आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंपूबाळ आणि उकडीचे मोदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगारकी चतुर्थीची गोष्ट! 
गणपती बाप्पासाठी मी खास उकडीचे मोदक बनवायला घेतले. तशी उकडीच्या मोदकांची माझी पहिलीच वेळ. मला गव्हाचे तळणीचे मोदक करायची सवय, कारण आईकडे तेच असायचे. मीही तेच करायला शिकले मग तिच्याकडून. 
गंपूला सांभाळून त्यात पहिल्यांदाच या मोदकांचा प्रयत्न, त्यामुळे सकाळीच स्वयंपाक झाल्यावर तयारीला लागले. सारण बनवून घेतले आणि आधी गंपूला अंघोळ घालून झोपवले. हो! कारण त्याशिवाय मला काही शांतपणे ती उकड करायला मिळणारच नव्हती. उकड झाल्यावर ती मळून मोदक बनवायला घेतले. इतक्यात गंपूशेठ उठले. दिवसा त्याची झोप कमीच, अगदी वीसेक मिनिटांची. स्वारी उठून स्वयंपाकघरात आली आणि काय आश्चर्य? माझ्या अपेक्षेप्रमाणे तो अजिबात रडला नाही की, मला येऊन मिठी मारली नाही. उलट शांत माझ्या बाजूला उभा राहून बघत होता, की मी काय करतेय.
पण गंप्याची शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता. तीसुद्धा अर्ध्या-एक मिनिटाची. तेवढ्या अर्ध्या मिनिटात त्याने उकडीचा मळलेला गोळा नीट निरखून घेतला. मी कसा त्यातला छोटासा भाग काढून उंड्यात सारण भरतेय वगैरे त्याने बरोबर लक्षात ठेवले.
 
आणि आता गुडबॉय बनायचं असेल तर आईला मदत करणे क्रमप्राप्त आहे वगैरे विचार करून त्याने त्या उकड-गोळ्याचा हातात मावेलसा गोळा त्याच्या चिंटुकल्या बोटांनी तोडला. मी त्याच्या हातातून तो कसाबसा काढून घेतला तर तो लगेच सारणाच्या भांड्याकडे वळला. तो स्वतः त्यात हात घालणार, त्यापेक्षा मीच त्याला चिमूटभर सारण खाऊ घातले. आता चिमट-चिमट सारण एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा दिलं, तरी हा पोरगा तिथून हलेना. दुधादह्याला चटावलेल्या बोक्यागत आपला सारणाच्या भांड्यावरच याचा डोळा. 
इथे काही मनासारखी डाळ शिजेना, तर याने मोदकाकडे गाडी वळवली. “अरे बाळा, थांब ते वाफवायचेत,” म्हणेस्तोवर त्याने रट्टा देऊन एक मोदक चेपवलाच. मला कळून चुकलं, माझ्या मोदकांचं आता काही खरं नाही. मी सगळं मोदकाचं साहित्य उचलून किचनकट्ट्यावर ठेवलं. गंपूच्या हातात खेळायला काहीतरी देऊन मी माझं काम परत करायला घेतलं. 
पण शांत बसेल तो गंपू कुठला?
थोड्या वेळाने हे नुसतीच लुडबुड मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आले परत. किचनकट्ट्याला धरून टुणुक-टुणुक उड्या मारायला लागले. खाली उभा राहूनच कट्ट्यावर कडेला दिसेल ते ओढायला सुरुवात झाली. माझं मोदकांचं काम जवळजवळ झालेलंच. मोदक वाफवायला ठेवले आणि त्याला त्याचा वरणभात खाऊ घातला.
 
रात्री नेवैद्य दाखवायला अवकाश होता. तरी मी पूजेची सगळी तयारी करून ठेवली. आम्ही देव्हाऱ्यासमोर बसलेले दिसलो की, हा देव्हाऱ्यातली घंटा घ्यायला धावतो. देवाच्या खोलीत त्याने माझ्या हातात मोदकाने भरलेलं ताट बघून डोळे मोठ्ठे केले. मी ताट खाली देव्हाऱ्यासमोर ठेवलं, तसा हा तिथे घिरट्या घालायला लागला. कधी चान्स मिळतोय आणि मी मोदकाच्या ताटाला खो घालतोय, असं झालं त्याला. जरा माझं लक्ष दुसरीकडे गेलं की, हा हळूच मोदक घ्यायला जायचा. त्याला मग थोडंसं दटावलंच, “हा खाऊ देवबाप्पाचा आहे, तुला तुझा मोदक देते पण ह्याला अजिबात हात नाही लावायचा.” त्याच्यासाठी जास्तीचे मोदक ठेवले होतेच मी. त्यातलेच दोन मोदक डिशमध्ये काढून दिले. ते पटकन उचलून दोन्ही हातात एक-एक मोदक घेऊन हा असा बाहेर पळाला, जसे काय मीच दिलेले ते मोदक त्याच्याकडून परत हिसकावून घेणार होते मी.
 
rups.patankar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...