आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ खेळू चला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जनक, आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. त्यांची दोन्ही मुलं तुझ्याच वयाची आहेत. ते आल्यावर आम्हाला मोठ्यांना गप्पा करायच्या आहेत. तुम्ही तिघे एकत्र खेळा बरं का!’
‘काय खेळू आई?’
‘अपार्टमेंटच्या खाली खेळा.’
‘पण काय खेळू? त्यापेक्षा आम्हाला कार्टून लावून दे किंवा तुमचे मोबाईल द्या आम्ही खेळत बसू. असेही ती मुलं माझ्या ओळखीची नाहीत मी काय बोलू त्यांच्याशी?’
...असे प्रश्न आपल्या लहानपणी कधीच पडले नाहीत. फ्लॅट्स किंवा बंगल्यांमध्ये राहताना घराचं अंगण हरवलं आहे. शिवाय आईबाबा दोघे नोकरीला जात असल्याने सायंकाळी ते घरी आल्यावर मुले डोळ्यांपुढे हवी असतात. यासोबतच प्राथमिक शाळांमध्येच अभ्यासाचा ताण इतका वाढला आहे की, त्यातच मुलं थकून जातात. पण, काही सुजाण मातांनी यावर चिंतन केले अन आस्था जनविकास संस्थेच्या माध्यमातून त्यांना उत्तर मिळाले. गेल्या चार वर्षांपासून आस्थाच्या माध्यमातून ८५ पारंपरिक खेळांचे १० दिवसांचे शिबीर औरंगाबादच्या ज्योतीनगरात आयोजित केले जात आहे. यामध्ये शेकडो मुले त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या लहानपणी खेळलेल्या खेळांचा आनंद घेतात. १० दिवसांच्या या शिबिरात मुलांना सध्या असलेल्या खेळांव्यतिरिक्त खेळ माहीत होतात, त्यांची आवड निर्माण होते. यातून मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होत असल्याचेही दिसून आले आहे. विषेश म्हणजे या खेळांमुळे मुले सामाजिकदृष्ट्याही प्रगल्भ झाली आहेत.

सागरगोटे, चिरकीपाणी, तळ्यात-मळ्यात
कवितेच्या बागेत होणाऱ्या या शिबिरात सागरगोटे, बिट्ट्या, चंफूल, पत्यांचा गाव, चोरशिपाई, दगड का माती, तळ्यात मळ्यात, रस्सीखेच, आपडीथापडी, दोरीउड्या, चिरकीपाणी, शिरापुरी, कानगोष्टी, शिवाजी म्हणतो, लंगडीपाणी, लपंडाव, मामाचं पत्र हरवलं, लिंगोरचा, डोंगराला आग लागली, आंधळी कोथिंबीर, कांदाफोडी, धप्पाकुटी अशा भन्नाट खेळांचा आनंद मुलं घेतात.

बाहुलाबाहुलीचं लग्न
आज तिशीचाळिशीत असलेल्या सर्वांनीच लहानपणी बाहुलीच्या लग्नाचा आणि भातुकलीचा खेळ खेळला आहे. पण आजच्या मुलांना हा खेळ माहीतच नाही. म्हणून आस्थाच्या वतीने बाहुलाबाहुलीच्या खऱ्याखुऱ्या लग्नाचा सोहळा साजरा करण्यात आला. दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी जमली. पाच दिवसांच्या विवाहाचे आयोजन केले. संगीतरजनी, हळदी सोहळा असे अनेक कार्यक्रम प्रत्यक्षात झाले. मुलांसाठी आयांनी सर्व सोहळ्यांची पारंपरिक गाणी गायली. बाहुलीचे आणि बाहुल्याचे सर्व नातेवाईक म्हणून मुलांनी जबाबदाऱ्या वाटून घेऊन कामं केली. मुलांनीच मंगलाष्टके म्हटली. बाहुलाबाहुलीच्या मामांनी आंतरपाट धरले. समस्त औरंगाबादकरांसाठी हा सोहळा कुतूहलाचा विषय ठरला.

हल्लीची मुलं व्हिडिओ गेम बराच वेळ घालवतात. हे कृत्रिम विश्वच त्यांना खरे वाटू लागते. आल्यागेल्यांमध्ये मिसळणे, वाक्चातुर्यातून लोकांची मनं जिंकणे, मैत्री करून ती निभावणे तसेच शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, त्यांच्या कुटुंबाचा भाग होणे त्यांना जणू ठाऊकच नाही. यामुळे मुलांचा भावनिक विकास खुंटला आहे. यातूनच मन सुन्न करणाऱ्या घटना समाजात घडताना दिसतात. मैदानी खेळ खेळत नसल्याने शारीरिक विकासावरही मर्यादा आल्या आहेत. मात्र, यातून वाट काढण्यासाठी परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपणच प्रयत्न करायला हवेत, या हेतूने आस्थाच्या अध्यक्षा आरती शामल जोशी यांनी या शिबिराची आखणी केली. सुरुवातीला सुट्ट्यांमध्ये मनोरंजन म्हणून पालकांनी या शिबिरात मुलांना पाठवले. मात्र, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मुलांचा यामध्ये इंटरेस्ट वाढला. हे मैदानी खेळ मुलांना आनंद देऊ लागले. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा चारही पातळ्यांवर मुलांचा विकास साधतांना आत्मविश्वास, नेतृत्वगुण, वाक्चातुर्य, व्यवहार कौशल्य अशा अनेक गोष्टी हे शिबीर बोनस म्हणून देत असल्याने याचे वेगळेपण अबाधित आहे.

खेळ फक्त खेळ नव्हते
पूर्वजांनी अनेक खेळांची बांधणी दूरदृष्टीने केली होती याची अनुभूती प्रत्येक खेळाचे निरीक्षण करताना येते. झटपट निर्णय घेण्याची क्षमता, शक्तीऐवजी कधी युक्ती तर युक्तीऐवजी कधी शक्ती वापरण्याचे तंत्र यामध्येच तर अंगवळणी पडते. यातूनच खरा व्यक्तिमत्त्व विकास होतो. आजपासून ३० वर्षांपूर्वी आपण दररोज खेळत असलेले खेळ कधी शिबिरात जाऊन शिकण्याची वेळ येईल यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. मात्र, आज ती वेळ येऊन ठेपली आहे. पण, देर आये दुरुस्त आये.
मंडईचा अनुभव
एवढेच नाही तर व्यवहारचातुर्य शिकवण्याच्या हेतूने एके दिवशी खरीखुरी भाजी मंडईही मुलांनी भरवली. परिसरातील नागरिकांनी या भाजीबाजारात चांगलीच गर्दी केली होती. सर्व प्रकारच्या भाज्या याठिकाणी होत्या. चाट पदार्थांचे स्टॉलही मुलांनी लावले होते. गेली चार वर्षे सातत्याने मे महिन्यात १० दिवस होणाऱ्या या शिबिरात मुलांना मैदानी खेळांची ओळख तर झालीच. पण एकाच परिसरात राहून कधीही जवळीक न झालेल्या मुलांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली. आता ती एकमेकांच्या घरी जातात, एकत्र वेळ घालवतात. भाजी विक्रीतून त्यांना पैशांचे गणित आणि भाज्यांच्या ओळखी झाल्या. अनेक भाज्या पहिल्यांदाच मुलांना या बाजारात पाहता आल्या.