आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परी आणि गंपू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीप्रेग्नंट होते त्या वेळी आम्हाला मुलगी होणार की मुलगा, यावर आम्ही नवरा-बायको वाद घालायचो. बाळाच्या बाबाला मुलगीच हवी तर मला मुलगा. पण एकंदरीतच जुन्या जाणकार बायकांनी पोटाचा घेर आणि इतर काही शारीरिक बदल पाहून “मुलगाच आहे गं!” असं सांगितलं आणि मी मुलगाच होणारे ओ, असं अहोंना ठामपणे सांगितलं. ते म्हणाले, “मी सांगतोय ना मुलगीच होणारे मग बास्स!” मग डोहाळजेवणात बर्फी-पेढा गेममध्ये मी पेढाच उचलला आणि त्यांना लांबूनच डिवचलं, “बघा, बघा. मुलगाच आहे.” त्यांनाही मुलगा होणार याचं दुःख नव्हतंच होणार. पण मला उगाच चिडवायला गमतीने म्हणाले, “बघ, मुलगी झाली तर तिला छोटे-छोटे फ्रॉक आणण्यापासून तिच्या वेण्या घालण्यापर्यंत तिचं सगळं मी करेन. पण मुलगा झाला तर त्या सोंडक्याचं सगळं तूच करायचं.” आताच्या दिवाळीत मला त्यांचं हे बोलणं आठवलं जेव्हा त्यांनी युगला उटण्याने अगदी रगडून पहिली अंघोळ घातली. काय तर म्हणे “त्याचं हिरवं-निळं भुंडू आज गोरंच करून टाकतो बघ!”


अगोदर त्यांनी होणाऱ्या लेकीचं नावपण ठेवलेलं ‘परी’. हा त्यांचा एकमेव हट्ट जो मला आणि दीदींना फारसा नव्हता पटला. “अरे कसं दिसेल ते शाळेत सांगताना ‘परी पराग शिंदे’?” “तू लाडाने म्हण की, तिला परी. पण दाखल्यावर ‘ओवी’ नाव देऊ”, दीदी म्हणाल्या. मीही माझ्या लिस्टवर मुलीसाठी ‘ओवी’, ‘युगंधरा’ ही नावं फायनल केलेली आणि मुलासाठी ‘युग’ आणि इंद्रनील. तशी लिस्ट बरीच मोठी होती. पण फायनल हीच नावं झालेली. 


असो.
पण मग परीचं ‘गंपू’ कसं झालं ते सांगते. एकदा नेहमीप्रमाणे ऑफिसला जाताना पोटावर हात ठेवून बाळाच्या पप्पांनी सहजच लाडाने परी ऐवजी “चला गंपू टाटा, येतो संध्याकाळी,” म्हटलं आणि गंपूने आतून त्याच्या हातावर ढिशुम केलं. बाळाने ‘गंपू’ या हाकेला प्रतिसाद दिला म्हटल्यावर साहजिकच बाबा हरखला. बाळाला इथून पुढे गंपूच म्हणायचं असंही डिक्लेअर केलं. मग पुढे हे गुंडुलं बाळ जेव्हा जन्माला आलं, तेव्हा त्याच्या पप्पांनी त्याला उचलून घेतलं तरीही त्यांच्याकडे न बघता हॉस्पिटलच न्याहाळत बसलं. पण पप्पाने “ए गंपूss” अशी हाक मारली तसं बाळ मोठ्ठे डोळे करून त्यांच्याकडे एकटक बघायला लागलं. दाखल्यावर मी ठरवलेलं ‘युग’ आलं आणि लाडाचं नाव म्हणून ‘गंपू’ ठरलं. आता या दीड वर्षात गंपूचं गंपी, गंप्या, गंपुडी असं बरंच काय-काय झालंय. 


त्या दिवशी गंपूला यांनी हळूच म्हटलेलं मी ऐकलं. “अरे तुला माहितेय का गंप्या? तुझं नाव आधी परी ठेवलं होतं मी.” पप्पा काहीतरी खूप सिरिअसली सांगतायत म्हणून बिचारा बराच वेळ त्यांच्याकडे बघत होता. त्याला यातली ढेकळं कळणार होती. पण आता या टक्कल केलेल्या आणि बनियन-चड्डी घातलेल्या आमच्या डांबिस पोरग्याला बघून “बाप रे, ही अशी आणि टकली परी?” कल्पना करूनच आम्ही दोघंही हसायला लागलो.


- रूपाली शिंदे, मुंबई
rups.patankar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...