आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतीव दु:खाचा वार्तापट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरुणा शानबाग... नाव आणि चेहरा डोळ्यासमोर येताच मन सुन्न होते! देहात जीव आहे, पण देह जिवंत असून नसल्यासारखा... आणि तोसुद्धा ४२ वर्षे एकाच जागी पडल्यानंतर अनंताच्या प्रवासाला गेलेला! काय होता तिचा गुन्हा? कर्तव्य कठोरता दाखवली म्हणून, तिला मृत्यूपेक्षा भयानक शिक्षा वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मिकीने दिली... कारण तो पुरुष होता! कुत्र्याच्या साखळीने तिची मान आवळून त्याने तिला आयुष्यभराचे भयाण मरण दिले. याची त्याला झालेली शिक्षा फक्त सात वर्षे आणि अरुणाच्या कपाळी चार दशकांचा मृत्यूभोग! हा सारा प्रवास सर्वांनाच माहीत... पण या प्रवासात गेली दहा वर्षे अरुणाचा नव्याने शोध घेण्याचा संवेदनशील प्रयत्न होतो, तेव्हा पुन्हा एकदा फ्लॅशबॅकच्या रूपाने अरुणा आपल्यासमोर उभी राहते... हा प्रवास उभा केला आहे, तो पत्रकार नेहा पुरव यांनी.
व्यथा अरुणाची... हे पुस्तक खरे तर अवघे ४७ पानांचे. त्यामुळे रूढार्थाने याला पुस्तक म्हणता येणार नाही, तसेच साहित्याच्या कुठल्या साच्यातही त्याला बसवता येणार नाही... हा एका स्त्रीने दुस-या स्त्रीच्या अतीव दु:खाचा मांडलेला वार्तापट आहे. या प्रवासात नेहाला अरुणा पराडे यांच्याप्रमाणे केईएमच्या असंख्य नर्सेस तर भेटतातच; पण त्यापेक्षा ज्या डॉक्टरांशी तिचे लग्न ठरले होते ती व्यक्ती, बहीण शांताक्का, अरुणावरील हल्ल्यानंतर त्याचा तपास करणारे पोलिस अधिकारी केशव सहस्रबुद्धे आणि नेहाची अरुणाशी झालेली भेट... या सा-यातून ती या अवकाशाचा वेध घेते, तेव्हा लेखिका आपल्यालाही तिच्यासोबत घेऊन जाते, इतका हा रिपोर्ताज आपल्या तनामनावर गारूड करून जातो...
विशेषत: हिंदू कॉलनीत त्या डॉक्टरांना भेटायला जाताना एक स्त्री म्हणून लेखिका जणू त्यांना जाब विचारण्यासाठी गेलेली असते... पण, प्रत्यक्षात डॉक्टरांच्या डोळ्यांतील अश्रू खूप काही सांगून जातात. सहा फूट उंच, गोरेपान, पिंगट घा-या डोळ्याचे हे डॉक्टर त्या वेळी केईएमध्ये एमडी करत होते... अरुणाही गोरी आणि देखणी. जणू गीताबालीच! ही जोडी सिनेमाच्या पडद्यावरील नटनट्यांपेक्षा सरस होती... पण नियतीला ही जोडी जीवनाच्या पडद्यावर प्रत्यक्ष पाहवली नाही. हीच व्यथा डॉक्टरही बोलून दाखवतात, तेव्हा सुन्न व्हायला होते. याचबरोबर अरुणाची प्रत्यक्ष भेट होण्यासाठी नेहाने केईएमचे झिजवलेले उंबरठे आणि अखेर मृतदेहाशी झालेली भेट... हा प्रसंगही या रिपोर्ताजला एका उंचीवर नेऊन ठेवतो!

*व्यथा अरुणाची
*लेखिका : नेहा पुरव
*प्रकाशक : दर्पण प्रकाशन, मुंबई

divyamarathirasik@gmail.com