आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्विवाह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रसिका अतिशय सुंदर मुलगी. कामाला चुणचुणीत. वयाच्या एकविसाव्या वर्षी मागणी आली. मुलगा बँकेत नोकरीला. रसिकाचे बीकॉमच्या शेवटच्या वर्षाचे पेपर्स झाले आणि लगेचच पंधरा दिवसांत आराध्यशी लग्नही. सारेच कसे स्वप्नवत वाटत होते. तिचे सासूसासरेही प्रेमळ. दिवस सुखाचे चालले होते. मात्र अचानक आठच महिन्यांत आराध्यचा झालेला अपघाती मृत्यू रसिकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. सारे अघटित. पुढच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला. आराध्यच्याच बँकेत त्याच्या जागेवर रसिकाने काम करावे असे सास-यांनी सुचवले. त्या दृष्टीने खटपटही केली. दोनच महिन्यांत रसिकाची नोकरी सुरू झाली. एका धक्क्यातून सावरत तिने नोकरीत स्वत:ला रमवून घेतले. पण तिच्या आईवडिलांना आणि सासूसास-यांना तिची खूप काळजी वाटत होती. रसिकाचे वय अवघे बावीस वर्षांचे. पुढे कसे होणार या मुलीचे. हल्ली तर अगदी तिशीतही मुलींची लग्ने होतात. दुस-या लग्नाचा विषय रसिकाच्या मनात रुजवावा काय, याचाच तिचे आईवडील आणि सासूसासरे सतत विचार करायचे. विधवाविवाह कायदेशीर असेल का, रसिकाशी कोण लग्न करेल, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात सतत असायचे.


हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य मिळायच्या जवळपास 90 वर्षे आधीच मंजूर करण्यात आला होता. या कायद्याने हिंदू विधवेचा पुनर्विवाह कायदेशीर ठरवला आहे. अशा विवाहातून जन्मलेली मुलं कायदेशीर अपत्यच ठरतील. या कायद्यातील इतर तरतुदी मात्र 1955 मध्ये हिंदू विवाह कायदा पारित केल्यामुळे विशेष महत्त्वाच्या नाहीत. पण एवढे मात्र खरे की घटस्फोटित महिला अथवा विधवा, विवाह कायद्यानुसार पुनर्विवाह करू शकतात. त्यांचा विवाह वैध ठरण्यासाठी, हिंदू विवाह कायद्यांर्तगत असणा-या अटी लागू होतील. जसे की, लग्न करतेवेळी लग्नपक्षाला पती अथवा पत्नी नसावी. दोघांचेही वय अनुक्रमे 18 आणि 21च्या वर असावे.


दोघेही सपिंड प्रतिबंधित नात्याने संबंधित नसावे. लग्न झाल्यानंतर विवाहाची नोंदणी आवश्यक आहे. या कायद्यातील अटींनुसार विवाह झाला नाही तर तो वैध ठरत नाही. विवाह करणा-या व्यक्तीचे वय कायद्यात सांगितलेल्या वयानुसार नसेल आणि मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी अथवा मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला दोन वर्षे कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होईल. तसेच दोघे सपिंड अथवा प्रतिबंधित नात्यात असतील तर एक महिना कारावास आणि एक हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. मात्र विवाह बेकायदा ठरत नाही आणि मुलीला अथवा महिलेला शिक्षा होत नाही. विवाहानंतर दोघांचे पटले नाही तर घटस्फोटासाठीचा अर्ज, पोटगीचा अर्ज करण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत पुनर्विवाह करणा-यांनाही आहे.