आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उचलली जीभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळा सुटली आणि वाघसर काळीपिवळीची वाट पाहत चौकात उभे राहिले. रिक्षा आली. सर बसले. रिक्षा सुरू झाली. त्याबरोबर रिक्षात बसलेल्या दोन बायकांची बडबडही सुरू झाली. सुरुवातीला वाघसरांना त्यांच्या गप्पात इंटरेस्ट नव्हता. पण त्या दोघींनी बोलताना वाघसर ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेचा व वाघसरांच्या नावाचा उल्लेख केला म्हणून ते लक्ष देऊन ऐकायला लागले.
त्या दोघींची मुले वाघसरांच्या वर्गात होती. या दोघींनी कधीही शाळेत जाऊन वर्गशिक्षकांना भेटण्याचे कष्ट घेतले नव्हते. त्यामुळे त्यांची व सरांची कधी भेट होण्याचा प्रश्नच नव्हता.

‘काय तो वाघसर! एकदा बघावंच लागेल त्याच्याकडे जाऊन! बघावं तेव्हा पोराला मारत असतो,’ पहिली बाई.
‘उद्याच शाळेत जाऊ आपण दोघी. आमची पोरं काय रस्त्यावर पडलीत काय? अशी झापते उद्या,’ दुसरी बाई म्हणाली.
आणि मग दोघींनी यथेच्छ शिव्या देऊन सरांच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार केला. सरांना त्या क्षणी ते सर्व ऐकून लाजल्याहून लाजल्यासारखे झाले. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर सरांना पाहून त्या दोघींना मेल्याहून मेल्यासारखे झाले.
एकदा प्रगती तिच्या बहिणीबरोबर वास्तुशांतीला गेली होती. लॉनमध्ये बऱ्याचशा बायका खुर्चीवर बसून जेवत होत्या. प्रगतीची बहीण यजमानीणबाईंना प्रेझेंट गिफ्ट द्यायला, घरात गेली आणि प्रगती येऊन बायकांशेजारी बसली. दोन बायका म्हणत होत्या, ‘ती बघ प्रतीक्षा, त्या यजमानीणबाईंशी बोलतेय. मोकळीच आली असेल हात हलवत. मुलखाची कंजूष आहे!’
‘होऽऽ ना! खूप शायनिंग मारते बरं का! आता तर काय स्कूटी घेतलेय. नुसती फिरत असते.’
तिकडून प्रतीक्षा त्या बायकांजवळ आली आणि त्या बायकांच्या शेजारीच बसलेल्या प्रगतीकडे पाहून तिने त्यांची ओळख करून दिली, ‘ही माझी बहीण प्रगती. धुळ्याला असते, कालच आलीय.’
त्या बोलणाऱ्या बायका लाजेने पाणी पाणी झाल्या. अर्धवट ताट ठेवून न जेवताच घरी गेल्या.
सोसायटीत येणाऱ्या केळेवालीशी गप्पा मारता-मारता शांताकाकू म्हटल्या, ‘काय दिवस आलेत मावशी, ही माझी शेजारीण, इतका छळ करते सासूचा की काय सांगू? जेवायलाही देत नाही!’
केळेवालीच ती. तिनेही बोलता बोलता दुसऱ्या कॉलनीत चार बायका जमल्यावर ही गोष्ट काढली. ‘काय जमाना आलाय, अमुक अमुक सोसायटीत तमुक तमुक बाई खूप छळते हो सासूला. चहा देत नाही, जेवायला देत नाही. ती शांताकाकू सांगत होती.’ ऐकणाऱ्या राधाताई उसळल्या. म्हणाल्या, ‘मावशी काही तरी काय बोलताय, ती माझी भावजय आहे त्या सोसायटीत. आणि ती माझ्या आईला जेवू घातल्याशिवाय स्वत: जेवत नाही कधी! आम्हाला आमच्या वहिनींवर पूर्ण विश्वास आहे व अभिमान आहे. ती शांताकाकू एक नंबरची खोटी आहे.’
सांगण्याचे तात्पर्य एकच, आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते, उचलली जीभ लावली टाळ्याला. त्या क्षणी तिथे ऐकणारे कदाचित आपले परिचित नसतील.
पण आपण ज्यांच्याविषयी बोलतो त्याच्या ओळखीचे असतील तर? नंतर खजील होण्यापेक्षा अगोदरच विचार करून बोला!
बातम्या आणखी आहेत...