आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई इज अ बॅड गर्ल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आईने ना सगळ्यांना माझी मोदकाची गोष्ट सांगितली, म्हणून सगळे हसतात मला. उग्गाच मला खादाड आणि हावरट-बिवरट म्हणतात. पण मी अजिबात नाहीये हं तसा. उलट कधी कधीतर मला मूडच नसतो जेवायचा. पण या आईला कोण सांगेल? सारखीच नुसती भाजी-चपाती नाहीतर वरणभात घेऊन मागे लागते माझ्या. मी आर्यन दादाच्या घरी जाऊन लपलो, तरी ती शोधून काढते मला. आता नाही आवडत मला असलं जेवण. मला ना चपाती बरोबर मुरांबा, तूप-साखर, हलवा, शिकरण, बासुंदी, श्रीखंड असं छान-छान सगळं खायला आवडतं. पण आई मला रागावते नुसती. म्हणते, तू खूप गोडखाऊ झालायस, सारखं गोड खाऊन पोटात किडे होतील. मी बिचारा लहान म्हणून असं काहीही बोलतात मला. असं कधी होतं का? पोटात किडेबिडे? उगाच घाबरवते ना आई. रोज ते ओवा/बडीशेप घातलेलं ईईई गरम पाणी प्यायला लावते. काल मामा तर आईला म्हणाला, “तायडे, तुझा पोरगा शेरडीगत शेलकं खायला शिकलाय.” म्हणजे काय ते मला नाही कळलं पण ते ऐकलं आणि आईला अचानक काय झालं काय माहीत, लगेच मला हाताला पकडून एका जागी बसवून जबरदस्ती सगळा वरणभात भरवला. खूप-खूप राग आला मला दोघांचा.
 
आई फारच bad girlसारखी वागते आता. मला कधीकधी धमकीसुद्धा देते, डॉक्टरकाकांकडे नेईन, इंजक्शनच द्यायला सांगेन म्हणून. तसं ते खोटं-खोटं असतं, मी मनावर नाही घेत. पण परवा तर ती खरंच डॉक्टरकडे घेऊन गेली मला. दोन-दोन इंजक्शन दिले उगाच. मी कित्ती रडलो माहितेय. त्या दिवशी सकाळीच माझे लाड करत म्हणाली होती मला, “बाळ माझं मोठं झालंय आता, दीड वर्षांचा झाला तू शोना.” मला वाटलं, मी परत मोठा झालोय म्हणजे बड्डे करणार माझा. मला खूप सारा केक, आईस्क्रीम मिळणार. पण हिने तर मला इंजक्शन दिलं. किती दुखलं मला. जागेवरून हलतासुद्धा येत नव्हतं. डोकं, हात, सगळं ‘हाह्’ (भाजत होतं) वाटत होतं. आमच्या इथल्या चिंटू (कुत्रा) च्या पायाला बाऊ झालेला तेव्हा तो चालायचा ना तसाच मी चालत होतो. आई तर खूपच दुष्ट वागत होती, सारखा तो डेंजर बर्फ आणून पायाला लावायची. जोरात भाजतो तो बर्फ लावल्याव, मी चिडून तिला चावलो जोरात आणि कट्टीच घेतली तिच्याशी.

तरीसुद्धा जबरदस्ती मला ओढत घरात फेऱ्या मारायला लावल्या. नाहीतर पाय आखडेल म्हणे. नंतर बिचारा मी नुसतं गरिबागत उशीवर डोकं ठेवून झोपलो होतो. म्हणजे असं आईच पप्पांना फोनवर सांगत होती ते मी ऐकलं. तर मी तसा पडून होतो इतक्यात मला शी शी झाली म्हणून मी आईला “यायी” “दाई” म्हणून एवढ्या हाका मारल्या पण आई नुसतीच “हो आले रे,” “थांब रे जरा शोन्या,” करत परत-परत तिथेच थांबायची. कित्तीतरी वेळ झाला तरी मी तसाच उशीवर डोकं ठेवून भुंडू वर करून बसलो होतो. मग आल्यावर बघितलं, मी शी शी करून ठेवलीये तरी मला नाही ओरडली. कारण मी आजारी होतो ना. उलट “अरे देवा, तुला शी शी झाली म्हणून बोलवत होतास? सॉरी रे बबड्या, मला वाटलं तुला दुखतंय म्हणून मला हाका मारतोयस.” म्हणाली आणि पापु घेतला माझा. मला ना खरंच खूप खूप खूपच आवडली तेव्हा आई.
 
rups.patankar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...