आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनानायकाचा चरितपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वतंत्र भारताचा 67 वर्षांचा कालखंड ज्या मोजक्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने गाजवला आहे, त्यात फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अवघ्या 18 दिवसांत पाकिस्तानवर मात करून बांगलादेशाच्या निर्मितीस हातभार लावला. या अजोड सेनानीच्या लष्करी कारकीर्दीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आलेख त्यांचे ए. डी. सी. असलेले मेजर जनरल शुभी सूद (निवृत्त) यांनी त्यांच्या ‘लीडरशिप’ या पुस्तकात चितारला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लष्करी अभ्यासाची पार्श्वभूमी असलेले लेखक भगवान दातार यांनी हा अनुवाद केला आहे.
शुभी सूद हे मुळात लष्करी अधिकारी असल्यामुळे त्यांच्या पुस्तकात असे ‘लेफ्ट-राइट’ वर्णनच जास्त असेल, असाच कुणाचाही समज होईल. पण मुळात सूद यांनी मूळ पुस्तक अतिशय हृद्य प्रसंगांनी चितारले आहे. मुळात हे व्यक्तिचरित्र नाही, तर तो एका फार मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला मागोवा आहे. योगायोगाने शुभी सूद हेही मोठ्या हुद्द्यावरचे लष्करी अधिकारी असल्याने चरित्र नायकाच्या मोठेपणापुढे ते कुठेही बुजलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वर्णनाला कुठेही स्तुतिपाठकत्वाचा किंवा अकारण कौतुकाचा स्पर्श होत नाही.

सॅम माणेकशा यांचं युद्धनेतृत्व, त्यांची लष्करी कारकीर्द आणि एका मोठ्या पदावरचा अधिकारी या नात्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. रणांगण गाजवणारे माणेकशा मुत्सद्दीपणातही तोडीस तोड होते; पण या सर्वांच्या पलीकडे एक सहृदय अधिकारी म्हणून त्यांची उंची आकाशाला भिडणारी होती, हे अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांतून सूद यांनी दाखवून दिले आहे. कोणत्याही लष्करी अधिका-याचे कार्यकर्तृत्व नेतृत्व, नैपुण्य, निग्रह आणि नि:स्पृहता या चार गुणांच्या निकषावर तपासता येते. फील्ड मार्शल माणेकशा हे या चारही गुणांच्या कसोटीवर पूर्णपणे उतरले आहेत. अंगावर नऊ गोळ्या झेलणारा हा बहाद्दर सैनिक युद्धपटावरील डावपेचांमध्येही तितकाच निपुण होता, हे अनेक प्रसंगांमधून आपणास जाणवते. ‘युद्ध कधी सुरू करायचं ते माझ्यावर सोपवा’, असं इंदिरा गांधी यांच्यासारख्या पंतप्रधानांना परखडपणे सांगणा-या या सेनापतीचा निग्रह नक्कीच वाखाणण्याजोगा होता. पण पुस्तक वाचताना सर्वात भावतो, तो या लष्करी अधिका-याच्या मनात दडलेला हळवा माणूस. म्हणूनच माणेकशा एका कनिष्ठ लष्करी अधिका-याला त्याच्या बॅगा उचलण्यात मदत करतात; खानसामा, धोबी, ऑर्डर्ली, वॉचमन यांच्यासाठी स्वत:च्या घरात दर तीन महिन्यांनी पार्टी आयोजित करतात; किंवा बेधडक खोटं बोलणा-या अधिका-यालाही समजून घेतात. अशा छोट्या छोट्या दिलखुलास प्रसंगांनी सूद यांनी हे पुस्तक सजवलं आहे.
याहीपलीकडे जाऊन सर्वात मनोज्ञ आणि हृदयाला भिडणारे असे दोन प्रसंग पुस्तकात आहेत. एक म्हणजे, भेटायला आलेल्या एका माजी सैनिकाची विचारपूस माणेकशा कमालीच्या आत्मीयतेने करतात, तो प्रसंग. त्या वेळी राज्यपालांनी भेटण्यासाठी दिलेल्या वेळेत उशीर होतोय, याचीही ते पर्वा करत नाहीत. सूद हे महत्त्वाच्या काळात माणेकशांबरोबर वावरत असल्याने युद्धाच्या मोठ्या कॅन्व्हासवरील डावपेच, लष्करप्रमुख आणि राजकीय प्रमुख यांचे व्यवहार व परस्पर संबंध, भारतासारख्या खंडप्राय देशातील लष्करासारख्या प्रचंड मोठ्या यंत्रणेचे प्रशासन यांचे वर्णनही त्यांनी नेमकेपणाने केले आहे. त्याचबरोबर काही बड्या नेत्यांच्या व अधिका-यांच्या मनाचा खुजेपणा समोर आणण्यात लेखकाने कुचराई केली नाही. लष्करातील कुरघोडीच्या राजकारणाचे किस्सेही लेखकाने दिले आहेत. विशेषत: जनरल कौल यांची कोती मनोवृत्ती आणि यशवंतराव चव्हाण यांचा धोरणीपणा आणि अन्याय दूर करण्याची कृती याविषयी सूद यांनी दिलेलं उदाहरण माणेकशा आणि यशवंतराव यांचं स्वभाववैशिष्ट्य स्पष्ट करणारं आहे.
दुर्मिळ छायाचित्रांमुळे हे पुस्तक अधिकच आकर्षक झालं आहे. अनुवादक भगवान दातार यांनी लिहिलेलं अभ्यासपूर्ण मनोगत हे पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य. त्यांनी म्हटल्याप्रमाणे दुस-या महायुद्धाच्या काळातल्या काही प्रमुख सेनानायकांच्या तुलनेत सॅम माणेकशा खरोखरच अतिशय श्रेष्ठ आणि अजोड सेनापती होते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचा लष्करी इतिहास आणि एका लष्करप्रमुखाच्या कामगिरीचा लेखाजोखा या दृष्टीने हे पुस्तक नक्कीच संग्राह्य आहे. मुखपृष्ठावरचं माणेकशांचं छायाचित्र मनात भरणारं आहेच; पण त्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवरचा हिरवा रंगसुद्धा फील्ड मार्शल पदावरील अधिका-याच्या गणवेशाच्या हिरव्या रंगाच्या छटेशी मिळताजुळता ठेवण्याची कल्पकता दाखवली आहे. भारतीय लष्कराच्या पराक्रमाच्या पर्वाच्या नायकाचं हे चरित्र वाचकांना अनंत काळ प्रेरणा देईल असे आहे.

फील्ड मार्शल सॅम माणेकशा
मूळ लेखक - मेजर जनरल शुभी सूद (निवृत्त), अनुवाद - भगवान दातार ,
रोहन प्रकाशन, पुणे. पृष्ठे : 210,
किंमत : 250/-