आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथ का तुटली?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका बेसावध क्षणी शिवसेनेने मनसेचे नगरसेवक स्वत:कडे वळवून मुंबई महापालिकेवर ताबा घेऊ पाहणाऱ्या भाजपला धक्का दिला. त्यावर राज ठाकरेंनी नेहमीच्या स्टाइलमध्ये ‘आता गालावर टाळी देऊ’ असं वक्तव्य केलं. पण मुळात राज यांच्या निष्ठावंतांनी मरेपर्यंत साथ देण्याची शपथ का मोडली? 

मुंबई महानगरपालिकेचे निकाल लागले तेव्हा शिवसेना आणि भाजपचं संख्याबळ कट टू कट होतं. दोन्ही पक्षांनी लगेच इतर नगरसेवकांवर फिल्डिंग लावली. त्यात मनसेच्या दिलीप लांडेंशी संपर्क होणं स्वाभाविकच होतं. त्यांनीच मनसेची थोडीबहुत लाज वाचवली होती. शिवसेनेच्या एका नेत्याने त्यांची भेटही घेतली. पण लांडे बधले नाहीत. आमच्या कुटुंबाने राज ठाकरेंना मरेपर्यंत साथ द्यायची शपथ घेतलीय, असं तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. 

शिवसेनेतले मोजकेच कार्यकर्ते पदं सोडून मनसेत आले होते. त्यापैकी दिलीप लांडे एक. पाच टर्म जुने नगरसेवक. कार्यकर्त्यांचे लाडके मामा. काम भरपूर. संपर्क दांडगा. त्यामुळे चिन्ह नाही, तर मामांकडे बघून त्यांना मतदान होतं. ते राज ठाकरेंना दगा देतील, असा विचारही मनसेत कुणी केला नव्हता. मग आठ महिन्यांत असं झालं तरी काय? दिलीप लांडेंना शपथ मोडावीशी का वाटली? राज ठाकरेंवर आजही त्यांचा जीव असणारच. तरीही त्यांनी विश्वासघात का केला? शिवसेनेत असताना राज समर्थक म्हणून वर्षानुवर्षं सहन केलेला अन्याय त्यांना विसरावासा का वाटला? 

खरं तर राज ठाकरे फुल फॉर्ममध्ये असताना ऑक्टोबर २०१३ मध्येच याची सुरुवात झाली होती. राज ठाकरेंनी महानगरपालिकेतील गटनेतेपदी दिलीप लांडेंना हटवलं. त्यांनी तिथे संदीप देशपांडेंची नेमणूक केली. देशपांडे लांडेंपेक्षा निश्चितच अधिक आक्रमक, फोटोजनिक आणि पत्रकारांना जवळचे होते. त्यामुळे त्यांची निवड कुणालाही चुकीची वाटणारी नव्हती. पण नेत्याला सर्वसामान्यांच्या पलीकडचं पाहावं लागतं. ते न जमल्यामुळे ही निवड मनसेच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. तोवर सतत यश मिळवणारी मनसे या निवडीनंतर उतरणीला लागली. एखाद्याला हा निष्कर्ष अतिशयोक्तीचा वाटू शकेल. उगाच सुतावरून स्वर्ग गाठण्याची धडपड वाटू शकेल. पण असं झालंय खरं. फार जुना नाही, पण एक जमाना होता. राज ठाकरेंच्या भोवती राज्याचं राजकारण फिरायचं. ते ज्यांना हात लावतील, त्यांचं सोनं व्हायचं. ते बोलतील तो चर्चेचा मुद्दा बनायचा. ते जातील तिथे हजारोंची गर्दी जमा व्हायची. पण अचानक राज ठाकरेंचं राजकारण लोकसभा, विधानसभा करत महानगरपालिका निवडणुकीपर्यंत रसातळाला गेलं. त्यातून बाहेर पडण्यासाठी फेसबुकवर विक्रमी धडक आणि चर्चगेटच्या मोर्चांनी केलेली हवा सहा नगरसेवकांच्या पक्षबदलाने काढून घेतलीय.

‘नीम का पत्ता कडवा हैं...’च्या घोषणा देणं सोपंय. पत्रकार परिषदांमध्ये आरोप करणंही सोपंय. पण राजकारणाच्या सारीपाटावरचे फासे एकामागून एक उलट का पडतात, हे शोधणं राज ठाकरेंसाठी कठीण आहे. कारण ते कुंडलीतले ग्रहतारे ठरवत नाहीत. नऊ तारखेचे मुहूर्त ठरवत नाहीत. राजकारणाच्या प्रत्येक यशापयशामागे समाजकारणाशी निगडित कार्यकारणभाव असतोच. मनसे आणि अर्थातच शिवसेनेच्या राजकारणाचं विश्लेषण जातीच्या अंगाने करण्याची पद्धत आपल्याकडे नाही. पण छगन भुजबळांच्या शिवसेनेमधल्या बंडाप्रमाणेच मनसेतल्या सहा नगरसेवकांच्या बंडालाही जाती संघर्षाचा घट्ट पदर आहे. राज यांची सल्लागार चौकडी, त्यांचं दरबारी राजकारण यांना दोष देत, या फुटीची कारणं शोधण्यात आली. शिवसेनेच्या बाबतीतही असंच होत आलंय. याला या पक्षांचा शहरी तोंडवळा कारणीभूत होता. मुळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कसबी कुंचल्याने पक्षाची प्रतिमाच जातनिरपेक्ष रंगवली होती. 

बाळासाहेब आयुष्यभर म्हणत राहिले की, शिवसेनेत जात पाहिली जात नाही. बाळासाहेब स्वतः जातनिरपेक्षच जगले. याचा अर्थ त्यांना जात माहीत नव्हती असं नाही. महाराष्ट्रातल्या जातींचा इतिहास आणि भूगोल तळहातावरच्या रेषांपेक्षाही चांगला माहीत असलेल्या प्रबोधनकार ठाकरेंचे ते पुत्र होते. प्रबोधनकारांचा मराठी बाणा आणि हिंदुत्व ही चलनी नाणी घेतानाच बाळासाहेबांना त्यांचा बहुजनवाद काही पेलवला नाही. मात्र, शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांनी जातीची समज कुशलतेने वापरली. त्यांचे नामांतराला, मंडल आयोगाला आणि रिडल्सला विरोध करण्यापासूनचे अनेक निर्णय जातीचा नीट विचार करूनच आले होते. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबेंनी शिवसेनेच्या या जातीय बांधणीची नस बरोबर पकडलीय, ते सांगतात, ‘मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपापल्या जातिसमूहांविरुद्ध केलेलं बंड म्हणजेच शिवसेना.’ 

जातीय अस्मिता नीट माहीत असल्याशिवाय भारतात तरी प्रादेशिक किंवा धार्मिक अस्मितांचं यशस्वी समीकरण मांडता येणं निव्वळ अशक्य आहे. आपल्याला आपली माणसं व्यवस्थित माहीत असतील तरच त्यांना कार्यक्रम देता येतो. बाळासाहेब जे काही यशस्वी ठरले ते त्यामुळेच. उद्धव आणि राज या दोघांनाही जातींची समीकरणं कळतच नसावीत, असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातली डावी चळवळ जातजाणिवा न समजून घेतल्यामुळे संपल्यात जमा आहे. त्याच कारणामुळे प्रादेशिक पक्षांच्या मराठी अस्मितेचं राजकारणही संपू शकेल. त्याची दोन उदाहरणं नुकतीच घडली आहेत. राज ठाकरेंनी अधिकृत फेसबुक पेजवरून पहिलं ‘फेसबुक लाइव्ह’ करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो वर आणि प्रबोधनकारांचा फोटो खाली ठेवला होता. उद्धव ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी नागपूरला रेशीमबागेत जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली होती. 

बाळासाहेबांनी कधीच असं केलं नाही. त्यांनी ब्राह्मणी हिंदुत्ववादाला केवळ वापरलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपल्या संघटना बांधणीतला सर्वात मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्क माहीत होतं. त्यामुळेच बाळासाहेब असेपर्यंत संघ महाराष्ट्रात कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. आता मात्र चित्र तसं नाही. मध्यंतरी बाळासाहेबांच्या शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्यासाठी सु. ग. शेवडेंना बोलावण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता थेट सांगलीच्या भिडे गुरुजींना निमंत्रण पोहोचता पोहोचता राहिलं. 

आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं नाही, असं निदान उद्धव ठाकरे भाषणात म्हणतात तरी. त्याबाबतीत मनसेची स्थिती खूपच वाईट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती असणारी माणसं मनसेत किती खोल घुसलीत, याची चुणूक लोकसभा निवडणुकांत दिसली होतीच. प्रबोधनकार हयात असते, तर त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण देणाऱ्या सरकारला कसं सोलून काढलं असतं, हे प्रबोधनकारांचं थोडंदेखील वाचलेला कुणीही सांगू शकेल. तरीही पुरंदरेंसाठी महाराष्ट्र पेटवण्याच्या धमक्या देण्याचं राज ठाकरेंना आजही कौतुक उरलं असेल, तर आश्चर्य आहे. राज ठाकरेंनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्यासाठी दादरच्या ब्राह्मण सभेतल्या प्रकट मुलाखतीचा मुहूर्त शोधला. त्यांच्याभोवती नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि संदीप देशपांडे ही शिवाजी पार्कवाली मंडळी कोंडाळं करून बसलीत. बाळासाहेब कार्यकर्त्यांना सन्मान देताना त्यांच्यासमोर मनोहर जोशींना कायम अंतरावर ठेवायचे.
‘कृष्णकुंज’वर याच्या नेमकं उलट होत असल्याच्या तक्रारी कार्यकर्ते करतात. वसंत गीते, प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे, शिरीष पारकर, मंगेश सांगळे हे राज ठाकरेंसाठी जीव ओवाळण्यासाठी तयार असणारं बहुजनी नेतृत्व वेगवेगळ्या कारणांसाठी पक्षाबाहेर गेलंय. आता दिलीप लांडेही गेलेत. बहुजन नेत्यांनी अभिजनी कोंडाळ्याविरुद्ध केलेलं बंड, असा नगरसेवकांच्या फुटीचा अर्थ लावला तर त्याला चुकीचं ठरवता येणार नाही. 

मनसेच्या सुरुवातीपासून त्यांचे समर्थक असणारे दोन समाजगट होते. एक शिवसेनेतील प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध नाराज असणारा जमिनीवरचा बहुजनी कार्यकर्ता. दुसरा होता, उच्चशिक्षित उच्चवर्णीय मध्यमवर्गीय मतदार. ते मुळात मोदींचेच होते. मोदी आल्यावर ते त्यांच्याकडे गेलेही. पण राज अद्यापही त्यांच्याच गारुडात अडकलेले आहेत. त्यामुळे नाराज बहुजनी कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर चाललेत आणि पुढेही जात राहतील.

- सचिन परब,ssparab@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९९८७०३६८०५
बातम्या आणखी आहेत...