आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rural Literature And Facts About Life In Rural Area As Well As Farming

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामिण भागातील समस्या चितारण्याचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या ग्रामीण साहित्यिकांची चौथी पिढी ग्रामीण साहित्याची निर्मिती करत आहे. ग्रामीण साहित्यिकांच्या पहिल्या पिढीतल्या व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांनी ग्रामीण माणसाचे वास्तव जगणं प्रथमच मराठी वाचकांसमोर ठेवलं. माडगूळकर, मिरासदार, शंकर पाटील या तीन प्रमुख लेखकांच्या अगोदरच्या काळात ग्रामीण साहित्याची निर्मिती होत नव्हती असे नाही, पण या ग्रामीण साहित्यातून येणारे ग्रामीण माणसांचे चित्रण कल्पनारम्य व अवास्तव होते. नागरी वाचकांचे रंजन करण्याच्या हेतूने हे साहित्य निर्माण होत होते. खराखुरा वास्तवदर्शी ग्रामीण माणूस प्रथमच या तीन ग्रामीण साहित्यिकांनी मराठी वाचकांसमोर ठेवला. या लेखकांनी ग्रामीण साहित्याचा पाया इतका भक्कम केला आणि मराठी ग्रामीण साहित्याला फार मोठा वाचकवर्ग मिळवून दिला.
1960 च्या आसपास ग्रामीण साहित्यिकांची दुसरी पिढी ग्रामीण निर्मिती करू लागली. दुस-या पिढीतल्या या साहित्यिकांत उद्धव ज. शेळके, मधू मंगेश कर्णिक, ना. धों. महानोर, आनंद यादव, रा. रं. बोराडे, द. ता. भोसले, चंद्रकुमार नलगे, वासुदेव मुलाटे, भास्कर चंदनशीव यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या लेखकांपैकी उद्धव ज. शेळके, मधू मंगेश कर्णिक यांचा प्रादेशिक लेखक म्हणून निर्देश केला जातो. मात्र त्या त्या प्रदेशातले ग्रामजीवन त्यांच्या साहित्यातून अधोरेखित झाल्यामुळे त्यांचाही निर्देश ग्रामीण लेखक म्हणून व्हायला हवा असे मला वाटते.
दुस-या पिढीतल्या ग्रामीण लेखकांचे वेगळेपण असे की, कथा,कांदबरी, नाटक या वाङ्मयप्रकाराबरोबरच कविता, ललित लेख, समीक्षा या प्रकारातलं लक्षणीय लेखन केल्याचे अभावानेच दिसते. पहिल्या पिढीतल्या साहित्यिकांच्या साहित्यात पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातले ग्रामजीवन चित्रित झाले आहे, तर दुस-या पिढीतल्या ग्रामीण साहित्यिकांच्या साहित्यातून पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातले ग्रामजीवन चित्रित तर झालेले आहेच.पण त्याबरोबरच विदर्भ, मराठवाडा, कोकण या प्रदेशातले ग्रामजीवन चित्रित झाले आहे. दुस-या पिढीतल्या लेखकांपैकी काही लेखकांनी ग्रामीण साहित्य चळवळ सुरू करून नवोदित लेखकांना ग्रामीण साहित्य निर्मितीचे भान दिले ग्रामीण साहित्याची ही चळवळ सुरू करण्यात तसेच तिला गतिमान करण्यात आनंद यादव, रा. रं. बोराडे, द. ता. भोसले, चंद्रकुमार नलगे, नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, भास्कर चंदनशीव यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
दुस-या पिढीतल्या ग्रामीण साहित्यिकांचा वारसा तिस-या पिढीतील विश्वास पाटील, राजेंद्र गवस, बाबाराव मुसळे, सदानंद देशमुख, शेषराव मोहिते, इंद्रजित भालेराव, भीमराव वाघचौरे, आदी लेखकांनी अतिशय समर्थपणे चालविला आहे. ग्रामीण साहित्याची चौथी पिढी सध्या ग्रामीण साहित्य निर्मिती करत आहे. अर्थात पिढ्यांची ही मांडणी काटेकोर आहे असे नाही. चौथ्या पिढीतल्या ग्रामीण लेखकांमध्ये प्रामुख्याने आसाराम लोमटे, कृष्णात खोत, विजय जावळे, अशोक कौतिक कोळी, आनंद विंगकर, प्रकाश किनगावकर, अजय कांडर, केशव देशमुख, संतोष पवार, एकनाथ पाटील, लक्ष्मण महाडिक, बालाजी इंगळे, गणेश आवटे, कल्पना दुधाळ, महेश मोरे आदी ग्रामीण साहित्यिक ांचा समावेश आहे. आजचं बदलते ग्रामजीवन हे ग्रामीण साहित्यिक मोठ्या ताकदीनं आपल्या कवेत घेत आहेत.
अलीकडच्या काळात ग्रामीण माणसाचे जगण्याचे प्रश्न अधिकच बिकट होत चालले आहेत. शेती व्यवसाय हा ग्रामीण माणसाच्या जगण्याचा प्रमुख आधार, पण हा आधार वरचेवर अधिकच डळमळीत होत चालला आहे. शेतीची नापिकी वाढत आहे. बहुतांश शेतक-यांकडे पुरेशी शेती नाही. कुटुंबाच्या विभाजनाबरोबरच शेतीचं इतकं आणि असं विभाजन झालेलं आहे की, एकेकाळचा जमीनदार सध्या अल्पभूधारक झालेला आहे. सिंचनाच्या सोयी जिथे उपलब्ध आहेत तिथली परिस्थिती थोडीशी समाधानकारक आहे. मात्र कोरडवाहू शेतक-यांना उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे. महागाई वरचेवर वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात धान्याचे भाव वाढत नाहीत. ग्रामीण भागातल्या शेतक-यांंच्या सुशिक्षित पोरांच्या नशिबी बेकारी येत चालली आहे. गावोगाव बेकारांची संख्या वाढते आहे. वाढत्या कर्जबाजारीपणामुळे व नापिकीमुळे नैराश्य वाढत आहे. त्यातूनच शेतक-यांच्या आत्महत्या घडत आहेत.
राजकारण ग्रामीण माणसांच्या चुलीपर्यंत जाऊन भिडलेले आहे. आजचा ग्रामीण लेखक ग्रामजीवनातल्या या समस्याचे चित्रण करतो आहे. अर्थात या साहित्यिकांसमोरचं हे फार मोठे आव्हान आहे. कारण या लेखकांना ग्रामजीवनातल्या या समस्या जाणून घ्याव्या लागत आहेत. या समस्यांचा अभ्यास करून या समस्यांना साहित्यरूप द्यावे लागत आहे आणि हे आव्हान आमचा ग्रामीण लेखक समर्थपणे पेलतो आहे.
-शब्दांकन : दीपक व. कुलकर्णी