मधुरिमामधील इंजिनिअर्स डे निमित्ताने लिहिलेला यंत्रांची कास धरूया हा लेख वाचला आणि लिहावेसे वाटले. मी मूळची सोलापूरची. बाबांनी या लेखाची लिंक ई-मेल केली म्हणून मी तो वाचला. मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. माझी दोन्ही लहान भावंडं इंजिनिअर्स आहेत. इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं की बहीण मेकॅनिकल इंजिनिअर आहे. आमच्या पालकांनी आम्हा दोघी बहिणींना परदेशी उच्च शिक्षणासाठी पाठवलं.
गेली चार वर्षं मी टेलिकॉम क्षेत्रात कार्यरत आहे. टेलिकम्युनिकेशन, नेटवर्किंगमध्ये काम करताना घेतलेल्या शिक्षणाचा नक्कीच उपयोग झाला आणि तो झालाच पाहिजे अशी इच्छा होती नोकरी शोधत असताना. भारतात किंवा परदेशात इंजिनिअर्सना खूप मागणी आहे. इथे माझ्या बहुतांश मैत्रिणी इंजिनिअर आहेत आणि वेगळ्या क्षेत्रात (कम्प्युटर्स, मेकॅनिकल, केमिकल, इ.) कार्यरत आहेत. कौतुक करावंसं वाटतं की रोजची नोकरी करून घरदेखील सांभाळतात. हे सांगण्यामागचा इतकाच उद्देश की मुली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप सशक्त असतात.
इंजिनिअरिंगला जायला घाबरू नका. ग्राफिक्स, मेकॅनिक्स आणि गणितासारख्या विषयांना घाबरू नये. कुठलीही गोष्ट
आपल्या बुद्धीच्या पलीकडची नसते. तिचा योग्य वापर केला पाहिजे. Not failure, but Low Aim is Crime. १० वर्षांत आपल्याकडे खूप इंजिनिअरिंग कॉलेज झाली आहेत आणि शिक्षणपद्धतीसुद्धा सोपी झाली आहे. बोर्ड परीक्षा नाहीये, बारावीला गणिताला प्रॅक्टिकल सुरू केले आहे. बारावी आणि प्रवेश परीक्षेचे गुण बघितले जातात इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी. जर तुम्हाला खरेच इंजिनिअर व्हायचे असेल तर सगळीकडे महागाई खूप वाढली आहे म्हणून फीचं कारण देऊ नका. आपल्याकडे बँकेमधून शैक्षणिक कर्ज दिले जाते. त्यामुळे पालकांनासुद्धा मुलींच्या शिक्षणाचे दडपण येणार नाही.
मैत्रिणींनो, आजच्या सोशल नेटवर्किंगच्या काळात खूप पोटतिडकीने सांगावेसे वाटते कारण अभ्यास, मैदानी खेळ किंवा जिवंत माणसांशी गप्पा याचा विसर पडतो आहे. आपण एखादा सिनेमा कमी बघितला,
स्मार्टफोनऐवजी साधा फोन वापरला, एखादा ड्रेस कमी घेतला, सोशल नेटवर्किंगपेक्षा नेटवर्किंग नक्की काय हे जाणून घेतलं किंवा एकमेकांबद्दल बोलण्यापेक्षा एकमेकांसोबत मिळून अभ्यास केलात तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे.
मला इंजिनिअरिंग केल्यावर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे होते. तशी इच्छा घरच्यांना बोलून दाखवली तेव्हा त्यांनी माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले, की एक तर तू तुझ्या खर्चावर शिक्षण घे किंवा तितक्याच खर्चात आम्ही तुझे लग्न करू. पण मी पहिला पर्याय निवडला आणि घरच्यांनी त्याला पाठिंबा दिला. मैत्रिणींनो, लग्नं सगळ्यांचीच होतात, पण चांगलं शिक्षण सगळ्यांनाच नाही घेता येत. स्वतःचा अनुभव सांगण्यामागे इतकाच उद्देश की कुठल्याही कारणासाठी शिक्षण पणाला लावू नका.
इच्छा असेल तर नक्कीच मार्ग दिसेल!
अभियांत्रिकी दिवसाच्या खूप शुभेच्छा.