आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलुगू-मराठी भाषेतील अनुबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात सार्‍या देशभर खळबळ उठवणारी घटना सोलापूरला घडली. तीन गोर्‍या सोजिरांना मंगळवार पेठ पोलिस चौकीत जिवंत जाळल्याने सोलापूरच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांची दहशत त्या वेळच्या इंग्रजांवर बसली अणि सोलापूरची ‘इंग्रज शासन यंत्रणा’ कोलमडली. सोलापूरचे सारे गोरे अधिकारी जीव मुठीत घेऊन सोलापूर सोडून पळून गेले. या वेळी तीन दिवस भारताच्या आधी, सोलापूरने आपला तिरंगी झेंडा फडकावून स्वातंत्र्य भोगले. याचा राग मनात धरून इंग्रजांविरुद्धचा जनतेचा क्षोभ निपटून काढण्यासाठी आणि सरकारचा वचक बसवण्यासाठी सोलापुरात ‘मार्शल लॉ’ पुकारला गेला. इंग्रजांनी भर रस्त्यावरून जीपगाड्यांवरून धावत, जनतेवर सुसाट गोळीबार केला. यात शेकडो लोक मेले. यात तेलुगू विणकर नरसय्या त्यारला याचेही बलिदान लक्षवेधी ठरले.

या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, किसन वीर ही मंडळी जनतेला जागृत करण्याकामी अग्रेसर होती. जेव्हा जेव्हा ही मंडळी भूमिगत व्हायची, त्या त्या वेळी ते सोलापूरचे देशभक्त मल्लप्पण्णा पुल्ली यांच्या तळघरात लपून असायचे. इंग्रजांचा संशय पुल्ली या तेलुगू देशभक्तावर होता. पुल्ली यांनी इंग्रजी सोजिरांना स्वातंत्र्ययोद्ध्यांचा पत्ता शेवटपर्यंत लागू दिला नाही. याच वेळी सोलापूरला फार मोठे तेलुगू क्रांतिकारक नागप्पा नारा होऊन गेले. त्यांना इंग्रजांनी अटक करून सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा दिली. त्यानंतर त्यांनी गुजरातला जाऊन लष्कराकरिता ज्या ज्या कापड गिरण्यांमार्फत कापड पुरवले जायचे, त्या त्या गिरण्यांना आगी लावण्याचे धाडस केले. एवढेच नव्हे, तर लष्करासाठी कापड पाठवल्या जाणार्‍या रेल्वे गाड्या बॉम्बफेकीने उडवून द्यायचा कटही त्यांनी केला होता.
मिठाच्या सत्याग्रहात गांधीजींसमवेत सहभागी होण्यासाठी एक तेलुगू विणकर तेथे गेला. गांधीजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून आपुलकीने चौकशी केली. गांधीजींचा तो स्पर्श जपण्यासाठी त्याने तो आपला शर्ट शेवटपर्यंत जपून ठेवला.

सांस्कृतिक बंध

‘तेलुगू’ हा शब्द ‘तेनुगू’ या मूळ शब्दाचा अपभ्रंश आहे. तेनुगू या शब्दाची फोड केल्यास ‘तेने+ अगू’ असे शब्द तयार होतात. तेने म्हणजे मध आणि अगू म्हणजे प्रमाणे. एकंदरीत ‘मधासम जी भाषा आहे, ती तेलुगू भाषा होय.’ ‘तेलुगू’ हा उकारान्ती शब्द आहे. तेलुगू या तीन अक्षरांत दोन अक्षरे उकारान्ती आहेत. या भाषेत सुमारे 90 टक्के शब्द उकारान्तीच आहेत. उदाहरणार्थ, कालु, मुक्कु, पुखु, नखु, पालु, निळ्ळु वगैरै. ही तेलुगू उकारान्ती भाषा थेट आपल्या ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषेची आठवण देते.

‘देवा तूची गणेशु। सकलार्थ मती प्रकाशु
म्हणे निवृत्तीदासु। अवधारिजोजी।’

यात गणेशु, प्रकाशु, निवृत्तीदासु हे सारे शब्द उकारान्तीच आहेत. याप्रमाणे वलु, चंद्रु असे अनेक शब्द ज्ञानेश्वरीत सापडतात. एवढेच काय, आतासुद्धा काळू, बाळू हे शब्द आपण वापरतोच.
आता भाषेबद्दल बोलतोच आहोत तर अजून एक बाब येथे उद्धृत करणे उचित वाटते. इ.स. 1130मध्ये तेलंगणातल्या पालकुर्की गावात पालकुर्मी सोमनाथ नावाचा फार मोठा तेलुगू पंडित होऊन गेला. हा अष्टभाषा प्रवीण होता. त्याने आपल्या तेलुगू चरित्र ग्रंथात, पर्वत प्रकरणात, 220 पानांवर, 22 ओळींची मराठी रचना लिहिली आहे.

(लिपी तेलुगू, भाषा मराठी) ती अशी-
‘मागे रहो नको मझु बाप म्हणता
भागवते वटे भक्त ते म्हणता
चरलिंग गुरुलिंग शंभु तो म्हणता
पूरवर किती दूर हर हो ते म्हणता
मग मरहाटाचा महादेवु अमुचा
गगन राणा अमुचा, सुखदेवु अमुचा’

याचप्रमाणे 15व्या शतकात होऊन गेलेला तेलुगू श्रीनाथ कवी यानेसुद्धा आपल्या काव्यातून मराठीच्या लावण्याची महती गायली आहे. त्यानंतरच्या नाचनी सोमनाथ या कवीने आपल्या ‘उत्तर हरिवंश’ या ग्रंथात श्रीकृष्णाच्या ओठी काही मराठीचे संवाद उद््धृत केले आहेत. लोकमान्य टिळक जेव्हा जेव्हा तुरुंगात जायचे त्या वेळी केसरीमधले अग्रलेख ‘कोमरगिरी लक्ष्मणराव’ नावाचे तेलुगू पंडित लिहीत असत. भारताचे माजी पंतप्रधान
कै. पी. व्ही. नरसिंह राव हे मराठीतले गाढे पंडित होते. त्यांनी मराठीतली प्रख्यात कादंबरी ‘पण लक्षात घेतो कोण?’ ही तेलुगूत अनुवादली.

सोलापूर मुक्कामी एका तेलुगू संताच्या स्मरणार्थ ‘शुभराय गॅलरी’ नावाचे सांस्कृतिक भवन आहे. वास्तविक त्यांचे मूळ नाव सुब्बरायुडू असे होते. पण मराठी लोकांनी त्यांना शुभराय केले. तेलुगू-मराठीचा अनुबंध सांगताना तेलुगू-मराठी लोकसाहित्य, ललित साहित्य, लोककथा, लोककलावंत, संतसाहित्य, प्राचीन साहित्य याचा मी विस्ताराने धांडोळा घेतला. त्या पुस्तकाचे शीर्षक ‘तेलुगू फुलांचा मराठी सुगंध’ असा आहे. 2005मध्ये तेलुगू मराठीच्या तौलनिक अभ्यासाबद्दल हैदराबाद येथील पोट्टिश्रीरामुलु तेलुगू विद्यापीठाने मला डी. लिट्. ही पदवी बहाल केली.

तेलुगू व मराठी या दोन भाषा व भाषकांच्या दरम्यान जे सांस्कृतिक आदानप्रदान होत आले आहे त्याचा फायदा दोन्ही बाजूंनाही झालेला आहे. त्यातून जी परस्परस्नेह व अनुबंधांची संस्कृती तयार झाली त्यामुळे भारतातल्या विविधतेत एकता निर्माण होण्यास हातभारच लागलेला आहे. दोन्ही भाषांतील साहित्यकृतींनी भारतीय साहित्यात मोलाची भर घातली आहे. या भाषिक आदानप्रदानातूनच बहुभाषकांचा सन्मान राखण्याची वृत्तीही दोन्ही राज्यांत वाढीला लागली.