आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाट वळणाची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड जिल्ह्यातील सुधागडाच्या पायथ्याचे धोंडसं हे चिटुकले गाव. धोंडसं! नावातच गोडवा नाही, तिथे कसल्या गोड आठवणी? बरे, धोंडसं नावाचे गाव हिरवाईने निसर्गसंपन्न आहे, हे तरी कसे पटावे? पाण्याची सोय होती. गड चढण्यापूर्वी न्याहरीचा बेत आखला. शनिवारची सकाळ. शेजारीच या चिटुकल्या गावाची पिटुकली शाळा भरली होती. अशी शाळा म्हणजे एक मोठा वर्ग. आमचे चरणे चालले होते आणि एका जबरदस्त आवाजाने आमची तंद्री भंग पावली...


एका बाईचा आवाज, एकदम वरच्या पट्टीतला. एका माणसासमवेत जोरात भांडणाचा. त्या एकवर्गी शाळेची ती शिक्षिका होती. कुणी विद्यार्थ्याने बाईविषयी तक्रार केली असावी. पालक तावातावाने भांडत होता. मग जुंपली. वर्गातली सारी पोरं चिडीचूप.


हे भांडण म्हणजे केवळ वरच्या पट्टीतली सुरावट नव्हती, तर भाषा कमालीची अर्वाच्य. धोंडसं नावाला शोभेशी. बाईच्या मुखातून अशा काही शिव्या ओसंडत होत्या की ‘सखाराम बाइंडर’ने मान तुकवावी. ही शिक्षिकाच अशी, तर विद्यार्थ्यांचे काय? पुढच्या पिढीवर कसले संस्कार होणार? आमच्या पांढरपेशी शंका. जाने दो, आम्ही आपले न्याहरी करतोय. भांडणाची अखेर, अर्थात अपेक्षितच. मुलुखमैदानी आवाजामुळे मर्दानी गोलंदाजाने शरणागती पत्करली.
आमचे खाणे संपत असताना, एक मंजुळ आवाज कानावर पडला. बाईचा आवाज. एक सुंदर गीत ती गात होती, ‘मला आवडते वाट वळणाची.’ कवी अनिलांचे गीत, हे समजण्याइतपत आम्ही रसिक होतो. परंतु तो जादुई आवाज कुणाचा?


आवाज शाळेतूनच येत होता. आश्चर्य म्हणजे ज्या नरड्यातून काही मिनिटांपूर्वी लाखोली बाहेर पडली होती, त्याच गळ्यातून हा स्वर्गीय आवाज बहरत होता! बहुधा पाठ्यपुस्तकात ती कविता असावी. बाईने ओळ म्हणून झाली की पाठोपाठ पोरंही त्याच तालात आळवायची - मला आवडते वाट वळणाची...


त्या आवाजाने आमची पावले थबकली. ऐकत राहावेसे वाटले. काही क्षणांपूर्वी ज्या नरड्यातून शिव्यांची लाखोली ओसंडत होती, तोच गळा गानकोकिळेचा असू शकतो? केवढा विरोधाभास!
वाट वळणाची! गावही आडवळणाचे. सुधागडचीही वाट वळणाची. अनिलांनी जणू याच वाटेवर हे गीत रचले असावे. दाट झाडीची नागमोडीची, सरधरणीची पायफसणीची, लवणावरची पानबसणीची, भुलवाणीची हुलकावणीची, साग वेळूच्या भररानीची, जरा अडचणीची चढ-उतरणीची, क्षितिजाकडची पुढची पुढची... त्या बोलांबरोबर सुधागडची वाट अक्षरश: जिवंत होत होती.


बाईच्या गायनाने अनिलांचे बोल जिवंत झाले होते. रानावनातून मोकाट सुटलेला हा खडा आवाज. सुधागडाच्या खड्या कडांना आव्हान देणारा! सुरेख आवाजाचा साज. चाल तरी काय अप्रतिम लावली होती बाईने! रानपाखराच्या शिळेसारखा अलगद, सहज, सुंदर! ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ यापेक्षा वेगळं काय असतं? श्यामा पक्ष्याने साद घालावी, तसा तो आवाज घुमत होता. ‘वळणाची’ शब्दातील ‘णाची’वर मस्त गिरकी! रानपाखराने प्रियतमेभवती पिंगा घालावा तशी. तो ताल, तो ठेका अविस्मरणीय.


अर्वाच्य शिव्या देणा-या त्या बाईविषयी मनात उठलेले काहूर कुठल्या कुठे विरून गेले. शिव्या! तेही रानगट प्रकटन आणि हा मोकळा आवाज! हीदेखील रान देणगी. वन भेदून टाकणारी रानपाखरावाणी खुल्या दिलाची ही गायकी. बहुधा, सुधागडाच्या वृक्षवल्लींच्या, रानपाखरांच्या सहवासाचा तो परिपाक. रानावनातून हिंदळणा-या पोरांना, त्यांच्या बार्इंना ते साजेसेच होते.


आम्हीदेखील रानभटके. आडवळणी वाटेचे साथी. ठरले, अनिलांचे हे गीत आमचे झाले. परंतु जातच पिचकी. सोनाराच्या फुंकणीवाणी. वेळूच्या बनातून सुटलेल्या वा-याचा घोंगावता सहज साद त्यात कुठून येणार?
वाटू लागले, अनिलांनी हे गीत रचले, धोंडशाच्या बाईसाठी, कदाचित तिथल्या पोराटोरांसाठीही...