आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्यापासून दूर राहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमात पडले की, काही गोष्टींबद्दल आवड उत्पन्न होते. निर्जीव फोटो, वहीतले सुकलेले फूल, कवितेच्या पुस्तकातील त्याने दिलेले मोरपीस... या साऱ्या गोष्टींतून तो जवळ असल्याचाच भास होतो. असेच काहीसे झाले होते सरिताचे. तिला तिच्याच क्लासमधल्या मैत्रिणीच्या मावसभावाने पाहून मागणी घातली होती. त्यानंतर सरिताचे पाय जमिनीवर नव्हतेच. तिला तो आवडला होता; पण नेमकी त्याच्याबद्दल माहिती काहीच नव्हती, म्हणून ती मैत्रिणीच्या घरी गेली, तर तिची वहिनी घरी होती. वहिनीने सरिताला सांगितले की, ‘तो तर क्लर्क आहे. क्लर्क! तू कारकुनाशी लग्न करणार? एवढी सुंदर तू. तुला डॉक्टर, वकील, इंजिनिअर मिळायला पाहिजे. कसं गं तुझं नशीब?’

नंतर सरिता मनोमन कुढायला लागली व मैत्रिणीने मुद्दामच असे स्थळ दाखवले, म्हणून मैत्रिणीलाच दोष देत बसली.
तीच गोष्टी अक्षतची. अक्षत नोकरीच्या शोधात गावाकडून शहरात आला. अक्षतच्या बहिणीच्या नवऱ्याने ओळखीने अक्षतला एका कंपनीत छोटीशी नोकरी मिळवून दिली. पगार जेमतेम होता, पण अक्षतसाठी तोसुद्धा फार होता. पण एकदा अक्षत सुटीच्या दिवशी घरी असताना समोरच्या काटेवहिनी घरी आल्या. अक्षतच्या ताईकडे बोलता बोलता अक्षतला म्हणाल्या, ‘काय होणार रे एवढ्याशा टिकल्यांमध्ये? किती महागाई आहे, आमच्या यांनी तर सुरुवातीपासूनच कसं भरघोस पगारावर काम केले.’ असे काहीबाही भरवून देऊन निघून गेल्या.

भोळ्या-भाबड्या अक्षतने बहिणीशी भांडून नोकरीसुद्धा सोडून दिली. नोकरीवर टिकला असता तर हळूहळू प्रगती करून वरच्या पदावरसुद्धा गेला असता. पण आज गावी सायकल पंक्चरचे दुकान टाकून बसलाय!

एकदा रुची अभ्यास करत बसली होती. समोरच्या काळे वहिनींनी खिडकीतून बाहेरून विचारले, ‘अगं रुची काय करतेस?’ ‘अभ्यास करतेय.’ असे रुचीने उत्तर दिल्यावर वहिनींनी चेहऱ्यावर आठ्या पाडून म्हटले, ‘काय करायचं अभ्यास करून? मीसुद्धा खूऽऽप शिकलेय, आहे काही फायदा? नाही ना! सर्व दिवस माझा कामे करण्यात नि मुलांनाच सांभाळण्यात जातो.’
मग काय विचारायचे, रुचीचे अभ्यासावरून लक्षच उडाले नि ती जेव्हा तेव्हा ‘काय फायदा शिकून तरी...’ची टेप ऐकवायला लागली.

अशा बऱ्याच बायका आपल्या प्रत्येकीच्या आसपास राहतातच मैत्रिणींनो! तरी त्यांच्यापासून नेहमी सावध राहा. शक्यतो त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहू नका. तोंडी तर लागूच नका. पण दिसल्याच समोरून येताना तर रस्ताच बदला. कारण या अशा बायकांना रडगाणं गायचं, उपदेश द्यायचा व नावे ठेवायची, एवढाच उद्योग असतो.

आपल्या एकाच शब्दाने समोरच्या व्यक्तीच्या पूर्ण आयुष्याची होळी होऊ शकते. सर्व स्वप्नं उद‌्ध्वस्त होऊ शकतात. पण हे समजेल तर ना?
एखाद्याचे चांगले करता आले नाही तर करू नका; पण वाईट करून त्यांच्या भावनांशी खेळू नका. शब्द म्हणजे शस्त्र आहे, हे वेळीच लक्षात घ्या. यामुळे जे लोक निस्वार्थपणे काही करतात, ते शत्रू होतात आणि आपल्याच लोकांपासून लांब फेकले जातात. म्हणून काय चांगले व काय वाईट, हे वेळीच ओळखायला शिका. नंतर पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा आपली माणसे जे करतात तेच योग्य, हे समजून घ्या.