आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण दोघे भाऊ भाऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहानग्याला मोठं करणं हा पालकांसाठी सुंदर अनुभव. ही सफर अशाच एका अविस्मरणीय प्रवासाची... 
 
नायक : युग 
वय : नऊ महिने

साधारणतः दुपारचे तीन/साडे-तीन वाजले असतील. युगराजे वामकुक्षी घेत होते. माझं या वामकुक्षीसोबत नेहमीच वाकडं असल्याकारणाने जरा निवांत वेळ मिळालाय तर टीव्हीवर गाण्यांचा आस्वाद घ्यावा म्हटलं. गाण्यांच्या चॅनलवर माझ्या आवडीचीच दर्दभरी गाणी (अहोंच्या म्हणण्यानुसार ट्रकवाल्यांची गाणी) लागली होती. मी मस्त टीव्हीसमोर पद्मासन घालून बसले (अधनंमधनं योगासनांची हुक्की येते मला) आणि गाणी ऐकण्यात गुंग झाले. तुम क्या जानो कितने दिन, रात गुजारी मैने तारे गिन गिन... असलं काहीतरी गाण्याचं कडवं चालू होतं.

तितक्यात मागून माझा सिंबा आला नेहमीप्रमाणे राजेशाही पावलं टाकत. पद्मासन घातलेल्या माझ्या मांडीवर कोणतीही सूचना न देता कचकन पाय देऊन उभा राहिला. उजवा हात माझ्या खांद्यावर/गळ्यात टाकला. एक पाय मांडीवर, एक पाय हवेत तरंगता आणि डाव्या हाताने हवेतल्या किटाणू/विषाणूंना सलाम केला (गोविंदा पथकातल्या छोट्या गोविंदासारखा). मी वेड्यासारखी त्याच्याकडे बघत होते. मग त्याचा टीव्हीकडे बघून “देद्ये तेते” असं काहीतरी म्हणत नकारार्थी मान डोलवत मध्येच पार्श्वभाग डोलावून तिथल्या तिथेच छोटुसा नाच करून झाला. हे एवढं सगळं करून झाल्यावर फायनली त्याला माझ्यातल्या मनुष्यप्राण्याची दया आली अन् त्याने आपला ‘बेफिकरे’ अॅटिट्यूड सोडला. ही ही ही करत तो माझ्या पायावरून खाली उतरला. उतरल्यावर त्याने गळ्यातला हात घट्ट आवळून एक दोन टुणुक टुणुक उड्या मारल्या. (मी त्याची काॅलेज बडी असल्याचं फीलिंग आलं मला.) मग मी पण त्याच्या खांद्यावर हात टाकून लहानपणीचं गाणं म्हटलं, “आपण दोघे भाऊ-भाऊ, चार आण्याचा खाऊ खाऊ.”
रुपाली शिंदे, नवी मुंबई
rups.patankar@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...