आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होम मिनिस्‍टर संमेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
-हॅलो मी प्राची बोलतेय. तुमच्या संस्थेबद्दल मी ऐकलंय. मला काही मदत करू शकता का?
-काय मदत हवी आहे?
-मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, स्वत:चं घर आहे. हाउस हसबंड हवा आहे. तो हाउस हसबंड असला तरी त्याला त्याचा पूर्ण सन्मान मिळेल. फक्त नोकरी मी करीन आणि कुटुंब त्याने सांभाळावं. त्याच्या सर्व कामांचा तितकाच मान राखला जाईल जितका त्याने नोकरी केल्याने, याची हमी मी देते.

हा संवाद बदलत्या काळाची चुणूक दाखवणारा आहे. महिला आणि पुरुष यांच्या कामाची शतकानुशतके झालेली विभागणी आज बदलू पाहत आहे. तरुणींनाच नव्हे तर महिलांनाही आता घरकामात पुरुषांनी नुसती मदत करू नये, तर जबाबदारी घ्यायला हवी असे प्रकर्षाने वाटू लागले आहे. ही नव्या बदलाची नांदी म्हणायला हरकत नाही.

नुकतेच औरंगाबादेत राज्यातील पहिले गृहिणी संमेलन झाले. या संमेलनाचे आयोजन विविधांगाने महिलांची मदत करण्यासाठी कार्यरत असलेल्या सजग महिला संघर्ष समितीने केले होते. यापूर्वीही या समितीने सासू संमेलन, सून संमेलनाचे आयोजन करून समाजाचे लक्ष वेधले होते. दिवसभराचे संमेलन घडवून आणायचे अन इतरांचे लक्ष वेधायचे हा यामागील उद्देश मुळीच नाही. तर संमेलनाच्या माध्यमातून समाजाच्या मानसिक जडणघडणीत भरीव योगदान देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न उपस्थितांना दिवसभराच्या सर्व कार्यक्रमांत दिसून आला.
यावेळी महिलांकडून २० प्रश्नांची प्रश्नावली भरून घेण्यात आली. यात महिलांची मानसिकता, अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये निघालेला निष्कर्ष प्रत्येकीच्या मनातल्या भावनांना वाट करून देणारा आहे. महिलांनी तीन महत्त्वाचे मुद्दे यात मांडले आहेत.

पहिला - पुरुषांनी कुटुंबातील कामात सक्रीय सहभाग घ्यावा. विशेषत: घरातील केरलादी, फर्निचर पुसणे, मुलांना तयार करणे, पाहुणे मंडळींचे आगतस्वागत किंवा प्रसंगी स्वयंपाक ही कामे पत्नीला मदत म्हणून नव्हे तर त्यांचीही जबाबदारी म्हणून करावेत असे प्रत्येकीचे म्हणणे होते.
दुसरा - आम्ही घरकाम करतो म्हणून आम्हाला ही तर काय घरीच असते, अशा अर्थाने गृहीत धरले जाते. ही तर घरीच असते ऐवजी, ही घरी असते म्हणून आम्ही निश्चिंत असतो, अशी भूमिका असायला हवी. म्हणजेच आमच्या कामाबद्दल संपूर्ण आदर राखला जायला हवा. आमच्या आत्मसन्मानाचा विचार केला जायला हवा, त्यातून आम्हाला कामाचे समाधान मिळणार आहे. वडील बाहेर जाऊन पैसा कमवतात पण आई घरची धुरा सांभाळते, तीही तितकीच महत्त्वाची आहे, हा विचार मुलांच्याही मनात रुजला पाहिजे हे प्रत्येकीच्या मनात होते.

तर तिसरा - महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दरमहा आम्हाला पगार नको पण वैयक्तिक खर्चासाठी किमान एक हजार रुपये मिळायला हवेत. हे पैसे मनाप्रमाणे खर्च करता यायला हवेत, त्यावर कुणाचा अंकुश नको, त्यासाठी जाब द्यावा लागू नये, या अपेक्षा या गृहिणींनी एकमताने व्यक्त केल्या.

कुटुंबात मुलांचे पालनपोषण ही फक्त आणि फक्त आईचीच जबाबदारी आहे असा ठाम समज आहे. तो मोडून निघायला हवा. त्याऐवजी ती सर्वांनीच घ्यायची जबाबदारी आहे. मग, नवरा असो किंवा मोठी भावंडं, त्यांनी लहानांची जबाबदारी घ्यायला हवी. गेल्या ४० वर्षांत समाज वेगाने बदलत गेला. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी महिलांनी विविध क्षेत्रं पादाक्रांत केली. नोकरीच्या अनेक वाटांवर त्यांनी स्वत:चे अस्तित्व दाखवून दिले. मात्र, आजही त्यांच्या श्रमाच्या कामांना न्याय मिळालेला नाही. ‘कुठलेही काम कमी दर्जाचे नसते’ या विषयावर मोठा आव आणून बोलणारे पुरुष घरातील धुणी-भांडी करणे मात्र त्यांच्या योग्यतेचे काम मानत नाहीत. समाजातील ही विषमता चर्चेतून समोर आली पाहिजे, या उद्देशाने आयोजित गृहिणी संमेलनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या निमित्ताने आजच्या महिलांच्या किंबहुना गृहिणींच्या पुरुषांकडून असलेल्या अपेक्षा समोर आल्या आहेत. महिलांच्या कामंाना योग्य सन्मान देणे, त्यांना वैयक्तिक खर्चासाठी एकही पैशाचा हिशोब न विचारता दरमहा पैसे देणे तसेच कुटुंबातील कामे मदत म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून करणे या गोष्टीं इतक्या कठीण, अशक्य नाहीत. परंतु, त्याही मागाव्या लागतात, हे दुर्दैवाचे आहे.

बदलाच्या झपाट्यात पुढील काळात कोणता बदल होईल, याचाही अंदाज पुरुष मंडळींनी बांधायला लावणे गरजेचे आहे. महिला म्हणून अनेक प्रश्न मांडले जातात, चर्चा होते पण पडद्यामागे राहून कुटुंबाला भक्कमपणे सांभाळणाऱ्या किंबहुना कुटुंबाचा कणा असलेल्या गृहिणींचे विश्व कुटुंब, भिशी पार्टी, महिला मंडळ, सांस्कृतिक व्यासपीठ यांमध्येच फिरत राहाते. पुरुषांपेक्षा कितीतरी अधिक श्रम महिला करतात, भावनिक-मानसिक गुंत्यातून वाट काढूनदेखील अनेकदा दोषीच्या पिंजऱ्यातही उभ्या राहतात. या दृष्टीने आता चर्चा होण्याची ही वेळ आहे.

श्रमाचे विभाजन समान असायला हवे. योग्य नियोजन करून घरातील प्रत्येकाची काळजी घेण्याचे काम करणाऱ्या महिलाही तेवढ्यास सन्मानाच्या हकदार आहेत. नुसतेच होम मिनिस्टर म्हणून भागणार नाही तर थोडी प्रत्यक्ष शारीरिक जबाबदारीही पुरुषांनाही घ्यावी लागणार आहे.

मंगल खिंवसरा, डॉ. रश्मी बोरीकर, पद्मा तापडिया, डॉ. सविता पानट, डॉ. चारुलता रोजेकर, चंद्रभागाबाई दाणे यांच्या विचारांतून वास्तवात उतरलेल्या या संमेलनाच्या निमित्ताने गृहिणी पहिल्यांदाच व्यक्त झाल्या आणि पुरुषांकडून असलेल्या अपेक्षा सर्वांपुढे आल्या. या अपेक्षांची पूर्ती झाल्यास पुढील काळात महिलांची स्थिती अधिक निराळी राहील. त्यांची आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक कुचंबणा दूर होईल. पाहा! मग मिळतोय का हाउस हसबंड ते शोधा किंवा ते व्हायची तयारी ठेवा.
roshani.shimpi@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...