आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनस्‍वी साधकांचे नितळ जीवनचित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्मचरित्रे ही पोर्ट्रेटसारखी असतात, व्यक्तिमत्त्वसापेक्ष काही महत्त्वाच्या रेषांना इथे स्थान असते, फाफटपसारा दूर सारला जातो, लेखकाचे प्रामाणिक मत त्यामध्ये व्यक्त होत असते. ‘मार्गस्थ’ हे बा. भो. शास्त्री यांचे आत्मचरित्र हे असेच मोजक्या रंगांनी चितारलेले सुंदर चित्र आहे.

काही आत्मचरित्रे ही फोटोग्राफसारखी असतात. व्यक्तीसोबत त्याचा भोवताल आणि अनावश्यक अशा फाफटपसाऱ्याचं अपरिहार्य असं चित्रण त्यात आढळून येतं. पण म्हणून त्याचं चित्रण आत्मचरित्राच्या सारांशाला पोषक असतंच, असं नाही. काही आत्मचरित्रे ही पोर्ट्रेटसारखी असतात, व्यक्तिमत्त्वसापेक्ष काही महत्त्वाच्या रेषांना इथे स्थान असते, फाफटपसारा दूर सारला जातो, लेखकाचे प्रामाणिक मत त्यामध्ये व्यक्त होत असते. ‘मार्गस्थ’ हे बा. भो. शास्त्री यांचे आत्मचरित्र हे यातील दुसऱ्या प्रकारातील आहे. त्यात ना अनेक रंगांचा गोंधळ घातलेला आहे, ना ते एकरंगी आहे. मोजक्या रंगांनी चितारलेलं ते सुंदर चित्र आहे.
 
त्याची रंगसंगती जशी मनमोहक आहे, तशीच ती अर्थवाही आहे. केवळ वेधकच आहे, असे नाही; तर वेधून घेतल्यानंतर बोध देण्याची क्षमताही त्यामध्ये आहे. आत्मचरित्राला आजकाल साहित्यातला सेल्फी असं म्हटलं जातं, पण ते सेल्फीतल्या छायाचित्रासारखे नाही. सेल्फीतील छायाचित्र बेढब नि व्यंगात्म असतं. ते समजून बघावं लागतं. तसला गोंधळ वा अवघडलेपणा शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्त्वातच नाही, तर शब्दांत कुठून येणार?
 
थोडक्यात, हे आत्मचरित्र स्व-व्यक्तिमत्त्वसापेक्ष काही मोजक्या रंगांच्या रेषांनी काढलेलं सेल्फ-पोर्ट्रेट आहे. असं असूनही ते प्रामाणिक आहे, त्यात कुठलीही अहंमन्याची भूमिका नाही, आत्मप्रौढी नाही. आयुष्यात घडलेल्या घटना, गुदरलेले प्रसंग आणि कराव्या लागणाऱ्या तडजोडी यांची एक प्रामाणिक स्वीकृती त्यामध्ये आहे.
शास्त्रीबुवांचं वयाच्या वीस-एकवीस वर्षापर्यंत होणारं ‘सक्तीचं आणि हक्काचं’ शिक्षणच झालेलं नाही, हे ऐकून आपल्याला धक्का बसू शकतो. बऱ्याचदा अनेक उच्च विद्याविभूषित व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात पाठ्यपुस्तकांखेरीज काहीही वाचलेलं नाही आणि लिहिलेलंही नाही, हे कळल्यावरही असाच धक्का बसतो. मग यात विस्मयकारक काय आहे? पण यात काही साधर्म्य आणि वैधर्म्यही आहे. 

साधर्म्य केवळ धक्का बसण्याचे आहे आणि वैधर्म्य हे आहे की, त्या अज्ञान स्थितीतून ज्ञानसंपन्नतेकडे जाणारा एक प्रवास त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. केवळ एवढेच नाही, तर महंताची वस्त्रे अंगावर वागवण्याइतकी निर्वेद स्थितीही त्यांच्या अंगी बाणलेली आहे. शास्त्रीजींच्याच शब्दांत सांगायचं झालं तर ‘लहान मुलांचं अज्ञान हे अजाणता अज्ञान असतं व संन्याशाचं अज्ञान हे जाणतं अज्ञान असतं. त्यालाच शास्त्रीय भाषेत निर्वेद म्हणतात. वेद म्हणजे जाणणे व निर्वेद म्हणजे जाणून अजाण होणे.’ ज्ञानोत्तर उदासीनताच बंधनातून सुटका देणारी तटस्थता आणू शकते. ही निर्वेद स्थिती, तटस्थताच ‘मार्गस्थ’चे लेखन करताना शास्त्रीजींच्या लेखणीतून स्रवत होती, हे दिसून येते. 

पुस्तकात पानापानांतून आणि त्यातील प्रत्येक वाक्यातील शब्दांतून सर्वज्ञांविषयी आणि एकंदरच महानुभाव संप्रदायाविषयी सतत एक समर्पणाचा, श्रद्धेचा भाव स्रवत असल्याची जाणीव आपल्याला होत राहते. तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे, ‘काय वर्णूं मी या संतांचे उपकार । मज निरंतर जागविती।।’ असा एक सश्रद्ध भाव दिसून येतो. त्यातील ऋजुता ही पानापानांमधून डोकावत राहते. अंतर्मनातील भाव हे जास्तच हळुवार पण परिवर्तनशील आहेत, याची जाणीव आपल्याला होतच राहते. महानुभावीय साहित्याचं ते तसंही व्यवच्छेदक लक्षण आहे. महानुभाव साहित्यात असे मर्मस्पर्शी लेखन होतच असल्याचे पुरावे आहेत. 

मायमराठीच्या दालनात समृद्धता आणण्याचे काम महानुभाव साहित्याने केलेच आहे, आता आत्मचरित्राच्या दालनात प्रवेश करण्याचे नवे महाद्वार ‘मार्गस्थ’च्या निमित्ताने उघडत आहे, ही गोष्ट अत्यंत मोलाची आहे. अनुभवश्रीमंती ही खऱ्या अर्थाने माणसाला शहाणं बनवते. ती श्रीमंती शास्त्रीबुवांच्या लेखनातून जाणवत राहते. अतिशय साध्या, सोप्या शब्दांमध्ये तत्त्वज्ञानाची उकल करण्याची किमयाही त्यांना साधलेली आहे. उदाहरणं देतानाही ते व्यवहारातील सहज आढळणारी अशीच देतात. त्यासाठी कुठलीही ओढाताण केल्याचे जाणवत नाही. मांडणीमधील रसाळता, गोडवा त्यांच्यातील कीर्तनकाराचे दर्शन घडवताे. अत्यंत मार्मिक असे विनोद सगळीकडे विखुरलेले दिसून येतात, पण त्यामध्ये रंजन हा हेतू नसून एक अन्वयार्थ दडलेला असतो. 
 
म्हणूनच संप्रदाय आणि त्यातील आचारविचार, परंपरा आणि नवता, सर्वंकषता आणि पारदर्शिता, सर्वसमावेशकता आणि निष्ठा अशा अनेक वरकरणी विवादास्पद आणि बऱ्याचदा परस्परविरोधी वाटणाऱ्या पण सहजी आचरणीय अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह केलेले हे आत्मचरित्र अतिशय मौलिक असे आहे. केवळ महानुभाव साहित्याचा वाचकच नव्हे, तर इतरांनीही एका चिंतनशील व मनस्वी साधकाने स्वच्छपणे, प्रामाणिकपणे लिहिलेले आत्मचरित्र वाचावे असेच आहे. मराठी साहित्याच्या आत्मचरित्राच्या दालनामध्ये ‘मार्गस्थ’चे अस्तित्व प्रखरपणे जाणवावे, इतके ते महत्त्वपूर्ण आहे, हे नक्की!

मायमराठीच्या दालनात समृद्धता आणण्याचे काम महानुभाव साहित्याने केलेच आहे, आता आत्मचरित्राच्या दालनात प्रवेश करण्याचे नवे महाद्वार ‘मार्गस्थ’च्या निमित्ताने उघडत आहे, ही गोष्ट अत्यंत मोलाची आहे...
- मार्गस्थ     : भाग पहिला / पृष्ठे १५२ मूल्य ~ २००/-
- मार्गस्थ     : भाग दुसरा / पृष्ठे २०० मूल्य ~ २५०/-
- लेखक     : बा. भो. शास्त्री
- प्रकाशक : आदित्य प्रकाशन, औरंगाबाद
 
परोप‍कारी 'अवलिया' 
परोपकाराचा संस्कार माणसामध्ये कसा रुजतो? इतर माणसांप्रती निर्व्याज प्रेम माणसाच्या मनात कसं उमलतं? या दोन प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरं जगातल्या एकाही पुस्तकात मिळत नाहीत. जगातल्या एकाही विद्यापीठात परोपकारी जगण्याचा अभ्यासक्रम राबवला जात नाही. पण तरीही पावसाच्या पहिल्या सरीनंतर मातीतून सहजपणे कोंभ फुटावा, त्याप्रमाणे परोपकारी माणसं अपवादाने का होईना, जन्माला येत राहतात. त्यांची जात परोपकाराची असते, त्यांचा धर्म परोपकार हाच असतो. 

नाटक-सिनेमा-समाजसेवा-व्यवस्थापन-आयोजन असा चौफेर संचार असलेलं अशोक रघुनाथ कुळकर्णी हे असंच अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणारं, जिवाला जीव देणारं प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्व. या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावी आलेख म्हणजेच, अशोक शेवडे लिखित आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मनोज्ञ शिफारस आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना लाभलेले ‘अवलिया’ हे पुस्तक. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या-वाढलेल्या हुरहुन्नरी कुळकर्णींचं कार्यक्षेत्र एअर इंडिया ही हवाई कंपनी. दुसरा कुणी असता, तर त्या विश्वात गुरफटून गेला असता. 

पण नोकरीत असतानाच कुळकर्णींनी स्वत:पलीकडे जाऊन विविध क्षेत्रांतल्या माणसांशी नातं जोडलं. डॉ. काशिनाथ घाणेकर-शंकर घाणेकर-फैयाज, श्रीकांत मोघे, दादा कोंडके आदींसोबत नाटक-सिनेमांत हौसेखातर भूमिका साकारल्या. उ. बिसमिल्ला खाँच्या मैफलीपासून ‘बिन बायकांचा तमाशा’सारख्या लोककलेवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन केले. अमिताभ बच्चनला उद्घाटनला बोलावणाऱ्या नटुभाई टेलरपासून-प्रबोधनकार ठाकरेंवर आधारित मालिका बनवणाऱ्या कुमार शाहू आणि मुरादभाईंसारख्या चेहऱ्याच्या-बिनचेहऱ्यांच्या माणसांना अडीनडीला मदत केली. 

जे. आर. डी. टाटांपासून विजय मल्ल्यांपर्यंतच्या उद्योगपतींपर्यंत आणि शीलाबाय बापूसारख्या मॉरिशसच्या पंतप्रधानापासून परदेशातल्या भारतीय राजदूतांपर्यंत मराठी माणसांच्या हिताच्या गोष्टी पोहोचवल्या. एअर इंडियातल्या सहकाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून पुढाकार घेऊन युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया आदी देशांत नाटकांचे प्रयोग आयोजित केले. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, घरात गरजेपेक्षा अधिक असलेल्या वस्तू गरजू आदिवासींपर्यंत पोहोचवल्या आणि मग आसपासच्या सुहृदांना या दानयज्ञात मनोभावे सहभागीसुद्धा करून घेतलं. एकूणच, पदरी फारशी साधनसंपत्ती नसतानाही केवळ दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची ईर्षा माणसाला माणूस म्हणून किती उंचीवर घेऊन जाते, याचा वस्तुपाठ हे पुस्तक वाचकाला देतं.

पुस्तकाचे नाव : अवलिया  
लेखक : अशोक शेवडे 
प्रकाशक : अशोक कुळकर्णी  
किंमत : रुपये २५०/-  
संपर्क : ९९२०४४१०१०
बातम्या आणखी आहेत...