आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझा छकूला effects

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांचं एक बरं असतं, त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते! अगदी नाव-गाव माहीत नसेल तरीही, समोरचा त्यांच्या ‘लहान’ या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगनेसुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्रमैत्रिणींचं एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यांमध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळेच दोन मिनिटांचं मौन पाळल्यासारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुशा युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या, टीव्हीतल्या लहान मुलांच्या आणि खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टिव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की, लहान मुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.


मी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टीव्हीवरल्या जाहिराती आणि मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी ऱ्हाइम्सचे व्हिडिओज आणि लहान मुलांचे चित्रपटसुद्धा जमा झालेत. कालच मी आणि युग मराठी वाहिनीवर महेश कोठारे यांचा ‘छकुला’ बघत होतो. त्यातला आदिनाथ युगला भलताच आवडलेला दिसत होता. म्हणजे त्याच्या एकूण हालचाली पाहून मला तरी हेच वाटलं. तिकडे त्या आदिने लक्ष्मीकांत बर्डे ऊर्फ लक्ष्याला आणि अविनाशजींना आईच्या पाकीटचोरीची शिक्षा द्यायचा चंग बांधलेला असतो. आदिनाथ, लक्ष्या, अविनाश या सगळ्यांची बराच वेळ पळापळ चाललेली असते. ती पाहून युगसुद्धा घरातल्या घरात सैरावैरा पळायला लागला. पळता-पळता मधेमधे येणारं खेळणं, पलंगावरल्या उश्या, दाराकडील पायपुसणं एक-एक करून आईच्या अंगावर फेकायला लागला. कॅरेक्टर जास्तच मनावर घेतलं की, असाच चेव चढतो याला. आदिनाथची कोलांटीउडी बघून यानेही आपलं कौशल्य पलंगावर चढून आजमावलं. फरशीवर डोकं आपटतं हे आताशा कळून चुकलंय म्हणा.


मग फेव्हिकॉलने चिकटलेले ते दोघे चोर आट्यापाट्या खेळताना बघून युगच्या खेळात आईलाही सामील व्हावं लागतं. कधी तरी रडू थांबावं म्हणून पाठीवर लेकरालाच कोकरू घेऊन कुक्कुचीक्काई.. केलेलं नेमकं त्याला आज आठवतं. लांबून पळत येऊन धपाक् आईच्या पाठीवर आदळून तिच्या गळ्याभोवती विळखा घालून हे महाशय चिकटून बसतात. आणि आई बिचारी अचानक झालेल्या कोकरूहल्ल्याने गडबडून जाते. मग स्वतःला कसंबसं सावरून पटकन त्याच्या खेळात सामील होते. पिक्चरची स्टोरी पुढे-पुढे सरकते तशी-तशी आदिनाथच्या सगळ्या धमाल-मस्तीची पुनरावृत्ती युगच्या घरीही झालेली असते.


पुढे मग कहाणीतलं रडकं वळण आलं तशी स्वारी गुपचूप येऊन आईच्या मांडीवर बसली. आदिनाथचा तो रडका क्लोजअप सीन बघून इकडे हळूहळू आमच्या छकुल्याची स्माइली उलटी व्हायला लागली. डोळ्यांचा तलाव तुडुंब भरला. आणि पिक्चरमधल्या खुंटीवर अडकलेल्या आपल्या छकुल्या मित्रासाठी गंपू टीव्हीकडे धावला. टीव्हीतल्या आदिनाथला हात लावून ‘ज्जे...ए..ए..ज्जे’ (‘ये इकडे ये’ किंवा ‘हे घे’ या अर्थाने तो हे शब्द नेहमी वापरतो) असं म्हणत रडायला लागला. त्याला असं बघून आता मला क्षणभर काही सुचेचना. रडू थांबावं म्हणून मग मी चॅनलच बदललं. तर नेमकं त्याच्या आवडीचं झिंगाट गाणं लागलेलं. रडू येत होतं पण गाण्याच्या तालावर नाचायचं पण होतं. इथे त्याचा भावनिक गोंधळ झाला हे स्पष्ट दिसत होतं चेहऱ्यावर. शेवटी डोळे पुसून गंपूसाहेब पलंगावर चढले. त्याची झिंगाट स्टेपसाठीची बाला डान्स पोझिशन घेतली आणि सुरू केलं
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट्.

- रूपाली पाटणकर, मुंबई, rups.patankar@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...