आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachi Gajhate Article On Sate Transport Bus Maharashtra

लाल डब्बा आणि आम्ही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाविद्यालयात मित्रमैत्रिणींच्या गँगसोबत केलेली धम्माल प्रत्येकाने अनुभवलेली असते. ते क्षण कधीही विसरता येत नाहीत. नुकतंच आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गेलो होतो, तेव्हा वेगवेगळे धमाल अनुभव आले. सध्या सेल्फीची मोठी क्रेझ आहे. वेळ मिळाला की लगेच सेल्फी काढून व्हॉट्सअॅप, फेसबुकवर अपलोड केला जातो.
राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आणि मौजमस्ती हे समीकरण काही नवीन नाही. यंदाच्या शिबिराचा आनंद लुटण्याची सुरुवात झाली बसस्टँडपासूनच. एरवी बसस्टँडचं नाव जरी काढलं तरी ई... करून नाक मुरडणारे आम्ही; पण बसची वाट पाहताना अर्ध्या तासात तिथे शेकडो फोटो काढले. स्टँडच्या बाकांवर, लाल डब्ब्याजवळ उभे राहून, वेड्यावाकड्या पोझ देऊन फोटो काढले. एकीकडे लोक आमचा ताल पाहण्यात मग्न होते, तर दुसरीकडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर इतर मंडळी फोटो पाहून चक्रावली होती.
शिबिराचा प्रत्येक दिवस असाच हटके गेला. रात्री आम्हा मैत्रिणींची मैफल रंगायची. गाणी, गप्पा यांपेक्षा मी आणि श्रद्धा आमच्यात रंगलेली वऱ्हाडी भाषेची जुगलबंदी जास्त भावायची. याच वऱ्हाडी बोलीने आम्हाला गावकऱ्यांच्या अधिक जवळ आणले. गावात कॉलेजची पोरं येणार हे जेव्हा गावकऱ्यांना माहीत होते, तेव्हा त्यांच्यात मोठी उत्सुकता असते. सकाळी गावात विविध विषयांवर जनजागृतीसाठी रॅली काढणे, स्वच्छता अभियान अशा उपक्रमांमुळे गावकऱ्यांची ओळख होते; पण ते थोडं औपचारिकच असतं. गावाच्या पारावर सकाळी पथनाट्य केल्यानंतर मी आणि श्रद्धा वऱ्हाडीत बोलायला सुरुवात केली. ‘काय वं माय, गाव तर लई झकास हाय. म्या तर म्हनतो, इथंच थांबलं तर कालेजला बी जायची कटकट ऱ्हायची नाय बग. मंग काय म्हनतंस?’ आमचं असं संभाषण ऐकून एक काकू खूप हरखून गेल्या. ‘तुमी खरंच राह्यता आमच्या गावात? लई मजा येईल. गावात कुनाले राह्यला अावडत नाय. आता तुमी ऱ्हायलात, म्हंजी कसं आमाले बी काई तरी सिकता येईन.’ असे त्यांनी म्हटले.
आम्ही मजाक करत असलो तरी त्यांचे बोलणे आमच्या हृदयाला भिडले. नंतर जेव्हा त्यांना आम्ही हे सांगितलं तेव्हा त्या म्हणे, की काही हरकत नाही, पण शहरातील मुलींना वऱ्हाडी भाषेचे वेड आहे, हे पाहून खूप बरं वाटलं. यावर आम्ही काही बोलू शकलो नाही.

sanchigajghate96@gmail.com