आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Research And Many Question Regarding Story Writing

संशोधन आणि अनेक प्रश्नात दडली कथा लेखनाची बीजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.जयंत नारळीकर यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्ष पार केले. पत्नी सौ. मंगलाताई, तीन मुली,नातवंडं,जावई यांच्या सोबत गृहस्थ धर्माचे अत्यंत उबदार नाते सांभाळत त्यांनी खगोल संशोधनातून वेळ काढत जे लेखन केले ते स्तीमित करणारे आहे. डॉ .नारळीकर हे खरोखर बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. विज्ञानाच्या कार्यकारणभावाचा वस्तुनिष्ठ पाया आणि कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी याचे सुयोग्य रसायन म्हणजे त्यांचे साहित्य. त्यांच्याबरोबर बोलताना असे लेखन करायची इच्छा का झाली, कोणाचे संस्कार त्यासाठी उपयोगी आले, लिखाणासाठी वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे कथा बीज कशी मिळाली याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला.


नारळीकरांचे गुरू डॉ. हॉवेलसुद्धा होते उत्तम लेखक :
डॉ.जयंत नारळीकर यांचे गुरू आणि खगोलशास्त्राचे संशोधक डॉ.हॉवेल हे सुद्धा उत्तम लेखक होते. ते संशोधक म्हणून नावारूपाला तितकेच ते लेखनाच्या आघाडीवर सुप्रसिद्ध होते. विज्ञान कथा आणि कादंबरी लेखन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक होता. ते उत्तम गिर्यारोहक होते. संशोधनाचा व्याप, त्यातून येणारी अस्वस्थता, साचलेपण दूर करण्यासाठी ते जंगलातून किंवा गिर्यारोहणाचा आधार घ्यायचे. भटकंती करताना अनेक विषय त्यांच्या मनात घोळत असायचे, त्याची उत्तरे काय असतील; इतरांची त्यावर काय मते असतील यासाठी ते प्रश्न विचारायचे.संशोधन आणि लेखनाची अनेक बिजे त्यांना अशी सापडायची. केवळ कल्पनारम्यता न ठेवता त्यांनी त्याला विज्ञानाचा पाया भक्कमपणे देण्याचा विचार केला आणि ब्लॅकहोल सारखी नितांत सुंदर विज्ञान कादंबरी त्यांनी लिहिली. डॉ. नारळीकर या त्यांच्या लेखन प्रक्रियेचे सहभागी सदस्य होते. डॉ. हॉवेल यांचे लिखाण ती प्रक्रिया ते जवळून अनुभवत होते. लिखाणाची बीजे त्यांच्यात तिथेच रुजली. मात्र,ती रुजून त्याचे प्रत्यक्ष लिखाणात रूपांतर होण्यासाठी पुढे काही वर्षेजावी लागली.


विज्ञान परिषदेच्या विज्ञान कथा स्पर्धेत सर्वप्रथम :
डॉ.नारळीकर परदेशातील शिक्षण संपवून भारतात मुंबईत टाटा पायाभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. दरम्यान, विज्ञान परिषदेच्या वतीने विज्ञान कथा स्पर्धांची घोषणा झाली. डॉक्टरांनी त्यात भाग घेतला आणि शैक्षणिक कालखंडात सतत प्रथम क्रमांकांनी उत्तीर्ण होणारे नारळीकर या स्पर्धेतही प्रथम क्रमांकाचे पारितोषक मिळवते झाले.
सुमारे 30 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आजही कायम आहे.वयाच्या 75 व्या वर्षी संशोधनातून वेळ काढून मुलांसाठी त्यांच्या जाणिवा विज्ञानाधिष्ठित व्हाव्यात यासाठी ते लेखन करतात.


गृहीतकांमध्ये दिसला मला विज्ञान आणि कल्पनारम्यतेचा मिलाफ :
डॉ. नारळीकर म्हणाले, मला अनेक कथांची बीजे माझ्या संशोधनात मिळाली. संशोधनाचे जटिल काम करताना अनेकदा गृहीतकांची मदत घेतली जाते या गृहीतकांमध्ये मला विज्ञान आणि कल्पनारम्यता याचा मिलाफ दिसला. फॅटसीचा, कल्पनारम्यतेचा वापर करत विज्ञानाच्या संकल्पना मुलांपर्यंत किंवा जी मंडळी या क्षेत्रापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर रंजकतेचा वापर केला पाहिजे, हे माझ्या मनात आले आणि मी त्या अनुषंगाने लिखाण केले. मात्र, केवळ कल्पनारम्यता हा विषय डोक्यात न घेता आकाशाशी जडले नाते. यासारखी पूर्णपणे शास्त्रावर आधारलेली पुस्तकेही मी लिहिली. याशिवाय माझी स्वाक्षरी घेण्यासाठी विद्यार्थी माझ्याकडे यायचे त्यांना एखाद्या कागदावर स्वाक्षरी देण्यापेक्षा मी त्यांना; मला एखादा प्रश्न पोस्टकार्डावर पाठवा त्याला मी उत्तर देईन, त्यावर माझी स्वाक्षरी असेल असे सांगत असे.


हजारो प्रश्न विचारणाºया पत्रातून कळाली वाचकांची आवड :
अशी हजारो कार्डे मला आली. त्यातही काही विषय किंवा वाचकांची आवड मला समजत गेली. संशोधनातील काही मुद्दे मला सर्वसामान्यांसाठी माहितीचे आहेत, असे वाटले तर मी ते बाजूला काढून त्यावर काही करता येईल का हे पाहिले.अशा अनेक कथांची थीम मला मिळत गेली. आज नातवंडांना गोष्ट सांगतानाही त्याचा उपयोग होतो. मला वाटते लहान मुलांमध्ये विज्ञानाची भावना रुजली पाहिजे. त्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, ज्याला कोणाला यावर काम करायचे आहे, त्याने ते केले पाहिजे. शासनाकडून अपेक्षा केली जाते कारण त्यांच्याजवळ सुयोग्य अशी यंत्रणा तळागाळापर्यंत काम करते, पण सगळ्यांनी हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मुलांपर्यंत सकस साहित्य पोहोचवले पाहिजे.


मुलांसाठी विज्ञान लेखन करणार आहे :
आपल्या पृथ्वीखेरीज इतरत्र जीवसृष्टी आहे का, हा प्रश्न मला अनेकदा विचारला गेला आहे. शास्त्रीय आधारावर याचे उत्तर देणे हा संशोधन पूर्ण झाल्यावरचा भाग आहे. यावर प्रयोग सुरू आहेत. अंतराळात असलेल्या आपल्या, इतर देशांच्या प्रयोगशाळा ते तथ्य हुडकत आहेत. अनेक प्रकारचे नमुने गोळा केले जात आहेत. संदेश देण्याचे काम सुरू आहे. याबाबत आपल्या ऋषी मुनींनी दिलेले दाखले, वर्णने यापासून अनेक घटक विचारात घेतले जात आहेत. मला वैज्ञानिक म्हणून जसा या सगळ्या प्रकाराचा मोह आहे, अभ्यासाची प्रचंड इच्छा आहे. तसेच विज्ञान लेखक म्हणून आतापर्यंत जे हाताशी लागले, संशोधन सुरूआहे, ते कोणत्या टप्प्यावर आहे. याची साक्षेपी माहिती मिळावी, असे मला वाटत असते. यावर मी लिखाण केलं आहे, करणार आहे.


वास्तव्यातील शहरे, गावे यांचे संस्कार, संचित लेखनात उमटले :
काही दिवसांपूर्वी मी ज्या मोठ्या शहरात किंवा ज्या गावांनी मला काही दिले त्यावर पुस्तक पूर्ण केले. खरे तर मी ज्या गावात राहिलो त्या गावांचे संस्कार, पद्धती, भाषा याचे संचित मनाच्या तळाशी राहिले आहे. बनारस असेल किंवा कोल्हापूर या गावांची माती, तिथल्या माणसांची मानसिकता याचा परिणाम माझ्यावर नक्की झाला; तसेच परदेशातील वातावरण, गुरुजन, मित्र यांच्या सहवासाचे पडसादही माझ्या लेखनात उमटले.


लिखाणासाठी वेळ काढतोच :
आता त्यापुढचा भाग लिहावा असेही मनात आहे. सुनीताताई देशपांडे यांनी मला कोण ओळखत नाही किंवा माझ्या जीवनाबद्दल माहीत नाही, असे सर्वसामान्यांत काय राहिले, असे विचारले होते, माझे चरित्रात्मक पुस्तक त्याला काही प्रमाणात उत्तर आहे. आयुकासारखी संस्था उभारताना जी उद्दिष्टे डोळ्यासमोर होती, ती आजची मंडळी पुढे नेताना पाहातो तेव्हा कृतार्थतेची भावना मनात तयार होते. लिखाणासाठी कितीही व्यस्त असलो, कामाचा डोंगर असला तरी वेळ काढतो, म्हणजे असे आहे,आवडीचे काम असले की सवड निघतेच ना, त्यामुळे अशी सवड काढीन लिहीत राहीन, असे सांगत डॉ. जयंत नारळीकर यांनी निरोप घेतला.