आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकवाचांदण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात की पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असतं. कारण एकदा पुस्तक वाचायची गोडी आपल्याला लागली तर मग स्वत:ला या गोडीपासून लांब ठेवताच येत नाही. ग्रामीण भागात खरं तर पुस्तक वाचनाबाबत, ती खरेदी करण्याबाबत खूप उदासीनता दिसून येते. वाचनालयाकडे तर कोणी फिरकतसुद्धा नाही.
मी अशाच ग्रामीण भागात वाढलेली मुलगी. आईबाबा दोघं नोकरी करणारे, त्यामुळे नेहमी एकटं राहावं लागायचं. अशातच पुस्तक वाचायची गोडी लागली आणि हळूहळू पुस्तकांशी मैत्रीच झाली. शाळेतील आणि महाविद्यालयातील मराठीच्या पाठय़पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठाच्या वर संदर्भ दिलेला असायचा, त्यावरूनही बरीचशी पुस्तकांची माहिती मिळायची. ती पुस्तकं आपल्याकडे हवीशी वाटायची. गावातल्या वाचनालयात मिळाली तेवढी चांगली पुस्तकं मी वाचून काढली.
मागच्या वर्षी भरलेल्या पुस्तक प्रदर्शनातून मी काही चांगल्या लेखकांची नावाजलेली पुस्तकं घेतली. मारुती चितमपल्ली याचं ‘चकवाचांदण’, उत्तम कांबळेंचं ‘आई समजून घेताना’, अब्दुल कलम यांचं ‘अग्निपंख’, डॉ. नरेंद्र जाधवांचं ‘आमचा बाप आन् आम्ही’ यांसारखी. यातलं मला आवडलेलं पुस्तक म्हणजे ‘चकवाचांदण - एक वनोपनिषद’. हे चितमपल्ली यांचं आत्मकथन आहे. मुखपृष्ठावर असलेलं घुबडाचं चित्र पाहिलं की पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे पुस्तकाचं नाव इतकं काव्यमय आहे, मग चित्र घुबडाचं का? या प्रश्नाला लेखकाने खूप छान उत्तर दिलंय. रानावनात राहणारे पारधी, आदिवासी घुबडाला चकवाचांदण म्हणतात. त्यांच्या मते हा अभद्र पक्षी सांजेच्या वेळी ओरडून त्यांची दिशाभूल करतो. अशा वेळी हे आदिवासी जंगलात जिथे असतील तिथेच बसून राहतात. त्यांना चकवा पडतो. पण आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागताच हा चकवा निघून जातो आणि आदिवासींना वाट सापडते, म्हणून घुबडाला ते ‘चकवाचांदण’ म्हणतात.
या पुस्तकात लेखकाने आपले अरण्य अनुभव सांगितले आहेत. रानावनातल्या आपल्याला माहीत नसलेल्या आणि चक्रावून टाकणार्‍या अनेक गोष्टी यात सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक आवडण्याचे असे एक कारण सांगता येणार नाही. कारण लेखकाने त्यांचे जे अनुभव यात सांगितले आहेत ते इतके सुंदरपणे वर्णन केले आहेत की ते वाचताना आपल्यासमोर जिवंतपणे उभे राहतात आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्या सोबत जंगलात भटकंती करतोय असे वाटते. त्यांच्या शालेय जीवनाचा प्रवास आणि महाविद्यालयात घेतलेल्या विज्ञान शाखेकडून ते वनाभ्यासाकडे कसे वळले, या सगळ्या शिक्षणात त्यांना भेटलेले सहाध्यायी आणि त्यांच्या शिक्षकांचे वर्णनही असेच सुंदर रीतीने मांडलेय. लेखकाचे आईवडील, इतर नातेवाईक आणि समाजबांधव यांचे संबंध, त्यांच्यासोबत लेखकाला आलेले अनुभव त्यांनी खुलेपणाने सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला एका वेगळ्या समाजाची ओळख होते. डॉ. सलीम अलींसारखे पक्षीनिरीक्षक, चित्रकार ए. ए. आलमलेकर, बाबा आमटे, गो. नी. दांडेकर, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, जी.ए. कुलकर्णी या सर्वांसोबतचे चितमपल्ली यांचे अनुभवही या पुस्तकाचे वाचनमूल्य वाढवतात. किती सहजतेने त्यांना या महान व्यक्तींचा सहवास लाभला, याचे वर्णन वाचताना मन भारावून जाते. हे पुस्तक वाचताना आपण जंगल सफारीचा तसाच गड-दुर्गांचाही आनंद लुटू शकतो. त्यामुळे एकदा हे पुस्तक वाचायला सुरू केल्यावर त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहवत नाही आणि घरबसल्या वनभ्रमंतीचा सुंदर अनुभवही मिळतो. सर्वच वयांतील वाचकांनी वाचावे असे आणि आपल्या संग्रहात असावे असे हे पुस्तक तुम्हालाही नक्कीच आवडेल.