आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊसवेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘चार दिवस झाले अगदी लागून राहिला आहे. वैताग आणलाय याने! थांबायचे मुळी नावच घेत नाही. सगळीकडे नुसती चिकचिक! कपडे सुकत नाहीत की कुठे बाहेर पडता येत नाही.’ पावसाचे हे वर्णन ऐकून 14 वर्षे लोटली. आईचे हे बोल कित्येक वर्षांत ऐकले नाहीत.

माझ्या लहानपणी मी माहेरी असाच पाऊस अनुभवला आहे. आवडत्या ऋतूचा तो धुंद बहर! मनाचं अगदी प्राजक्ताचं फूल होऊन जायचं. सगळा पावसाळा भरून पाऊस रिमझिम पडत, असाच टपटपत राहायचा. दिवसाच पडलेला अंधार, हवाहवासा संधिप्रकाश, हवेत सुखद गारवा... त्यातच शाळेत रोज जाणं, लांब केसांच्या दोन छान वेण्या, पाठीवर दप्तर, पांढरा शर्ट, निळा स्कर्ट, त्यावर पावसाची अगदी खालच्या किनारीपासून वर कंबरेपर्यंत ठिपक्यांची नक्षी! खरं तर पावसात भिजत जाण्याची अनिवार इच्छा, पण दप्तरातल्या पुस्तकांसाठी डोक्यावर छत्री असायची, तिला सावरता सावरता नाकी नऊ यायचे. त्यातच पावसाने निसरडा झालेला रस्ता अंत पाही. तरी आवडत्या माणसाचा त्रासही सुखद असतो तसा तो त्रास वाटायचा नाही. शाळेतही धडे शिकताना तो बाहेर छान पडत राहायचा. त्याच्या नादमधुर संगीताने भान हरपून जायचे. मग मनाचा मोर अभ्यासापेक्षा वर्गाबाहेरच नाचत राहायचा. पाऊस माझ्यासाठी अक्षय आनंदाचा ठेवा! तो आला की आठवणींचे पक्षी उडत मनाच्या फांदीवर येतात, उसळत्या पावसात फेर धरून नाचतात. मनातली सारी मरगळ निघून जाते. आयुष्याला पुन्हा एकदा नवतेज लाभते. मला वेडावणारा हा पाऊस मात्र आता खरंच हरवला आहे. गेली दोन वर्षे तो मनासारखा बरसलाच नाही. शेतातली काळी कोरडी माती त्याच्यासाठी आसुसलेली आहे. ओढे, नद्या-नाले सारेच त्याच्या वाटेकडे टक लावून पाहत आहेत. ढग येतात अन् वार्‍यासोबतच निघून जातात. तो या वर्षीही मनासारखा पडला नाही तर नद्या कशा भरणार? धरणे कधी भरणार? कूपनलिकांना पाणी कुठून येणार? जनावरांचे काय होणार, दुष्काळ कसा दूर होणार, आधीच दुष्काळाने शेतकर्‍याचा जीव उडून गेला आहे. पावसाची वाट पाहणं खरंच किती जीवघेणं! तो असा कसा वागतो? एकीकडे वेड्यासारखा यमदूत होऊन बरसतो तर दुसरीकडे दुष्काळाने भाजून काढतो. तो आज तरी आपल्या सर्वांना हवा आहे. शेतातल्या पिकांसाठी, गुराढोरांसाठी, पाखरांसाठी, विहिरीसाठी, नद्यांसाठी अन्न-धान्याच्या शिगोशीग पोत्यांसाठी हवा आहे. जगण्यासाठी, जगवण्यासाठी हवा आहे, चला त्याला विनवूया...