आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंपूची रंगपंचमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंपू (वय - १३ महिने)
 
धुळवडीला शेजारणीने तिच्या मुलाकडे रंगाची पुडी मागितली. त्याने सरळ रंगांच्या पुड्या ठेवलेली एक छोटी बादली तिला आणून दिली. तिने त्या बादलीतला एक रंग चिमूटभर घेतला आणि माझ्या गालाला लावला. मग बाकीच्या शेजारणीपण धावत आल्या. त्यातल्या एकीने एक पुडी बादलीत पालथी केली, त्यात थोडे पाणी मिसळले आणि तो रंगीत चिखल मला लावला. बाकीच्यांनीही परत एकदा चिमूट-चिमूट घेऊन हातभार लावला.
 
आता हा सगळा प्रकार झाला आमच्या चिरंजीवांसमोर; ज्यांना आधी वाटलं की, या सगळ्या काकी मिळून आईला मारतायत. म्हणून हा लागला जोरात किंचाळायला. एकतर मी याला कडेवर घेऊन उभी, त्यात मैत्रिणी रंग लावतायत तो डोळ्यात जाऊ नये म्हणून मी डोळे बंद केलेत आणि हा अगदी माझ्या कानात ओरडतोय. समोर मैत्रिणींचा गलबला, हा का किंचाळतोय, काय लागलं?/चावलं?/टोचलं?
 
“अर्रे थांबा,” जोरात ओरडून सगळ्यांना गप्प केलं आणि युगकडे वळले. त्याचा हा प्रकार माझ्या चांगलाच परिचयाचा झालाय. मैत्रिणीने माझ्या गालाला हात लावला आणि मी डोळे मिटून घेतले म्हणजे मला रडू आलेय, असा अंदाज बांधून तो किंचाळला. एरवीही कोणा दोघांमध्ये चाललेली शाब्दिक बाचाबाची खपत नाही याला. याच्यासमोर खोटी मारामारी केली तरी असाच किंचाळतो. एक नंबर अहिंसावादी आहे. आतातर आईला कोणीतरी रडवलंय असं वाटत होतं म्हणून किंचाळला आणि लगेच रडका पाउट काढून धुसफुस सुरू केली. “अरे सोना काय झालं? मला कोणी नाही मारलं. हे बघ मी हसतेय, हीही..” बोलून त्याला शांत केलं. मग “अरे काकी तर आपल्याला हॅप्पी होली विश करतायत ना? हे घे, तू पण कर,” समजावत त्याच्या बोटांच्या चिमटीने बादलीतला रंग घेऊन माझ्या गालाला लावला. आणि मी बळेच खूष होऊन त्याच्याकडे बघितलं. लगेच साहेबांची कळी खुलली, बाकीच्या मैत्रिणींनीपण गाल पुढे करून त्याच्याकडून रंग लावून घेतला. मग शेजारच्या सगळ्या दादाताईंना पण त्याने असाच रंग लावला. आणि मस्त एन्जॉय केला दिवस. पण त्या दिवशीच्या या प्रकारामुळे ‘बादलीतलं चिमूटभर पाणी घेऊन समोरच्याच्या गालाला लावलं की, तो माणूस खूष होतो,’ असा काहीतरी गोड गैरसमज झालाय वाटतं त्याचा. आता रोजच त्याला अंघोळीला नेलं की, तो चिमटीने बादलीतलं पाणी घेऊन माझ्या गालाला लावतोय. आणखी किती दिवस ही अशी रंगपंचमी चालणार देव जाणे. पण मला तरी रोज त्याच्या हाताने गालाला पाणी लावून घ्यायला मजा येतेय.
 
rups.patankar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...