आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औट घटकेची माहेरवाशीण!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजीच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देण्यासाठी मी फोन केला होता. आजी तिकडून भावनेच्या भरात मला बोलून गेली की, ‘आता काहीच इच्छा राहिल्या नाही, फक्त एकदा माहेरी जावं वाटतंय.’
आजीच्या त्या वाक्याने माझ्या मनात घर केले होते. आजीच्या १८ नातवंडांपैकी आजीचा सर्वात जास्त सहवास व प्रेम मलाच लाभले होते. त्यामुळे तिच्या मनातील इच्छा तिने मलाच बोलून दाखवली होती. तिला माहेरी शेवगावला जायचे होते.
वीस वर्षांपासून आजी एका जागेवरच बसून आहे. चालता येत नाही, उभे राहता येत नाही, गुडघ्याची वाटी पूर्ण क्रॅक झाल्यामुळे, वय जास्त असल्याने ऑपरेशन न करता, गोळ्या, औषधे यावरच अवलंबून असल्याने आजीची सर्व कामे जागेवरच चालू आहेत. बाथरूमपर्यंत सरकत जाते. जागेवर बसूनच साडी नेसावी लागते. नऊवारी साडी मोठी असल्यामुळे नऊवारीची पाचवारी करून गुंडाळून बसते. आम्ही सगळे म्हणतो, ‘कशाला साडी नेसायचे कष्ट घेतेस? गाऊन घाल अंगात!’ पण ती काही ऐकत नाही.
आजीला तिच्या माहेरी घेऊन जायचे ठरवल्यापासून आजीची लगबग एखाद्या तरुणीला लाजवेल अशी होती. आजीला प्रत्येक जण आपापल्या घरी नेण्यासाठी उत्सुक आहे, पण तिला कुणालाही त्रास द्यावा वाटत नाही, ती तब्येतीचे कारण सांगून टाळते. पण माहेरी, भावाकडे तिला मनापासून जावे वाटले. आजीला घेऊन जाण्यासाठी स्पेशल गाडी केली. खुशवंतने आजीला अलगद उचलून गाडीत ठेवले. मी व आई गाडीत बसलो. आजीच्या माहेरी गणपतमामांना फोन केला. आजी माहेरी येतेय म्हणून! चार वाजता निघायचे होते, पण आजीला नऊवारी साडी नेसायला एक तास लागला. आईला व मला नऊवारी नेसवता येत नव्हती. आजीने भावाचीच ठेवणीतली साडी काढली, नेसली. भाच्यांना, नातवांना, पणत्यांना खाऊ घेतला. पाच वाजता गाडी निघाली. अर्ध्या-पाऊण तासात आजीच्या माहेरी दारासमोरच गाडी थांबली. फोन केल्यामुळे सगळेच माहेरवाशिणीला भेटायला जमले होते. २० वर्षांनंतर आजी माहेरी आली. गाडीतून आजीला परत एकदा अलगद घरात घेतले. गप्पा सुरू झाल्या. सगळ्या घराचा आनंद आेसंडून वाहू लागला. घरातली सर्वात मोठी मुलगी माहेरी आली होती. तिथे शेजारीच राहणारी आजीची बहीण, बहिणीची मुले, सुना, नातवंडे आली होती. भावाची मुले, सुना, नातवंडे, पतवंडे सगळे मिळून घरात लहानमोठे २५-३० जण होते. अरुणा व रेखा या भाचेसुनांनी प्रेमाने केलेले पोहे-चहा घेऊन, भावजयीची प्रेमळ नजर, भावाचा व बहिणीचा पाठीवर फ‍िरणारा प्रेमळ हात, भाच्यांची चिवचिव, आत्या-आजी करत आजूबाजूला बागडणारे सर्व जण, अशा मोहरून टाकणा-या वातावरणात माहेरवाशीण सुखावत होती. मी व आई दोघी जणी हे सुखाचे क्षण डोळ्यात साठवून घेत बसलो होतो.
दोन तासांत सर्वांची चौकशी करून, सर्व घर सरकत सरकत बघून भावाने दिलेली माहेरची साडी घेऊन आणि आहेर, सगळ्यांचा आपलेपणा मनी जतन करून ही ८५ वर्षांची माहेरवाशीण घरी निघाली.
सर्वांनी प्रेमाने निरोप दिला. आजीने मागे वळून बघितले. अंधुक झालेल्या डोळ्यांच्या कडा पातळाच्या पदराने टिपल्या. औट घटकेचे माहेरपण भोगून आपल्या स्वत:च्या घराच्या जबाबदा-या पेलण्यासाठी ताजीतवानी होऊन आजी सासरी तिच्या घरी निघाली होती.