आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणि सर बोलू लागले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाळी संदर्भातले गैरसमज, गंड, अनुभव याविषयीच्या या मुक्त सदरात अनेक प्रतिष्ठित मैत्रिणी आपले अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अमरावतीच्या एका मित्रानंतर जळगावच्या रुचानेही बिनधास्तपणे लिहिलंय. सामान्यांमधून आलेल्या या प्रतिक्रिया सामाजिक परिवर्तनाची नांदीच जणू.

शाळेत असताना दर शनिवारी प्रार्थनेनंतर ‘मास पीटी’ हा तास असायचा. त्याला आमचे पीटीचे सर मैदानावर आल्यावर सर्वप्रथम संपूर्ण मैदानाला दोन फेऱ्या मारायला लावत, तेही धावत! शरीरात व्यायाम करण्यापूर्वी ऊर्जा येण्यासाठी! पण काही मुली मात्र एका बाजूला बसून राहायच्या. बऱ्याचशा मुलींच्या चेहऱ्यावर सहभाग न घेता येण्याची खंत स्पष्ट उमटायची, तर काहींना ‘बरं झालं’ म्हणून हायसं वाटलेलं असायचं.

सर मैदानावर आल्यावर सर्वप्रथम याच मुलींजवळ यायचे व ‘का धावत नाहीत?’ म्हणून विचारायचे. मुली एकमेकींकडे बघायच्या. मग हळूच एक म्हणायची, सर, ताप आला आहे. कोणी डोकेदुखी, कोणी अशक्तपणा आल्याचं सांगायचं. पण मासिक पाळी आली आहे, असं सांगायला कोणीच धजायचं नाही. सर मात्र त्यांना रागवत व टोमणे मारत निघून जायचे.

एका शनिवारी माझी पाळी आली होती. पोटदुखी व अंगदुखी जरा जास्तच जाणवत होती. जर धावले तर अजून त्रास होईल, असा विचार करत मीही त्या मुलींमध्ये जाऊन बसले. सर आले. त्या दिवशी सरांनी प्रत्येकीला विचारलं. प्रत्येक जण आजारांचे विविध प्रकार सांगत होती, पण दहा मुलींपैकी आजारी फक्त तीनच! बाकी साऱ्या…! सर माझ्याजवळ आले, त्यांनी मला विचारलं. तशी मी शाळेत खूप प्रसिद्ध होते. माझी प्रतिमा एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून होती. सरांनी पुन्हा दटावून विचारलं. सरांच्या दटावण्याने माझी हिंमत एकवटली व ‘सर, पाळी आली आहे,’ म्हणून मोकळी झाले. साऱ्या मुली चकित होऊन माझ्याकडे पाहात होत्या. माझं उत्तर ऐकून सर म्हणाले, ‘त्रास होत नसेल तर धाव, फ्रेश होशील,’ व निघून गेले. साऱ्या मुली माझ्याकडे अभिमानाने पाहात होत्या. कोणी कौतुकही केले.

पुढल्या शनिवारी सर मुलींकडे आले. त्यावेळी बारा मुलींपैकी फक्त चारच मुली या संसर्गाने आजारी होत्या. तेवढ्यात तिथे मी पोहोचले. मुली सरांकडे खरी समस्या व्यक्त करताना बघून मी खुलले. मुली माझ्याकडे कृतज्ञपणे बघत होत्या. तेवढ्यात सर माझ्याजवळ आले आणि ‘पुढच्या शनिवारी इथेच थांब’ म्हणून निघून गेले. जाताना त्यांचं कौतुकाने स्मितहास्य करणं मला शाबासकी दिल्यासारखं भासलं. पुढच्या शनिवारी मी मुलींजवळ येऊन बसले. सरही आले. काहीही न बोलता सर मुलींच्या घोळक्यात येऊन बसले. ते म्हणाले, ‘पाळी आली आहे म्हणून तुम्ही धावत नाही. मासिक पाळी तर दर महिन्याला येते. का येते, हेही तुम्हाला माहीत आहे. यात शारीरिक त्रास होतो. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही शारीरिक श्रमच करू नये. ज्यांना त्रास होत नाही, पण केवळ पाळी आहे म्हणून धावणं टाळतात, ते चुकीचं आहे. हे दिवस रोजप्रमाणेच घालवावे. स्त्रीत्वाची जाणीव करून देणाऱ्या या क्षणांची अडचण होऊ देऊ नका. त्रासही होऊ देऊ नका. बघा… विचार करा.’ एवढं बोलून उठताना सरांनी माझ्याकडे कौतुकाने आणि कृतज्ञतेने पाहिलं. मी तर काही बोलण्याच्या अवस्थेतच नव्हते. सरांना इतकं मैत्रीपूर्ण वागताना मी पहिल्यांदाच पाहिलं. मला फक्त मुलींमधला मासिक पाळीला घेऊन असलेला खजीलपणा व त्यातून जगाला सामोरे न जाण्यातली दुर्बलता नष्ट करायची होती, पण सरांचं असं मुलींना समजावणं खूप काही शिकवणारं होतं. त्यानंतर मात्र सरांमध्ये झालेला बदल इतर शिक्षकांमध्येही प्रखरतेने जाणवला. त्यांच्यापर्यंत आता मुला-मुलींच्या प्रत्येक समस्या जाऊ लागल्या व मुलांपर्यंत त्याचं समाधानही पोहोचू लागलं. शाळेतलं वातावरण बदलू लागलं. बदल हे घडतातच आणि बदल हे घडणारच… फक्त बदलणारा पाहिजे.

आज परिस्थिती बदलत चालली आहे. मुलींच्या मनात पाळीविषयी समस्या व शंका फारच क्वचित उठतात. त्यांची मासिक पाळीबद्दलची साक्षरता कौतुकास्पद आहे. आता तर पाचवीपासूनच मुली या स्त्रीच्या जीवनातील सुखद घटनेबाबत साक्षर झालेल्या जाणवतात. पाळीबद्दल चर्चा करताना मुलींना आता वयाची भिंत नडत नाही. किंबहुना ‘आपण कुठल्या विषयावर बोलत आहोत?’ असा बालिश व खजील करणारा प्रश्न त्यांना उद‌्भवत नाही. आईने मुलीला पाळीबद्दल सांगण्याअगोदरच तिला हे माहीत असते. शाळेतून, कॉलेजमधून ही माहिती त्यांना सांगितली जाते. मग एवढं सारं असतानाही अजूनही मुली अडचणीच्या काळात का मदत मागू शकत नाहीत? का त्या अजूनही पाळीचं कारण सांगायला धजत नाहीत? का त्यांना याची लाज वाटते?

कॉलेजमध्ये एकदा अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे सदस्य आले होते. बोलताना त्यांनी वर्गातील सत्तर मुला-मुलींसमोर पाळीचा विषय काढला. पाळीबाबत असलेले गैरसमज ते दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. मुली एकमेकींकडे बघत हसत होत्या. एरवी विशेष वर्ग भरवून फक्त मुलींना पाळीबाबत सांगितले जाई, पण इथे…! मुलींचं त्या वेळचं वर्तन लाजिरवाणं होतं. मुलं मात्र शांतपणे ऐकत होती. विज्ञानाच्या अभ्यासक्रमात असल्याने त्यांना हे नवीन नव्हते. यातून मुलांचा समजूतदारपणा जाणवला.

असं असतानाही मुलींना पाळीच्या समस्या व्यक्त करण्याचे धाडस का होऊ शकत नाही, असं वाटतंच. प्रश्न कायम आहेत; पण प्रश्न विचारले तरच उत्तरं मिळणार. नक्कीच मिळणार. समस्या व्यक्तच केल्या नाहीत तर त्यावर समाधान कसं मिळणार? त्या कशा कोणाला कळणार?

शेवटी समस्या उद‌्भवणाराही माणूसच व समाधान देणाराही माणूसच ना… म्हणून संवाद तर लागणारच!
(ruchabarhate13@gmail.com)