आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूप, मिरे नि साखरेचा खाऊ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस म्हटले की मला माझे लहानपण आठवते. मोकळ्या आकाशातून जोरजोरात काळे काळे हत्ती, घोडे पळायला लागत. क्षणात सर्व आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून जाई. मग ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट आणि धो धो पाऊस सुरू. मग आमचे अंगणात भिजत गोर्‍या गार्‍या भिंगोर्‍या सुरू होई. क्षणात सर्वत्र पाणीच पाणी. आताही तेच असते.

माझ्या लहानपणी म्हणजे ऐंशी वर्षांपूर्वी शाळा आणि पाऊस एकदम सुरू होई. गाव खेडेगाव, आमची वस्ती गावाबाहेर. गुडघाभर पाण्यातून शाळेत जावे लागे. शाळेच्या वाटेवर दोन मोठाल्या काठ नसलेल्या विहिरी होत्या. सगळीकडे पाणी इतक्या जोरात वाहत येई की वाटेत नदीच होई. त्यात चक्क दोन भोवरे दिसत. मग आम्ही सर्व मिळून रेल्वे रुळावरून कसरत करत शाळेत जात असू. शाळा कधीही बुडवायची नसे. संध्याकाळी घरी आले की पावसातच भिजत खेळायचे. एकदा आई सारखी हाका मारत होती मला. मी धावत जाऊन झाडामागे लपले. तिने मला बकोट्याला धरून घरात आणले आणि देवासमोर उभे केले. मला शिक्षा होणार, इतक्यात आजी देवासारख्या आल्या. मी म्हटले, ‘सर्व जणच भिजत खेळत होते, पण मलाच का शिक्षा?’ आजी म्हणाल्या, ‘तिला समजावून सांग झाडापाशी जायचे नाही का ते.’ मग आईने समजावले. शिक्षा वाचली. झाड आपल्याकडे वीज ओढते, हे तेव्हा कळले.
पावसात भिजून घरात आले की आई पंचा घेऊन सर्वांचे केस पुसायची. कपडे बदलून झाले की आम्ही सर्व चुलीसमोर बसायचो. आई पळीत तूप घालून त्यात मिरी तळायची, त्यात साखर घालून प्रत्येकाला तूप-साखर आणि दोन दोन मिरी द्यायची. आम्हा भावंडांना तो खाऊ खूप आवडायचा. रात्रीची जेवणे झाली, अभ्यास आटोपला की झोपण्यापूर्वी गूळ घालून केलेला तिखट चवीचा गवती चहा प्यायला की पांघरूण घेऊन गुडूप झोपायचे.

पावसाळ्यात पाऊस पडताना पोहण्यातला आनंद आठवतो. खाली आपण उबदार पाण्यात, वरून पावसाची बरसात. आता नाही तसे पोहता येत. पावसाचा जोर ओसरला की आमच्या घराजवळून पाण्याचे ओहोळ सुरू होत. दर शनिवारी दुपारचा कार्यक्रम म्हणजे ओहोळात मातीचे बांध घालून पाणी अडवायचे, त्यातील मासे पकडून विहिरीत आणून सोडायचे. एकदा मला एका डबक्यात पुरीएवढे कासवाचे पिल्लू मिळाले होते.

एकदा मी आमच्या बागेत एक चमत्कार पाहिला. एक खेकडीण चालली होती, तिच्या पोटाला तपकिरीच्या डबीसारखी एक डबी होती. तिने ती उघडली आणि तिच्या पोटातून करंगळीच्या नखाएवढी पिल्लं खाली पडू लागली. खेकडीण चालत होती, तिच्या मागे रांगेत तिची पिल्लं. मी ताईला हाका मारते, तो सर्व गायब.

पावसाळ्यात सण-उत्सवांची रेलचेल. पण त्याच पावसाने रौद्ररूप घेऊन केलेला विध्वंस आठवून मन सुन्न होते. शेहेचाळीस साली कोकणात जाताना रामदास बोट बुडाली. आमच्या गावाला खूप सोसायला लागले. उत्तराखंडला पावसाने जो तडाखा दिला तो कोणीच विसरू शकणार नाही. थोड्या दिवसांनी स्थिरस्थावर होईल, पण नदीतीरी कुणी स्थावर बांधू नये. प्रलयाला बोलावू नये, असे वाटते.