Home | Magazine | Madhurima | return-ticket-mangala

परतीचं तिकीट

डॉ. मंगला वैष्णव, औरंगाबाद | Update - Jun 10, 2011, 12:44 PM IST

‘‘जो संकट देतो तो सामना करण्याचं बळही देतोच. मला तू शक्ती दे!’’ सुमती निग्रहानं म्हणाली. मुकुंदा मुकाट्यानं निघून गेला. वर्ष-दोन वर्षांतून यायचा; पण त्यानं पुन्हा म्हणून या विषयावर'ब्र'ही काढला नाही.

 • return-ticket-mangala

  मोठ्या शहरातला मोठा बंगला. प्रशस्त हॉल. समोर बागबगीचा, फाटक, गाडी, गॅरेज सारं कसं आलिशान. जेवण झालं होतं, विश्रांती पण झाली होती. हॉलमध्ये सुमती पाठीमागे हात बांधून अस्वस्थपणे फेºया मारीत होती. मनात विचारांचं वादळ घोंघावत होतं. काय करू? मीरा तिची मैत्रीण. तिनं किती योग्य सल्ला दिला होता, याचीही तिला जाणीव झाली. आता काही तरी निर्णय घेतलाच पाहिजे, हे तिच्या लक्षात आलं. हे असं इथलं एकटेपण अंगावर यायला लागलं आहे. तिकडे आपल्या गावी एकटीच होते; पण सारा परिसर, खिडक्या-दारं तिच्याशी बोलायची. शेजारीपाजारी चौकशी करायचे. ते तसं इथं काहीच नाही. आपुलकीचा वाराही कुठे वाहताना दिसत नव्हता. ती मनाशी हिशोब करीत होती. दोन महिने झाले येऊन. रेंगाळणारा प्रत्येक दिवस मोजत मोजत दोन महिने संपले. ज्यासाठी ती इथं आली ते तर मिळतच नव्हतं. ‘काय करू मी?’ हा प्रश्न तिला सारखा भेडसावत होता. आताशी निवृत्त झालेय, तर ही अवस्था! कसं होणार यापुढे?
  तिला निवृत्तीचा दिवस आठवला. ती रमेशच्या- तिच्या नवºयाच्या- बँकेतच लागली होती अनुकंपा तत्त्वावर. तिच्या निवृत्तीच्या दिवशी बºयाच लोकांची भाषणं झाली. साºयांनी तिच्या कामाची प्रशंसा केली. त्याबरोबर रमेशरावांची आठवण अपरिहार्य होती. सारी बँक त्यांच्या आठवणीनं गहिवरली होती. शेवटी साहेब उभे राहिले, ‘‘सुमतीबार्इंनी मोठ्या धैर्याने त्यांच्यावर अकस्मात आलेली जबाबदारी पेलली. सांसारिक कर्तव्येही हिमतीने पार पाडली. तेव्हा तीन वर्षांचा असलेला मुलगा आज मोठा झालाय, मोठ्या हुद्द्यावर आहे. सुमतीबाई धीराने आणि नेटाने कर्तव्य करीत होत्या. दु:ख मनात पचवून प्रसंग साजरा करीत होत्या. आता त्या आपला मुलगा व सुनेजवळ राहतील, नातवंडांत सुखावतील. यापुढील त्यांचे आयुष्य सुखात जावे, हीच आमच्या सर्वांची इच्छा. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो!’’
  इथे बंडूच्या घरी आल्याला दोन महिने झालेत. साहेबांच्या शुभेच्छा कुठे येताहेत कामाला? बंडूला कुठे आहे वेळ बोलायला? सुनेलाही नाही. आज तिला अचानक मुकुंदाची आठवण झाली. मुकुंदा! रमेशचा मित्र- अगदी जीवश्च-कंठश्च. मस्त कलंदर. आदिवासींसाठी काम करणारा, धुवट पण स्वच्छ कपडे घालायचा. गळ्यात शबनम, डोळ्यांत आणि डोक्यात आदिवासींविषयी विचार. रमेश आणि मुकुंदा तासन्तास बोलत असायचे. छान जमायचा गप्पांचा फड. तो ध्येयवेडा तर रमेश चारचौघांसारखं आयुष्य जगणारा. रमेश गेला त्या वेळी मुकुंदा नागालँडमध्ये होता. बातमी कळल्याबरोबर धावत पळत आला पंधराव्या दिवशी. घरात ती आणि तीन वर्षांचा बंडू. जोडीला स्मशानशांतता. मुकुंदा आला आणि कावराबावरा बंडू त्याच्या गळ्यात पडून विचारत होता, ‘‘काका, बाबांना त्या लोकांनी कुठं नेलं?’’ मुकुंदानं त्याला जवळ घेतलं. पाठीवरून हात फिरवत राहिला. कायम बोलणारा मुकुंदा अबोल झाला होता. घराच्या कागदपत्रांची, नोकरीच्या पैशाची, तिला नोकरी मिळण्यासंबंधीची कामे मार्गी लावून गेला. तो सच्चा कार्यकर्ता होता. भणंग दिसत असला तरी वरपर्यंत त्याची ऊठबस होती. दुसºया दिवशी तो परत जाणार होता. सुमती आणि मुकुंदा बोलत बसली होती.
  ‘‘सुमती, आॅफिसची, बँकेच्या आर्थिक व्यवहारासंबंधी कामं मी मार्गी लावली आहेत. तुझ्या नोकरीचंही काम होईल. त्यासाठी थोडं मागे लागावं लागेल एवढंच. मी ते काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करीन; पण तुला इथं धीरानं राहावं लागेल. राहशील ना?’’
  ‘‘दुसरा काही मार्ग आहे का मुकुंदा? नियतीनं असा अचानक घाला घातला आहे की, काही कळायच्या आत सगळं संपलं. हा तीन वर्षांचा बंडू, याचं कसं व्हावं? काही कळत नाही, सुचतही नाही.’’
  ‘‘काळजी नको करूस. या गोष्टी मार्गी लागेपर्यंत मी आठ-पंधरा दिवसांनी चक्कर मारीन!’’ ‘‘मुकुंदा! रमेशचं असं अचानक जाणं मला फार मोठा धक्का देणारं आहे. सासर-माहेरची इतकी नातेवाईक मंडळी आमच्याकडे कायम राहायला यायची, मजा करायची. पण पाहतो आहेस ना तू? तू आलास तो पंधरावा दिवस होता. घराचं स्मशान झालं होतं. कसा जगाचा न्याय?’’ या साºया कामासाठी मुकुंदा चकरा मारीत होता दर आठ- पंधरा दिवसांनी. तीन महिन्यांत त्यानं सुमतीच्या नोकरीची आॅर्डर आणली. तो दिवस सुमतीभोवती फेर धरू लागला.
  ‘‘सुमती! सुमती!’’ त्या आवाजात आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. सुमती स्वयंपाकघरात होती. त्याची हाक ऐकल्यामुळे पदराला हात पुसत ती बाहेर आली. मुकुंदाच्या चेहºयावर आनंदाचं चांदणं पसरलं होतं आणि हातात पुडा.
  ‘‘तू असा अचानक? आणि इतका कशाचा आनंद?’’
  ‘‘तुझ्या नोकरीची आॅर्डर घेऊनच आलोय! बघ, येत्या एक तारखेला तुला रुजू व्हायचं आहे. मी पेढे घेऊन आलोय. देवापुढे ठेव आणि आता झक्कास चहा कर.’’
  सुमतीच्या डोळ्यांत समुद्र उतरला होता. काय बोलावं, कसं बोलावं, तिला काही सुचत नव्हतं. अश्रूंना तिनं पदराच्या टोकानं हलकेच मागे सारलं. ती आत गेली. चहा करून आणला तर मुकुंदा डोळे मिटून आपल्याच तंद्रीत.
  ‘‘मुकुंदा, चहा आणलाय! कुठे हरवला आहेस?’’
  ‘‘अं... हे असं होतं बºयाच वेळा. तुझ्या काळजीनं पोखरतोय मी.’’
  ‘‘माझ्या नशिबाचा फेरा!’’
  ‘‘तसं नाही गं! या अशा स्थितीत तुझ्या माणसांनी पाठ फिरवली. तुझ्या पदरात लहान मूल, तरुण वय, हा गाव, हा समाज! कसं सांभाळशील? काळजी वाटतेय तुझी.’’
  ‘‘किती करशील माझी काळजी? माझं नशीब, दुसरं काय! दैवानं जसं ताट वाढलंय त्याचा स्वीकार करावा लागेल ना? आणि नातेवाइकांचं काय? ‘ना’ आत काही ते नातेवाईक. गुळाभोवती जमणारे मुंगळे, गूळ संपला की ते पसार होणारच.’’
  मुुकुंदानं हळुवारपणे तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘बोलू की नाही? तुला आधार द्यावा असं मनात येतंय. आजपर्यंत हा विषय शिरला नाही डोक्यात कधी. तुझ्यावरचा हा बाका प्रसंग. मीच कोलमडलोय. तुझी काय अवस्था झाली असेल? राहू आपण एकमेकांच्या आधारानं!''
  ‘‘शक्य नाही! रमेशचा ठेवा मला जपायचा आहे. त्याचं नाव टिकवायचं आहे. त्याच्या आठवणींवर जगेन मी. जो संकट देतो तो सामना करण्याचं बळही देतोच. मला तू शक्ती दे!’’ सुमती निग्रहानं म्हणाली. मुकुंदा मुकाट्यानं निघून गेला. वर्ष-दोन वर्षांतून यायचा; पण त्यानं पुन्हा म्हणून या विषयावर ‘ब्र’ही काढला नाही. आणि आज सुमतीला त्याची आठवण तीव्रतेने झाली. आज खºया अर्थाने तिचा एकटेपणा बोचतोय. मनातल्या आशांच्या चिंध्या झाल्या होत्या. मागचे सारे प्रसंग तिला आठवले. रमेशच्या अपघाताचा तो दिवस. मी पेपर वाचत होते. एवढ्यात दारावरची बेल वाजली, वाजतच राहिली. वाजवणारा अस्वस्थ आहे हे लक्षात आलं. मी दार उघडलं तर रमेशच्या बँकेतले त्यांचे ३-४ मित्र. काहीसे बावरलेले, घाबरलेले, एकमेकांकडे पाहत उभे, बोलू शकत नव्हते. विचित्र शांतता... त्या शांततेचा मीच भंग केला, ‘‘या नं पंडितराव आत - अचानक दुपारचे? चहाची लहर आली की काय? आणि हे कुठे आहेत? का लपलेत बाहेर?’’
  ‘‘वहिनी, तुम्ही आमच्याबरोबर आधी चला!’’
  ‘‘का, काय झालं? कुठे चलू? मला कळेल असं सांगा!’’
  ‘‘वहिनी, रमेशराव काही कामासाठी मोठ्या बँकेत जात होते स्कूटरवरून, मागून येणाºया भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. दवाखान्यात नेलंय, चला तुम्ही.’’ ‘अरे देवा!’ म्हणत मी खाली बसले, लगेच सावरले. गेले त्यांच्याबरोबर. दवाखान्यात गेले तर अध्याय संपलेला. माझ्यासमोर गडद अंधार. नातेवाईक आले, पाहुणे थांबले कसे तरी. मग एकेकाने पळ काढला. कुठे ही ब्याद सांभाळावी लागते म्हणून.
  अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली माझ्या शैक्षणिक योग्यतेनुसार. माझ्यासमोर एकच ध्येय होतं, ‘बंडूला मोठा करण्याचं!’ अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता, तसाच मला बंडूला मोठा झालेला पाहायचा होता. बंडू मोठा झाला, नोकरीला लागला. लग्न झालं, मुलंही झाली. तो बोलवायचा. आपणच केला होता विचार, ‘राहू दे त्यांना स्वतंत्र.’ निवृत्त झाल्यानंतर इथलं चंबुगबाळं आवरावं आणि जावं, हा विचार मनात आला. मीरा माझी पक्की मैत्रीण. तिच्याशी बोलले. ती म्हणाली, ‘‘सुमती, तुला मुला-नातवंडांत राहावं वाटणं साहजिक आहे. एकटेपण सोसलंयस खूप. पण मला...’’
  ‘‘काय मीरा? स्पष्ट बोल. तुला वाटतं की, बंडू मला विचारणार नाही म्हणून?’’ ‘‘तसं नाही सुमती. बंडू चांगला संस्कारित मुलगा आहे. तू जा नक्की त्याच्याकडे; पण इथली वासलात लावून जाऊ नकोस. सारखी जात राहा, त्यांना आणि तुला सवय होईल. असा निर्णय एकदम भावनेच्या भरात घेऊ नकोस. कारण सांगू? तुझ्या सुनेला, मुलाला स्वतंत्र राहण्याची सवय झालीय. त्यांच्या संसारात तुला किती स्थान असेल माहीत नाही. तिथे तुझी अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी फक्त सूचना. सारं गाठोडं बांधून जाऊ नये, असं मला वाटतं!’’ मीराच्या बोलण्यावर विचार करून मी आले इथे. आता दोन महिने झालेत. ‘त्यांच्या’ दिनक्रमात काही फरक नाही पडला. सारी सुखं माझ्या पायाशी लोळताहेत; पण मला पाहिजे मायेचा, आपुलकीचा शब्द. ती दोघं जातात साडेसातला आणि मुलं सातला! जाताना फक्त म्हणतात, ‘आई, आम्ही निघालो.’ संध्याकाळी म्हणतात, ‘आई, आम्ही दमलोय खूप!’ सकाळी साडेसातपासून सायंकाळपर्यंत एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटी. कामवाल्या काम करतात. ‘आजी आले, चालले’ म्हणतात! काम नाही, कुणाशी बोलणं नाही. टीव्ही तरी किती पाहावा? परत जावं आपल्या गावी. तिथे बोलणारे शेजारी आहेत. कामं आहेत. ‘‘Thank You Meera’’
  आज फार एकटं वाटतंय. मुकुंदाची आठवण येतेय. त्याच्याबरोबर जमेल तसं करावं काम. बंडूला सांगते, माझं उद्याचं परतीचं तिकीट काढ म्हणून. सुमती डायरीची पाने चाळू लागली. मुकुंदाचा फोन नंबर शोधण्यासाठी...

Trending