आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत वस्त्रकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सा-या जगभरात जर कुठे असं एखादं ठिकाण असेल जिथे वस्त्रही एक स्वतंत्र कला म्हणून जपली गेली आहे, प्रगत झाली आहे व होतच राहते आहे, तर ते ठिकाण म्हणजे आपला भारत. इथल्या ठिकठिकाणच्या साड्या आपण पाहिल्या, आणखीही पाहू. मात्र पावसाच्या सरींची मजा लुटायची तर साडीचा घोळ थोडा आवरता घेऊ व इतर पोषाखांकडे बघू. पोषाख कुठलाही म्हटला तरी त्यास लागणारे कापड. हे तयार करण्याची आपल्याकडे श्रीमंत परंपरा आहे. किंबहुना साड्या विणण्याच्या परंपरेचं श्रेयही याच मूळ परंपरेला जातं.


खरंच, कापड कसं विविधतेने तयार करावं हे कुणी येथूनच शिकावं. ते सजवताना, खुलवताना अनेकविध पैलूंचा विचार झालेला आढळतो. त्यापासून होणारा पोषाख (अथवा अ‍ॅक्सेसरी) काय, कशी असेल, तो पेहराव परिधान करणारा/री कोण आहे, ती व्यक्ती तो पेहराव कुठे वा कधी घालेल, त्या स्थळ-काळाचे संकेत/नियम काय असतील, स्थानिक हवामानास ते अनुकूल असतील, इ. सर्व अंगांनी विचार केल्यामुळे आपल्याकडील वस्त्रांमध्ये लक्षणीय वैविध्य आहे. वस्त्रांचा मागोवा घेत गेलो तर पार मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृतीपर्यंत आपण जाऊन पोहोचतो. तेथील अवशेषांमध्ये आपल्याला (गृहोपयोगी वस्तूंबरोबर) लाकडी अथवा प्राण्यांच्या अस्थींपासून तयार केलेल्या २स्र्रल्ल’िी२ प्राप्त झाल्या आहेत. म्हणजे तेव्हाचे लोक घरोघरी सूत कातून कापड विणत असावेत. तसेच तेव्हाच्या कापडांचे काही अवशेषही हेच सिद्ध करतात. ऋग्वेदात (प्रथमच) विणलेल्या कापडाचा रीतसर लेखी उल्लेख दिसतो. रामायण, महाभारतामध्ये तर याची विस्तृत उदाहरणे सापडतात. त्यावरून आपल्याला राजसभेत वा इतर वेळेस परिधान करण्याची वस्त्रे कशी वेगवेगळी होते ते समजते. त्याचबरोबर ऋषी-मुनींची व गृहस्थांची वापरातील वस्त्रे कशी होती हेही कळते.


बरीचशी माहिती मौर्य व गुप्तकालीन मूर्तींच्या माध्यमातूनही कळते. बुद्धकालीन मूर्ती व भित्तिचित्रं ही आपल्याला तत्कालीन फॅशन्सचा स्पष्ट अंदाज देतात. तेव्हाच्या आख्यायिकेप्रमाणे वैशालीस्थित आम्रपाली जेव्हा बुद्धाची भेट घ्यावयास गेली तेव्हा तिने कशी भरजरी साडी नेसली होती याची वर्णने उपलब्ध आहेत. त्यावरून आपल्या या क्षेत्रातील तांत्रिक प्रगती अधोरेखित होते.


भारताचे इतर देशांशी असलेले (त्या निमित्ताने) औद्योगिक व व्यापार संबंध आपल्याला शालेय जीवनातील पुस्तकांमुळे चांगलेच परिचित आहेत. इसवी युगात, खास करून येथील रेशमाला कशी रोममध्ये मागणी होती तसेच गुजरातेत तयार झालेले सुती कापड व त्याचे अवशेष थेट फोस्टाट (म्हणजेच आजचे कैरो, इजिप्तची राजधानी) येथे आढळतात. कारण तेथील राजेशाही कबरींमधून यांचा विशिष्ट वापर असे. चीनशी जोडणारा ‘सिल्क रूट’ व त्यावरून निर्यात होणारे सुती कापड आपल्याला माहीत आहेच. तसेच 13 व्या शतकात इंडोनेशियाला खास दक्षिण भारतीय रेशीम निर्यात होत होते. जावा, चीन, फिलिपाइन्स व युरोपमधील अनेक देशांमध्ये भारतीय प्रिंटेड सुताला (चिंट्झला) लक्षणीय मागणीय होती. त्या काळी भारतीय रेशीम बलुतेदारीसाठी अत्यंत उपयोगी होते. युरोपमधून आलेल्या अनेक मौल्यवान वस्तू याच प्रकारे आपल्याकडे आल्या होत्या. 17 व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमार्फत रेशीम व मस्लिन सूत जात असे. हे खासकरून ढाका, बंगाल, बिहार व ओरिसा येथे तयार होत असे. त्यामुळे आजही त्यांच्या कलाकुसरीत तत्कालीन मोटिफ्सचा ठसा उमटलेला दिसतो. सुरत हे तर सर्वात प्राचीन व बिझी असे व्यापारी ठिकाण होते - दोहोंसाठी - सुती व जरीच्या विणकामासाठी व आयात-निर्यातीसाठी. येथून आपल्याला दक्षिणपूर्व आशिया, आखाती देश व पूर्व आफ्रिकेशी संबंध ठेवणं खूप सोपं होत असे. मुगलकालीन जरीची पगडी, बुरखे इ. सर्व येथीलच. एक ना अनेक गोष्टी, आख्यायिका! त्यापेक्षा कैकपट जास्त कापडं, वस्त्रं. तर अशा व्यक्ती तितक्या प्रकृती, नव्हे वस्त्रं, आपण पाहू येथून पुढे.