आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाती रक्ताची की......

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारताच्या शांतिपर्वात पितामह भीष्मांनी पुत्रांचे चार प्रकार सांगितले आहेत. पहिल्या प्रकारचा पुत्र पित्याची इच्छा समजून घेऊन त्यांच्या सांगण्यावाचून त्या प्रकारचे आचरण करतो. दुसरा पित्याने इच्छा प्रकट केल्यावर त्यानुसार वागतो. तिसरा वडिलांनी सांगितल्यावरही तसे वागत नाही आणि पित्याने पुन्हापुन्हा सांगूनही ज्याचे आचरण त्याच्या विपरीत-विरुद्ध असते हा पुत्राचा चौथा प्रकार!


ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:लाच एक प्रश्न विचारायला हवा. आपण तरुण होतो त्या वेळी आपलं ज्येष्ठ नागरिकांबरोबरचं वर्तन कसं होतं? मातापित्यांची इच्छाही त्यांच्या काळानं त्यांना जे शिकवलं असतं त्याला अनुसरून असते. 70-75 वर्षांपूर्वी पालकांची इच्छा असे की मुलानं मॅट्रिक झाल्याबरोबर नोकरीला लागावं आणि वेळच्या वेळी लग्न करून संसाराला लागावं. कारण त्या काळात पन्नाशीचा माणूस आयुष्याच्या उतरणीला लागला असं मानलं जायचं. कौटुंबिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं मुलगा चार पैसे मिळवायला लागला, घरात सून आली म्हणजे वृद्ध आईबाप मरायला मोकळे! मात्र याच वेळी मुलगा आपल्या कारकीर्दीचा-जीवनाचा दूरदृष्टीनं विचार करत असणंही शक्य आहे. काळ बदलतोय, शिक्षणाचा व्याप वाढतोय, अर्थकारणाचे प्रवाह असे आहेत की आता बेताच्या मिळकतीवर समाधान मानता येणार नाही. मुलाला हे सगळं दिसतंय, इतकंच नव्हे तर वडिलांचं दारिद्र्य त्याने पाहिलं आहे. त्यामुळे त्यालाही जेमतेम पगाराची नोकरी करून तसलंच आयुष्य जगायचं नाहीये. दोन्ही पक्षांचं कमीअधिक प्रमाणात बरोबर आहे. अनेक तरुण आहेत ज्यांनी वडिलांच्या इच्छेचा अनादर करून आपल्या पद्धतीनं जगण्यासाठी घर सोडलं होतं. ते ब-यापैकी शिकले, चांगला पैसा मिळवला, त्यांची लग्नं झाली, त्यातले काही परदेशात स्थायिकही झाले. मात्र आईवडील हे पाहायला जगले नाहीत आणि गरिबीतच त्यांना मृत्यू आला. याउलट अनेक तरुण आहेत, ज्यांनी आईवडिलांची इच्छा प्रमाण मानून शिक्षण थांबवलं, नोकरीला लागले, लग्न केलं आणि काही वर्षांनी त्यांच्या जीवनालाही स्थैर्य आलं, त्यामुळे तर्क-वितर्क दोन्ही बाजूंनी करता येतील. मूळ मुद्दा समजूतदारपणाचा आहे.
वनवासात असताना अर्जुन शस्त्रप्राप्तीसाठी हिमालयात जातो त्या वेळी त्याचं शुभचिंतन करताना द्रौपदीनं म्हटलंय, ‘‘हे अर्जुना, तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या मातेनं तुझ्याबद्दल ज्या काही अपेक्षा उरात धरल्या असतील त्या सर्व तू पूर्ण कर’’ द्रौपदीचे हे बोल अद््भुत आहेत. पुत्रधर्माचा सर्वोच्च आदर्श इथे मोजक्या शब्दांत तिने व्यक्त केला आहे. हे शब्द म्हणजे केवळ सुविचार नव्हे, हा शाश्वत परमधर्म आहे. काही वेळा मातापित्यांच्या अपेक्षा संकुचित आणि स्वार्थप्रेरित असल्या तरी त्यात आपल्या अपत्यांच्या कल्याणाची कामना असतेच. आईवडिलांनी आपल्या अपेक्षा जरुर व्यक्त कराव्यात, पण त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरू नये.


इथे एक स्वानुभव सांगावासा वाटतो.
वडिलांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत मी त्यांच्या वागण्या-बोलण्याशी सहमत नसे. अशा वेळी अगदी दीनवाण्या स्वरात ते म्हणत, पुन्हा ही वेळ येणार नाही. माझं चुकत असलं तरी मला हे आवडतंय. आता तुम्हाला कुठे फार काळ माझ्या आवडीनिवडीप्रमाणे करायचंय? आजचे तर्क लढवणारे चतुर तरुण याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणतील. पण हे अर्धसत्य आहे. हे सगळं इमोशन्सच्याच पातळीवर राहायला हवं. त्यासाठी ब्लॅकमेलसारखे सवंग शब्द वापरू नयेत.


लेखाच्या सुरुवातीला आलेल्या शांतिपर्वातील प्रसंगात फक्त पुत्रांचे प्रकार सांगितले आहेत. मुलींचा उल्लेख नाही. नव्या कायद्याने आईवडिलांच्या भरणपोषणाची जबाबदारी मुलींवरही टाकण्यात आली आहे. माझ्या एका वकील मित्राला ऐंशीच्या घरातल्या वृद्धानं आपली कहाणी ऐकवली होती. गृहस्थांची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. पत्नीचं निधन झालं होतं. तिन्ही मुली सासरी सुखानं नांदत होता. वयाच्या 75व्या वर्षी गृहस्थांच्या मनात आलं की सांसारिक गोष्टीतून बाजूला होऊन उरलेली वर्षं हरिद्वारसारख्या ठिकाणी राहून आध्यात्मिक विषयात मन गुंतवावं. मालमत्ता त्यांनी तिन्ही मुलींत विभागून टाकली. विवक्षित रक्कम स्वत:पाशी ठेवून शहराला रामराम ठोकला. वानप्रस्थाश्रम स्वीकारला. गंगेच्या काठावर ते राहिले पण त्यांचं मन रमलं नाही. आता इथे राहण्यापेक्षा आपण गावी परत जावं आणि प्रत्येक मुलीबरोबर थोडा थोडा काळ राहावं असा विचार करून गृहस्थ पर आले. थोड्या दिवसांत त्यांच्या लक्षात आलं की आपलं परत येणं कुणालाच फारसं रुचलेलं नाही. तिघींनीही सुरुवातीला पित्याचं स्वागत केलं, पण हळूहळू जागेची टंचाई, व्यावहारिक कामाचं ओझं, सुट्टी असताना प्रवासाला जाणं अशी सगळी कारणं पुढे येत राहिली. त्यातून पित्याला मिळणारा संदेश असा की त्यांचं फार काळ आपल्याकडे राहणं गैरसोयीचं आणि म्हणून स्वागतार्ह नव्हतं.


या पित्यानं माझ्या वकील मित्राकडे कायदेशीर सल्ला मागितला. मुलींना दिलेली मालमत्ता परत कशी मिळवता येईल हा प्रश्न होता. वकिलाने सल्ला दिला की यातून केवळ वैरभावनेची तृप्ती होईल. त्यांचा अहम् कदाचित सुखावेल पण माणुसकी संपेल. शिवाय या सगळ्या भानगडींचं कायदेशीर निराकरण होईपर्यंत कदाचित त्यांचं स्वत:चं आयुष्य समाप्त होईल. यापेक्षा एखाद्या वृद्धाश्रमात राहावं हे शहाणपणाच. वृद्धाश्रमात राहता येईल एवढी रक्कम आजही त्यांच्यापाशी होती.

(क्रमश:)
अनुवाद : डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर