आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artical Of Dr.Sangita Deshpande On Rice Khir\'s Important

तांदळाच्या खिरीचे महत्त्व

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील लेखामध्ये सण व आहाराचे महत्त्व याबद्दलची प्राथमिक माहिती बघितली. या काळात केले जाणारे पदार्थ ऋतू व त्यामुळे होणारे शरीरातील बदल यावर अवलंबून असतात. श्रावणात अनेक उपवास असतात. हा वर्षाऋतूतील महिना असून यामध्ये वातप्रकोप असतो व पित्त मंदावते. म्हणून पचावयास हलका पण वातशामक असा आहार उपयोजिला जातो. याकरिताच ज्वारीच्या लाह्या एक प्रातिनिधिक स्वरूपाचा आहार समजला जातो. त्याचबरोबर एक वेळ जेवून उपवास केल्याने दोषप्रकोप व वातप्रकोपसुद्धा होत नाही. पचन व्यवस्थित होऊन आरोग्य चांगले राहते म्हणजे अंगदुखी, सांध्यातील वेदना, पचनाचे विकार, संसर्गजन्य विकार यांवर नियंत्रण राहाते व मंद झालेल्या अग्नीस बळ मिळते. या दिवसांमध्ये अग्निमांद्य (भूक कमी लागणे) असल्याने अल्पाहाराचा पुरस्कार केलेला आहे. अल्पाहारासोबतच वातप्रकोपामुळे स्निग्ध पदार्थ अल्प प्रमाणात घेण्याची प्रथा आहे म्हणून उपवास योजलेले आहेत.


श्रावणमासानंतर भाद्रपद सुरू होऊन गणपती व महालक्ष्मी हे सण येतात. या काळात अग्निमांद्य कमी होऊन वाताचे प्रशम होण्यास चालू होते व पित्तदोष वाढण्यास सुरू होतो. परिणामी पचनशक्ती वाढीस लागते. म्हणून अग्नीला बल देणारे व पित्त व वातदोषाला नियंत्रण ठेवणारे पंचखाद्य उकडीच्या मोदकातून खाण्याचा रिवाज आहे. तसेच अनारसे/ करंज्या हे पदार्थ महालक्ष्मीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे. महालक्ष्म्यांमध्ये 16 भाज्या, पुरणपोळी, पडवळाची कढी असे पदार्थ करतात. भाज्या सर्वसाधारणपणे कडू व तुरट चवीच्या असल्याने तीनही दोषांवर नियंत्रण ठेवतात. साजूक तूप घातलेली पुरणपोळी वातदोषावर नियंत्रण ठेवते. ऋतुचक्राचा शरीरावर विशिष्ट परिणाम होत असल्याने असे पदार्थ सेवन करणे सयुक्तिक वाटते. गणपती विसर्जनाच्या वेळी ब-याच कुटुंबामध्ये घारगे करण्याची प्रथा आहे. लाल भोपळा, गव्हाचे पीठ व गूळ यांचा हा पदार्थ होत असून अग्निवर्धक व बलकारक आहे. त्याचबरोबर येणा-या पक्षपंधरवड्यात तांदळाची खीर करतात.


यानंतर येणा-या शरद ऋतूत (ऑक्टोबर) नवरात्राची सुरुवात होते. या ऋतूत पित्ताचे आजार वाढत असून कफाची वाढ होण्यास सुरुवात होते. शरदऋतूत अग्नी प्रद्युप्त झालेला असतो. शरीराची पचनक्षमता खूप वाढलेली असते व येणा-या थंडीस तोंड देण्यासाठी शरीराची तयारी करून घ्यावी लागते. म्हणून भूक वाढणारे व शरीराला बळ देणारे विविध पदार्थ नवरात्रात सेवन केले जातात. त्यात दुधाचा भरपूर उपयोग केला जातो. दस-याला पुरणपोळी व श्रीखंडाचा बेत महाराष्ट्रीय लोकांमध्ये असतो. असेच जड पदार्थ पचवण्याची क्षमता शरीरामध्ये आलेली असते म्हणून या दिवसांमध्ये भरपूर खावे व व्यायाम करावा. शरदाच्या चांदण्यात केलेले कोजागरीचे दूधसुद्धा याला अपवाद ठरत नाही. शरद ऋतूमुळे प्रज्वलित झालेल्या शारीरिक अग्नीची जड पदार्थ पचवण्याची क्षमता असल्याने दिवाळी, कोजागरी, दसरा या सणांना जड पदार्थ करण्याची प्रथा असावी. कार्तिक मासामध्ये काकड आरती, नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज हे सण येतात. हे सर्व सण हेमंत ऋतूमध्ये येतात. हेमंत ऋतूमध्ये अग्नीचे अत्यधिक प्राबल्य असल्याने शारीरिक धातू पोषणासाठी स्वस्थ व्यक्तींनी या दिवसांमध्ये स्निग्ध, गुरू (पचावयास जड) व शरीरातील धातूंना (बॉडी टिश्यूज) बल देणारा आहार सेवन करणे अपेक्षित असते. व असा आहार घेतल्यास व दूध, सुका मेवा, तूप, डिंकाचे लाडू यांसारख्या पदार्थांचा या दिवसात वापर केल्यास आरोग्याची दिवाळी वर्षभर साजरी करता येते.