Home »Magazine »Divya Education» Religion And Education

सरकार धर्म आणि शिक्षण

हेरंब कुलकर्णी | Feb 20, 2013, 00:29 AM IST

  • सरकार धर्म आणि शिक्षण


संघटित धर्म आणि सरकारची शिक्षणातील मक्तेदारी यावर कृष्णमूर्ती प्रहार करतात.शिवाय या दोहोंचे धारदार विश्लेषण कृष्णमूर्ती करतात. शिक्षणव्यवस्थेचे आपण कितीही उदात्तीकरण केले तरीही एक गोष्ट अगदीच स्पष्ट आहे की, कोणत्याही सरकारला त्या सरकारच्या विचारसरणीच्या अंमलबजावणीसाठीच शिक्षणव्यवस्था राबवायची असते. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेने त्या विचारसरणीला अनुकूल असे ‘पपेट्स’ बनवावेत, अशी त्या व्यवस्थेची अपेक्षा असते. शिक्षणव्यवस्थेने त्या व्यवस्थेला आव्हान देईल, असे नागरिक केले तर ते बंड करून ती व्यवस्था उधळून लावतील. तेव्हा हीच व्यवस्था पुढे चालू राहावी म्हणून त्या विचारसरणीचाच प्रसार ती शिक्षणव्यवस्था करत असते. कम्युनिस्ट देशात कम्युनिझमच कसा चांगला हेच ठसविले जाणार आणि भांडवली देशात भांडवली मूल्येच मुलांवर थोपण्याचा ती शिक्षणव्यवस्था प्रयत्न करणार. मुस्लिम शासित देशात धार्मिकता प्रधान शिक्षण असणार. लोकशाही देशात तीच मूल्ये रुजविणार. एकदा कृष्णजींचा वरील मुद्दा लक्षात आला की देशोदेशींच्या शिक्षणप्रक्रियेचे वेगळेपण आपल्याला उलगडत जाऊ लागते.

आणि म्हणून ते म्हणतात की सरकारांना माणसे नकोत तर कुशल तंत्रज्ञ हवेत. सरकार नावाच्या यंत्रात फिट बसेल असे स्क्रू फक्त सरकारांना हवे असतात. अशी स्वतंत्रपणे विचार न करणारी पिढी कोणताही देश घडवत असतो. त्या सरकारने जी मूल्ये त्यांच्या राज्यघटनेत स्वीकारली ती किती उदात्त आहेत असाच विचार करायला प्रवृत्त केले जाते. त्याची चिकित्सा करण्याचे शाळांमधून शिकवलेच जात नाही. कारण, मग तो देशद्रोह ठरतो. अशी स्वतंत्र बुद्धीची माणसे हा धोका असतो म्हणूनच चिकित्सक मन असलेली माणसे निर्माणच होऊ दिली जात नाहीत.

शिक्षणावर मालकी ठेवण्याचा जसा सरकार प्रयत्न करते अगदी तसाच प्रयत्न संघटित धर्मही करत असतो. याचे कारण चिकित्सक मनाचा पहिला फटका हा संघटित धर्मालाच बसतो म्हणूनच युरोपच्या इतिहासात धर्म आणि राजसत्तेने सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी संघर्ष केला. तरीपण गॅलिलिओ किंवा तसे आव्हान देणा-यांना मोडून काढायला राजसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालते. हे या मांडणीच्या प्रकाशात समजून येते. कट्टरपंथीय नेहमीच एकमेकांना पूरक भूमिका घेतात हे हमीद दलवाईंचे म्हणणे या संदर्भाने कळते. चिकित्सक मन हाच देशद्रोह आणि धर्मद्रोह ठरवला जातो. त्यातूनच राजसत्ता आणि धर्मसत्ता या अधिकाधिक कठोर प्रसंगी हुकूमशाही वृत्तीच्या बनतात.
हिंसक होतात आणि त्यांच्या विचारातच हिंसा असल्याने संघर्ष वाढतच जातो. उदारमतवाद, सहिष्णुता, प्रेम, शांती या मूल्यांशी राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचा कोसो मैल संबंधच नसतो... त्यामुळे ते हिंसा थांबवत नाहीत किंबहुना हिंसा हेच त्यांच्या टिकून राहण्याचे साधन असते... कृष्णजी अगदी नेमकेपणाने म्हणतात की याच व्यवस्थेचे बटीक बनलेले शिक्षण म्हणूनच देव, देश आणि धर्म यांच्या नावाखाली होणारे खून जराही थांबवू शकलेले नाही... शिक्षणसुद्धा चिकित्सक मन घडवत नसेल तर नकळत या हिंसेला जबाबदार आहे असे ते स्पष्टपणे लक्षात आणून देतात. तेव्हा आपण यासाठी वापरलो जातो आहोत अशी नकळत भावना मनात येते....

कृष्णमूर्ती पुढे म्हणतात, सर्व जगभर मग तो रशिया, चीन, अमेरिका, युरोप किंवा भारत असो... समाज आणि संस्कृतीत माणसांनी चपखल बसावे. सामाजिक आणि आर्थिक व्यवहाराच्या प्रवाहात त्यांनी मिसळून जावे... हजारो वर्षे वाहत असलेल्या प्रवाहात त्यांना ओढून घेण्यासाठी शिक्षण दिले जात आहे... त्याला शिक्षण म्हणता येईल. कृष्णमूर्तींच्या या प्रश्नावर आपण सारे निरुत्तर आहोत...

herambrk@rediffmail.com

Next Article

Recommended