आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्‍थापन शैलीचा उपहासगर्भ वेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखिका माणिक खेर यांना औद्योगिक जगतातील व्यवस्थापनाविषयी संशोधन करत असताना जे वास्तव समोर आले, ते फार क्लेशकारक आणि अनेक अडचणींचे होते. तो वास्तवातील अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी थेट टोकदार भाषाशैलीचा वापर न करता उपहासात्मक भाषाशैली वापरली. हा लेखिकेचा सकारात्मक दृष्टिकोन कौतुकास्पदच आहे. ‘स्क्रिबल अँड क्विबल इन मॅनेजमेंट’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात त्यांनी औद्योगिक जगताचा ‘जाणिवांच्या पलीकडचा’ असा चेहरा वाचकांपुढे आणला आहे. शिवाय, त्या चेह-याआडचे दर्शन घडवताना त्यात अपेक्षित आणि अनपेक्षितपणे येणा-या नित्य अनुभवांना त्यांनी प्रसंगात्मक रूप दिले आहे, ते करताना मानवी स्पर्श देण्याचे भान त्यांनी जपले आहे. औद्योगिक व्यवस्थापनातील वास्तव स्वीकारताना त्यातले काय घेतले पाहिजे आणि काय टाकले पाहिजे, हे लक्षात घेऊन स्वत:ला कसे बदलायला पाहिजे, हेही लेखिका आपल्या अनुरूप भाषेत सांगते. त्यामुळे यातले प्रत्येक प्रकरण वाचताना वाचक अनुभव समृद्ध होतो. सहज, सोप्या, उपहासात्मक तरीही ललितरम्य शैलीतील हे इंग्रजी भाषेतील पुस्तक लेखिकेचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वही सिद्ध करते.


कोणत्याही क्षेत्रातील व्यवस्थापन हे आपल्याला किमान जाणून घेणे गरजेचे असते. मात्र, आपण त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. व्यवस्थापनाच्या विविध संकल्पना समजून घेण्यासाठी ‘स्क्रिबल अँड क्विबल इन मॅनेजमेंट’ यासारखी पुस्तके वाचकांसमोर येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थापनामध्ये उत्पादनाच्या इतर घटकांपेक्षा मानवी घटक अधिक महत्त्वाचा व श्रेष्ठ आहे. त्याचबरोबर व्यवस्थापन हे काही मूल्यनिरपेक्ष शास्त्र नाही; तर ते एक व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त असे ज्ञानभांडार आहे. व्यवस्थापनाची गुणवत्ता त्याच्या व्यावहारिक फलनिष्पत्तीवर अवलंबून असते, याची जाण लेखिकेला असल्याने प्रत्येक प्रकरणात मानवी संभाषण व कृती यांचा वेध घेताना नर्मविनोदी शैलीत लेखिकेने त्यावर नेमके भाष्य केल्याने ते अधिक परिणामकारक ठरते. या पुस्तकाचे हेच खास वैशिष्ट्य आहे. या पुस्तकातील प्रकरणांना साजेशी आणि समर्पक अशी रेखाचित्रे मराठी प्रकाशन विश्वातील ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकरांनी काढल्याने लेखिकेच्या औद्योगिक व्यवस्थापनाबाबतच्या विचारांना अधिक उठाव प्राप्त झाला आहे.
पुस्तकाचे नाव : स्क्रिबल अँड क्विबल इन मॅनेजमेंट
प्रकाशक : अ‍ॅने बुक्स प्रा. लि.
पृष्ठ संख्या : 126, मूल्य : 195/-