आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंबा, द लायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युग, वय - ९ महिने
माझा पिटुकला आता घरभर पळतो.
सिंबा - द लायन किंगसारखा राजेशाही पावलं उचलत अख्ख्या घराची टेहळणी करतो. हॉलची हद्द संपली की, तिथून पुढे (आत) येण्याआधी तो थोडा वेळ विचार करत थांबतो. “डाव्या बाजूच्या बाथरूममध्ये जाऊन टबातल्या पाण्याशी युद्ध करावे? की, उजव्या बाजूला देवघरावर चढाई करावी?”

अतिशय गहन विचारानंतर बाथरूमात गनिमी काव्याने शिरकाव केला जातो आणि अचानक लक्षात येते, पाणी आणि फरशी दोन्हीही फार थंड आहेत, आणि आपण चिलखत घालायला विसरलो आहोत. एकूणच पाण्याची पूर्वतयारी दांडगी असल्याची खात्री पटल्यानेे युद्धाचा निर्णय रद्द करण्यात येतो.
 
पण तोपर्यंत पाण्याने आपले काम चोख बजावलेले असते. “चुकीला माफी नाही” या युद्धाच्या नियमानुसार पाण्याकडून सिंबाला गारठ्याची शिक्षा दिली जाते. सिंबा राजे शेपटीला फटाके लावल्यासारखे चारी पावलं झपझप उचलत स्वयंपाकघराकडे पळत सुटतात, अर्थातच बचावासाठी माँसाहेबांकडे कूच करण्याच्या हेतूने.

इवल्या इवल्या डोळ्यांत ५० मिली अश्रू जमा होताच मदतीसाठी टाहो फोडला जातो. बाळराजांचा आर्त स्वर कानी पडताच हळव्या मनाच्या माँसाहेब प्रसंगाचे गांभीर्य ओळखून हातातली कामं टाकून त्याला पोटाशी कवटाळतात. सिंबा राजेही वर्षानुवर्षे भेट न झाल्यासारखे आईला घट्ट बिलगतात. अश्रूयुक्त नयनांनी आईकडे पाहात फक्त तीनच दात असलेली स्माइल देतात. ब्रेक के बाद (२५-३० मिनिटांच्या).
 
आईने सिंबाला गोग्गोड खाऊ भरवून छान छान नटवल्यावर तो हॉलकडे जायला निघाला की, पुन्हा त्याच वळणावर तोच विचार मनात डोकावतो. या वेळी मात्र देवघराकडे मोर्चा वळवला जातो. पण त्या आधी यूटर्न घेऊन बाथरूमच्या दरवाजावर दोन-तीन धपाटे घालून एकट्यानेच “ही ही” करत दुडुदुडु पळ काढला जातो.
 
rups.patankar@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...