आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाचं आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंपू सात महिन्यांचा होता तेव्हाची गोष्ट. बाहेर हॉलमध्ये टीव्हीवर सैराटची गाणी लागली होती, त्यामुळे गंपूचं लक्ष तिकडेच होतं. एरवीपण ही गाणी टक लावूनच बघतो हा. त्यातलं त्याला नक्की काय कळतं, देव जाणे. बाकीच्या गाण्यांत, कार्यक्रमात कशातच त्याला रस नसतो फारसा. काल ही गाणी सुरू असताना म्हटलं, याचं लक्ष नाहीये तोवर गॅलरीतले कपडे काढून आणावेत. (दिवसभरातली सगळी कामं अशीच चुटका मारून करावी लागतात आजकाल.)
 
मी गॅलरीतनं कपडे आणून बेडरूममध्ये एका जागी टाकले आणि लागलीच घडी करून ठेवू म्हणून बसले. मिनिटभरपण झाला नसेल नि लक्षात आलं, बाहेर हॉलमधून येणारा सैराटच्या गाण्यांचा आवाज बंद झालाय. ताडकन् उठून हॉलमध्ये आले. समोर बघते तर गंपू जागेवरून गायब!
 
सोफ्याशेजारच्या कोपऱ्यात बघितलं, खुर्चीखाली, पडद्यामागे बघितलं. कुठेच नाही, म्हणून देवाच्या खोलीत डोकावले तर हा नेमका तिथेच. देव्हाऱ्यासमोर, चारी पाय पोटाखाली घेऊन, उंदरासाठी दबा धरून बसलेल्या मांजरीसारखा बसला होता. डोळे मोठ्ठे करून देव्हाऱ्यात मांडलेल्या माझ्या सगळ्या देवी-देवतांचं निरीक्षण करत होता. 
 
मी दारातच उभं राहून बघू या म्हटलं काय करतोय. मग काही वेळातच त्याने त्याचं काहीतरी पक्कं केलं, आणि पुढच्या कामगिरीसाठी तो सज्ज झाला. दोन्ही हात पुढे टेकवून गुडघ्यांवर उभा राहिला आणि त्याचं टारगेट असलेल्या गणपती बाप्पाला त्याने हात लावला. (बहुधा ते सगळे देव म्हणजे नवीन वेगवेगळ्या आकाराचा खाऊ आहे, असं वाटलं त्याला. आणि बाप्पाची मूर्ती त्यातल्या त्यात जरा मोठी असल्याने मोठ्ठा खाऊ म्हणून तीच आधी उचलावी ठरवलं असावं.)

“अरे देवा, गंपू थांब, काय करतोयस?” असं मी म्हटलं आणि त्याने पटकन मागे वळून पाहिलं. “हीं हीं” करत दात नसलेली स्माइल देत माझ्याकडे घाईघाईने रांगत आला. तोंडाने भुर्रर्र भुर्रर्र आवाज काढत येऊन मिठी मारली. 

हुश्श्श्श्श. वाचले माझे देव. मला वाटलं होतं, कृष्णाने जसे नंदाच्या देव्हाऱ्यातले शाळीग्राम तोंडात लपवले होते तसे हाही माझ्या देवांना तोंडात टाकतोय की काय!
 
(rups.patankar@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...