आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकवेल ऑलवेज रॉक्स!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात लोकप्रिय चित्रकार कोण, असे विचारल्यास पिकासो हे उत्तर येऊ शकते; पण पिकासो ‘अवां गार्द’ (विसाव्या शतकाच्या प्रारंभी युरोपात चित्र-साहित्य-समाजकारण क्षेत्रांत सुरू झालेली पुरोगामी चळवळ) चळवळीचा प्रभाव असलेला चित्रकार होता, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकप्रियतेत कदाचित नॉर्मन रॉकवेलच बाजी मारून जाण्याची शक्यता आहे.
नॉर्मन रॉकवेलची ट्रिपल सेल्फ पोट्रेट किंवा ‘फ्रीडम फ्रॉम फिअर, प्रॉब्लेम्स वी ऑल लिव्ह विथ, नो स्विमिंग, होम कमिंग यासारखी चित्रे पाहिली, की त्याच्या लोकप्रियतेचे रहस्य उलगडते. कधीही गॅलरीत न जाणार्‍या दर्शकालाही ही चित्रे भिडू शकतात. कारण ती सरळ रेखाटने आहेत. यातील ‘होम कमिंग’ या चित्रातील तरुणी पाहा. तिचे आणि परतणार्‍या सैनिकाचे गोड नाते आहे. मात्र ते चित्रकाराने अत्यंत तरलपणे व्यक्त केले आहे. सैनिकाचे स्वागत करण्यासाठी शेजार- पाजारचे लोक सज्ज झाले, तरी ती मात्र हलकेच मान वळवून भिंतीआडून अत्यंत सलज्जपणे त्याला निरखते आहे. हेच रॉकवेलचे वैशिष्ट्य. बारीकसारीक सर्व तपशील तो चित्रात एखाद्या कथा-कादंबरीप्रमाणे गुंफत जातो...
रॉकवेलने चित्र काढली ती मुख्यपणे ‘सॅटर्डे इव्हनिंग पोस्ट’ साप्ताहिकासाठी. त्याचा खप त्या काळात वीस लाख इतका होता. साहजिकच, नॉर्मन रॉकवेलची लोकप्रियता अफाट होती. त्याचे चित्र पाहिले नाही, असा सुशिक्षित अमेरिकन नव्हता. रॉकवेलच्या चित्रांना कुणीतरी बोधचित्र असे म्हटले आहे. रॉकवेलची चित्रे संस्कार करणारी निश्चित होती. मागच्याच आठवड्यात उल्लेख केलेल्या ‘चांदोबा’शी त्याचे जवळचे नाते आहे. ‘आबालवृद्धांना आवडतील, अशी त्याची शैली होती. स्वेट जॅकेटची चकाकी, चमचमणारी काचेची पात्रे, पडद्यामागून येणारा उजेड... हे सारे तो जिवंत करत असे.’
रेखाटन करणारे चित्रकार अनेकदा वेगवान आकृत्या काढणे नाकारतात. रॉकवेलच्या चित्रात अनेकदा पळणारी मुले, धावणारी माणसे दिसत. हे सारे तो कसे करायचा? अलीकडे त्याचे रहस्य उलगडले आहे. खूपदा तो मॉडेल घेऊन त्यांची छायाचित्रे वापरत असे. तरुण मुलांच्या डेटिंगचे किंवा रेशनिंग आॅफिसमधल्या गर्दीचे चित्रण करताना त्याने अशी मॉडेल्स विपुल प्रमाणात वापरली आहेत. त्यातील काही छायाचित्रे अलीकडे प्रसिद्धही झाली व काही मॉडेल्सचे एकत्रीकरणही (गेट टुगेदर) झाले. खरे तर चित्र काढताना फोटोचा वापर काही निषिद्ध नव्हे. आपल्याकडे अनेक चित्रकार हे तंत्र वापरतातच; पण चित्रकाराला समोर चित्र काढता यायला हवे, असा एक समज झाला आहे. त्यामुळे बर्‍याचदा छायाचित्र वापरून चित्र काढणारा चित्रकार भोपळा लावून पोहणार्‍यासारखा अमॅच्युअर मानला जातो.
नॉर्मन रॉकवेलच्या चित्रांना अफाट लोकप्रियता लाभूनही टीकाकारांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्याला कारण रॉकवेलची चित्रे प्रामुख्याने कॅलेंडर्स, जाहिराती, मुखपृष्ठ आणि कथा- कादंबर्‍यांची रेखाटने म्हणूनच प्रसिद्ध झाली; पण आता मात्र समीक्षकांनी नाक मुरडणे थांबवले आहे. रॉबर्ट ह्युजेससारख्या ज्येष्ठ समीक्षकाने आपल्या समीक्षानिबंध संग्रहात रॉकवेलला (नथिंग इफ नॉट क्रिटिकल - संग्रहाचे नाव) मानाचे स्थान दिले आहे. अलीकडेच बिल गेट्सने नॉर्मन रॉकवेलची उपलब्ध असलेली सारी चित्रे विकत घेतली.
अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी चार प्रकारचे स्वातंत्र्य जाहीर केले. 1) गरजांपासून मुक्ती 2) भीतीपासून मुक्ती 3) भाषण स्वातंत्र्य 4) हव्या त्या पद्धतीने भक्ती करण्याचे स्वातंत्र्य. या चारहीवर रॉकवेलने चित्र केले. युद्ध सुरू झाले तेव्हा पालक आपल्या मुलांना झोपवतात, असे एक चित्र त्याने केले. युद्धकाळात भयभीत झालेल्यांना आश्वासक वाटेल, असे ते चित्र होते. तरुण वयातील फ्लर्टिंग, मुलीचे वयात येणे, यासारख्या विषयांवरची त्याची चित्रे ही कथा या वाङ्मय प्रकाराशी साम्य सांगतात. त्यामुळे त्याची चित्रे घटनेमागची व पुढची सूत्रे काय असतील, यांचा विचार करायला लावतात. उदा. ‘द प्रॉब्लेम वी लिव्ह विथ’, ‘मुव्हिंग इन’ ही दोन्ही चित्रे घ्या. एका कृष्णवर्णीय मुलीला परीक्षेला जायला सरकारी अधिकारी मदत करत आहेत. ती जिथून पुढे सरकली, तिथे नुकताच भिंतीवर टोमॅटो फेकला आहे. काळ्या-गोर्‍यांच्या द्वेषाने अमेरिका पिचून गेली होती, तेव्हाचे हे चित्र आहे. याचीच समांतर बाजू ‘मुव्हिंग इन’ या चित्रात दिसते. नवे शेजारी राहायला आले आहेत, पण हे शेजारी कृष्णवर्णीय आहेत. वर्णद्वेषाचा वारा न लागलेली ही गोरी मुले त्यांना निरखून पाहात आहेत. त्यांची देहबोली, कपडे, कपड्यांवरच्या चुण्या पार्श्वभूमीला दिसणारी समृद्ध वसाहत, ट्रक या सार्‍यातून रॉकवेलने जे साधले, ते पाहण्यासारखे आहे. अमेरिकेचा आणि जगभरातल्या लोकांचा हा लाडका चित्रकार का आहे, त्याचा ही चित्रे भरभक्कम पुरावा आहेत.
(shashibooks@gmail.com)