा. (कुणाला आर. आर. पाटलांच्या बारबाला प्रकरणाची आठवण झाली तर नवल नको.)

गुप्ताजींची मुलगी आणि अगरवालचा मुलगा सुशील यांच्या साखरपुड्याच्या प्रसंगी गुप्ताजींच्या घरी ज़ीनतचं गाणं आणि बसंतीचा मुजरा होतो. तिथे नेमकी निमंत्रित म्हणून आलेली शांतिदेवी रुक्मिणीच्या आयतीच तावडीत सापडते. रुक्मिणी संधी सोडत नाही. कलाप्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल गुप्ता आणि अगरवाल यांचे आभार मानताना ती शैलीदार भाषण करते आणि खुबीनं विषय शांतिदेवीकडे वळवत तिचे वाभाडे काढते. ह्यह्यआपकी कदरदानी हमारी हौसलाअफजाई करती है, लेकिन कुछ बेसुरे, बेताले हैं जो हमें हमारे अपने शहर से निकाल बाहर कर देने की धमकी दे रहे हैं। अब जिनमें सुर-ताल की समझ नहीं उनकी नासमझी का क्या रोना रोएँ?" ह्यपोलिटिकली करेक्ट' वेळ कशी साधायची ते रुक्मिणीला चांगलंच अवगत आहे. संकटातही ह्यपोलिटिकली करेक्ट' वेळ साधणं तिला चांगलं जमतं.

फूलमणी आत्महत्येचा प्रयत्न करते, तेव्हा सगळ्या मुलींसकट रुक्मिणीला पोलिस व्हॅनमध्ये जाऊन बसायची नामुष्की पत्करावी लागते. फूलमणीची रवानगी अर्थातच नारी निकेतनमध्ये होते. शांतिदेवीला कोलीत सापडतं. त्या जोरावर शांतीदेवी म्युनिसिपल कमिटीत अगरवालवर कडी करते. रुक्मिणीला घर खाली करायला लावण्याचा ठराव मंजूर होतो. आता ठरावावर सही केली नाही आणि ती जागा डेव्हलप करण्याचं टेंडर गुप्ताजींना नाही मिळालं, तर गुप्ताजींबरोबरची अगरवालची सोयरीक होता होता तुटणार असते आणि गहाण ठेवलेलं घर जाणार असतं. अगरवाल पुन्हा एकदा रुक्मिणीपुढे पदर पसरतो. आधीच तो रुक्मिणीच्या उपकाराखाली असतो! रुक्मिणी उपकाराचं आणखी एक ओझं त्याच्या डोक्यावर चढवत ह्यआप पर आँच नहीं आने दूँगी' म्हणून वचन देते, पण बदल्यात फूलमणीचं प्रकरण परस्पर निस्तरण्याचं वचनही घेते.

घर खाली करायची नोटीस लागते. घरमालक गुप्ता येतो, तेव्हा पुन्हा एकदा रुक्मिणीच्या मुत्सद्देगिरीचं विलोभनीय दर्शन घडतं! सगळ्या मुलींना छान नाटक वठवायला लावून आणि स्वत:ही नाटक करून गुप्ताकडून त्याच्या पडीक जमिनीत कोठा बांधायचं दुकान थाटायचं आणि बससेवा सुरू करण्याचं आश्वासन ती घेते. ज्या ठामपणे सुरुवातीला गुप्तानं पडीक जमिनीचा सौदा आपल्या मनाप्रमाणे करून घेतलेला असतो, त्याच ठामपणे आता रुक्मिणी गुप्ताकडून नुकसानभरपाईची रक्कम वाढवून घेते. पडीक जमिनीत, गावाबाहेर कोण येणार? यावर गुप्ता तिथे दुकानं थाटायचं, नियमित बस सेवा सुरू करून देण्याचं आश्वासन देतो.

'रुक्मिणी जिथे जाईल तिथे लक्ष्मी येईल' हे गुप्ताचं वचन रुक्मिणीची मनधरणी करण्यासाठी असलं तरी त्यात तथ्य आहेच. ते आपलं सामर्थ्य तिनंही चांगलंच ओळखलेलं आहे. रुक्मिणी पडीक जमिनीतल्या पडक्या घरात आपला बारदाना हलवते, पडक्या घराची डागडुजी सुरू करते. गावाबाहेर इथे गि-हाइकं कशी येणार, हा प्रश्न अजून असतोच. इतर कामं करायला लागल्यामुळे मुलीही बंडाची भाषा बोलू लागलेल्या असतात. ज़ीनतच्या प्रेमप्रकरणाची नवी काळजी कुरतडू लागलेली असते. अशा वेळी नवी संधी येते. कुणा बाबा खडकशहाची कबर तिथं असल्याचा शोध तिला लागतो. पाहता पाहता रुक्मिणीच्या कोठ्याबरोबरच बाबा खडकशहाचा दर्गा गुप्ताच्या मदतीनं उभा राहतो, तीर्थक्षेत्र बनतं, भक्तांची रीघ लागते आणि रुक्मिणीच्या कोठ्यावर गि-हाइकांचीही!

या समाजातल्या स्त्रियांचं एक वैशिष्ट्य असतं. प्रतिष्ठित समाजानं त्यांच्याकडे राखायला दिलेली गुपितं त्या प्राणपणानं जपतात आणि पर्यायानं प्रतिष्ठित घरांची प्रतिष्ठाही जपतात. रुक्मिणीनंही अगरवालची प्रतिष्ठा अशीच जपली आहे. अगदी नाइलाज होतो तेव्हाच, म्हणजे आता तिथेही अगरवालच्याच प्रतिष्ठेची धूळधाण होणार असते, तेव्हाच, ती ज़ीनतजवळ ते गुपित उघड करते. ज़ीनत आणि अगरवालचा मुलगा सुशील प्रेमात पडले आहेत. ज़ीनतला समजावून, धमकावूनही उपयोग होत नाही, सुशीलला हाकलूनही उपयोग होत नाही. अखेर रुक्मिणी ज़ीनतपुढे गुपित उघड करते, की सुशील तुझा भाऊ आहे. ज़ीनत ही कुणा रेहानाबेगम या गाणार्‍या तवायफला अगरवालपासून झालेली मुलगी. ज़ीनतला जन्माला घालून रेहानाबेगम पैगम्बरवासी झाली आणि अगरवालने ज़ीनतला रुक्मिणीबाईच्या ओटीत घातलं. रुक्मिणीनं आपल्या पोटच्या मुलीसारखं तिला वाढवलं, तिला तिच्या आईकडून उपजत मिळालेल्या गळ्याची मशागत केली, तिची कला जोपासली, इतर वेश्यांहून तिला वेगळं कलावंत तवायफचं स्थान दिलं. आणि अगरवालचं गुपितही जपलं.

वैफल्यग्रस्त ज़ीनत कायमची निघून जाते आणि रुक्मिणीवर आभाळच कोसळतं. तिच्या म्हातारपणचा आधार जातो, तिच्या मनाची कूस रिकामी होते. कोठ्यावरचं वातावरणही पहिलं राहिलेलं नसतं. तिच्या तुटलेपणाचा मुहूर्त नादिरा साधते. नादिरा, परवीना ऐकेनाशा होतात, कोठा त्या काबीज करतात, बसंतीला रामगोपाल फोटोग्राफर (ओम पुरी) मुंबईला नेऊन फिल्मस्टार बनवायचं स्वप्न दाखवत असतो. नाराज रुक्मिणी ह्यमी कोठा सोडून निघून जाते' म्हणून म्हणते, निघते; पण कुणीच पूर्वीप्रमाणे तिच्याबरोबर निघायची तयारी दाखवत नाहीत, की तिला थांबवत नाहीत. नाही म्हणायला कोठ्यावरच जन्मलेला मुलगा असल्यामुळे ज्याला ना कोठ्यावर भविष्य ना समाजात भविष्य असा टुंगरूसच (नसीरुद्दीन शाह) काय तो या आपल्या अन्नदात्री, आश्रयदात्रीमागोमाग मूक निष्ठेनं निघतो.

निर्जनातून निराश, हताश मनानं चालता चालता ओढ्याकाठी दोघांना चक्क शिवलिंग सापडतं! आणि रुक्मिणीची विजिगीषा पुन्हा जागी होते. बाबा खडकशहानं केला तसा चमत्कार आता शिवलिंग करणार असतं! नव्हे, बाबा खडकशहाला हाताशी धरून रुक्मिणीनं बरकतीचा धंदा उभारण्याचा चमत्कार करून दाखवला होता, तसाच आता या निर्जनात शिवलिंगाचा वापर करून ती करून दाखवणार असते. धर्मनिरपेक्षता हे रुक्मिणीच्या समाजाचं आणखी एक वैशिष्ट्य! ती देवपूजा करते, एकादशी करते आणि तिची लेक ज़ीनत असते; तिच्या घरात नादिरा, परवीना आणि बसंती एकत्र नांदत असतात, तिच्या कोठ्यावर येणार्‍यांमध्ये दोन्ही धर्मांचे लोक असतात, तिला बाबा खडकशहा आणि शिवलिंग दोघेही सारखेच प्रिय असतात. कारण हे दोघेही तिला धर्मनिरपेक्षपणे धंद्यात बरकत देणारे असतात. त्यांचा वापर करता येतो हे शहाणपण आणि तो वापर करण्याचं कौशल्य मात्र केवळ तिचंच. बाबा खडकशहा आणि शिवलिंग निमित्तमात्र!... शिवलिंग सापडतं आणि तेवढ्यातच नारी निकेतनमधून पळालेली फूलमणी धावत रुक्मिणीच्या आश्रयाला येताना दिसते. शांतिदेवीचा पुन्हा एकदा पराभव झालेला असतो, तिचं प्रतिष्ठित पितळ उघडं झालेलं असतं आणि रुक्मिणीबाईच्या कोठ्याच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झालेला असतो.

कोणतीही ह्यरुक्मिणीबाई' म्हणजे दांभिक समाजाच्या नैतिकतेला लगावून दिलेली सणसणीत चपराक असते. रुक्मिणीच्या आदिम व्यवसायाला मरण नसतं. समाजाच्या संस्कृतीचं वस्त्र बदललं तरी ते आादिम तत्त्व तेच राहणार असतं.

रेखा देशपांडे
8 , ए, महावीर दर्शन, श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे - 400604