आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदाभेद भ्रम अमंगळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेदाभेद आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. भेदाभेदातून राजकारण निपजतं आणि राजकारणातून भेदाभेद निर्माण करता येतो. विद्यापीठात शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक मिळावे, चित्रपट महोत्सवात आम्ही म्हणून त्याच चित्रपटांना प्रवेश मिळावा, ही याचीच उपपत्ती...अवघं समाजमन गढूळ करणारी... 


‘आमच्या कंपनीचं एअर फ्रेशनर टॉयलेटमध्ये लावलंत तरच तुम्हाला सभ्य म्हणता येईल’... अशी एक जाहिरात काही महिन्यांपूर्वी लागायची. त्याला कोणी आक्षेपही घेऊ शकत नाही. कोणी कुणाला सभ्य म्हणावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण सभ्य माणूस दुसऱ्याच्या ताटात वाकून बघत नाही, असं आपल्या आयाआजा अगदी कालपरवापर्यंत सांगायच्या. आजही सांगतात.  
साध्या शहाण्या माणसांनी घालून दिलेली ही सभ्यतेची कसोटी मानायची झाली, तर आजच्या आपल्या समाजाला सभ्य म्हणता येणार नाही. आधी मांसाहारींना घरं नाकारणाऱ्या हाऊसिंग सोसायट्या, कॉलन्या उभ्या राहिल्या. नंतर गोमांस खाल्ल्याचा संशयावरून कुणाला ठेचून ठेचून मारण्यात आलं. काय खावं, काय खाऊ नये, हे सरकार ठरवू लागलं. खिचडी राष्ट्रीय खाद्यपदार्थ ठरवण्यावरून गोंधळ घालण्यात आला. आता शाकाहारी असलेल्या विद्यार्थ्यालाच पुणे विद्यापीठातलं एक सुवर्णपदक मिळणार आहे.

  
‘ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ यासाठी अर्ज मागवणारं सर्क्युलर निघाल्यापासून चर्चेत आहे. त्यातल्या अटी पाहिल्यावर वाटतं, खरंच हे सुवर्णपदक कुणाला द्यायचंय की नाही? अभ्यासात दहावीपासून पहिला, कलांत आणि खेळांत आघाडीवर, भारतीय संस्कृतीचं पालन करणारा, सामाजिक कामांत अग्रेसर, ध्यानधारणा-प्राणायाम-योगासनं करणारा, निर्व्यसनी आणि शाकाहारी असा सर्वगुणसंपन्न विद्यार्थी आज सापडणं अशक्यच आहे. हे सगळं सोन्याचं पाणी दिलेल्या मेडलसाठी करायचं, म्हणजे कठीणच! त्यातल्या शाकाहाराच्या अटीवर गदारोळ उडालाय. त्यात काही चुकीचंही नाही. पण हे सुवर्णपदक २००६ पासून दिलं जातंय. इतके दिवस कुणी या अटींकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. पण सध्याच्या सरकारांच्या इतरांच्या ताटात डोकावण्याच्या उपद्व्यापांमुळे त्याकडे संशयाने पाहिलं जातंय. जसं पेरलं तसं उगवतंय. ताडाखाली ताक प्यालं तरी कुणी विश्वास ठेवत नाही. या अटी विद्यापीठाने नाही तर सुवर्णपदकासाठी फिक्स्ड डिपॉझिट ठेवणाऱ्यांनी घातलेल्या असतात. त्या विद्यापीठाने का स्वीकारायच्या, हा प्रश्न आहेच. तेही डॉ. नरेंद्र जाधव कुलगुरू असताना, ही अट स्वीकारली गेली, याचं काही जणांना आश्चर्य वाटेल आणि काही जणांना ते स्वाभाविक वाटेल.  


विद्यापीठ आता शेलारमामांच्या कुटुंबियांशी बोलणार आहे. त्यांनी शाकाहाराची अट काढली तर सुवर्णपदक सुरू राहील, नाहीतर विद्यापीठ ते रद्द करेल, असं ठरलं आहे. त्यामुळे सुवर्णपदक रद्द करण्याची पाळी येणार नाही, याची खात्री बाळगायला हरकत नाही. तितकी शेलारमामांची पुण्याई आहे अजून. जेवणात शाकाहाराचं महत्त्व आहेच. पण ती एखाद्या विद्यार्थ्याचे गुण शोधण्याची कसोटी होऊ शकत नाही, इतकं शहाणपण वारकरी परंपरेतल्या घरात असणारच. शेलारमामांच्या घरचे ही अट काढण्यासाठी लगेच तयार होतील. कारण ते वारकरी आहेत.  वारकऱ्याला शाकाहार प्रिय आहे. त्यासाठी तो आग्रहीही आहे. पण शाकाहार सर्वस्व नाही. मांस-मटणामुळे देव आणि धर्म बाटतील, इतके ते छोटे नाहीत, हेही त्याला पक्कं माहीत असतं. त्यामुळे कोण काय खातं, यापेक्षाही कोण कसा आहे, हे महत्त्वाचं. समोरच्याला त्याच्या गुणदोषांसकट आपला मानणं हा बंधुभाव वारकरी संप्रदायाचा पाया आहे. इतरांनी काय खावं, याविषयी वारकरी कट्टर असूच शकत नाही. व्यापक असतो तो वारकरी. सहिष्णूता हा वारकऱ्याचा स्थायीभाव आहे. आजच्या भाषेत सांगायचं, तर वारकरी अगदी सहज दुसऱ्याच्या ‘स्पेस’चा आदर करतो. कोणत्याही गोष्टीत कट्टर असणाऱ्याला वारकरी म्हणताच येणार नाही आणि खाण्यासारख्या तुलनेने क्षुल्लक गोष्टीत तर नाहीच नाही.  


शेलारमामांच्या नावाने सुवर्णपदकाची सुरुवात झाली, तेव्हा शेलारमामा १०३ वगैरे वर्षांचे असावेत. तेव्हा त्यांची या अटींना संमती होती की नाही, याचं खरंखोटं आता करता येणार नाही. पण शेलारमामांचं शतायुषी आयुष्य पाहिलं की त्याविषयी एक अंदाज बांधता येतो. ज्यांनी शेलारमामांचं कीर्तन ऐकलंय ते सांगतात, मामा कीर्तनाच्या नावाने नुस्ता जाळ उभा करायचे. डोक्यावर पंजाबी पद्धतीची पगडी आणि भगवी कफनी घालणारे मामा कीर्तनाचे नियम धुडकावून लावायचे. त्यांच्याबरोबर ना टाळकरी, विणेकरी असायचे ना मृदुंगमणी. ना त्यांना पूर्वरंग आणि उत्तररंगाशी घेणंदेणं असायचं. हातातली झांज, खडा आवाज आणि मधून उड्या मारून ते कीर्तनाचा संवाद रंगवायचे.  कथा, आख्यानांत न रमता ते सामाजिक -राजकीय विषयांवर बोलायचे. विठ्ठलनामाच्या बरोबरीने अभंगांच्या सोबतच खणखणीत ‘नॉन व्हेज’ शिव्याही द्यायचे. किंबहुना, ते त्यांच्या कीर्तनाचं एक प्रमुख आकर्षण असायचं.  


पण, शेलारमामांच्या शिव्यांना ओव्यांचं मोल होतं. कारण त्यांच्या जीवनाला त्यागाचा सुगंध होता. ते गाडगेबाबांचे शिष्य. शेलारमामा हे नावही त्यांना गाडगेबाबांनीच दिलेलं. गाडगेबाबांची मोकळीढाकळी कीर्तनाची पद्धत ही संत नामदेव आणि संत तुकारामांच्या कीर्तनाशी नाळ जोडलेली अस्सल वारकरी कीर्तनपरंपरा आहे. गाडगेबाबा या परंपरेचं पुनरुज्जीवन करत असतानाच गेल्या शतकाच्या अगदी प्रारंगी त्यावर नारदीय कीर्तनपद्धतीचं कलम करून त्याला शिस्त आणि सभ्यतेच्या नावाखाली नियमांत बांधण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अनेक मातीतल्या कीर्तनपरंपरा संपल्या, दुषित झाल्या किंवा वारकरी संप्रदायापासून तुटल्या. अशा वेळेस गाडगेबाबांची कीर्तनपरंपरा सांभाळण्याचं महत्त्वाचं काम शेलारमामांनी केलं.  


गाडगेबाबांच्या प्रेरणेने शेलारमामांनी गरिबात देव पाहिला. त्याला त्याच्या भाषेत उमगेल असं शहाणपण शिकवत गावोगाव फिरले. त्यांनी गाडगेबाबांसारखेच गांधीजींचे विचार कीर्तनातून सांगत स्वातंत्र्यासाठी मशागत केली. छोडो भारत आंदोलनात ते सक्रीय होते. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री (प्रति) सरकारसाठी प्रचार करताना त्यांचा हात पकडणारं दुसरं कुणी नव्हतं. नंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन आणि गोवा मुक्तीसंग्रामातही ते आघाडीवर होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला.  याचा कळसाध्याय रचला गेला, तो बडवेमुक्तीच्या आंदोलनात. आज पंढरपूरच्या विठुराया बडव्यांच्या कैदेतून मोकळा झालाय, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय शेलारमामांना आहे. सरकार नाडकर्णी कमिशनची अमलबजावणी करत नव्हतं म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं. त्यासाठी जनजागृती केली. कोर्टकज्जे केले. पांडुरंगाला सोवळ्याच्या पापातून मोकळं करणारे भक्तश्रेष्ठ शेलारमामा आज एका फालतू सुवर्णपदकासाठी घातलेल्या शाकाहाराच्या अटीमुळे सोवळ्याओवळ्याचं प्रतीक बनलेत,  यापेक्षा दुसरी मोठी शोकांतिका नसावी. या शोकांतिकेचं कारण बहुदा त्यांची विश्वनाथ कराडांशी झालेली मैत्री असावी.  नव्वदीनंतर शेलारमामा एमआयटीचे प्रमुख विश्वनाथ कराड यांच्या नादी लागलेले दिसतात. कराड हे हभप किसनमहाराज साखरे महाराजांचे अनुयायी. त्यांचा ओढा भागवत धर्मापेक्षाही वर्णाश्रमधर्माकडे जास्त. त्यामुळे नव्वदीनंतर शेलारमामाही कीर्तनांऐवजी जगभर योगासनांच्या जादूचे प्रयोग करत फिरू लागले. हरिभक्तपरायणापेक्षा त्यांची ओळख योगमहर्षी म्हणून होऊ लागली. नामसंकीर्तनाने सोपी केलेली पायवाट सोडून ते विश्वशांतीयज्ञ करणाऱ्यांच्या कर्मकांडांसाठी राबू लागले. शेलारमामांची गाडगेबाबांपासून सुरू झालेली वाटचाल कधीतरी बेसावध क्षणी साखरे महाराजांच्या दिशेने गेली. तेव्हाच बडवेमुक्तीपासूनचा त्यांचा प्रवास शाकाहाराच्या सोवळ्यापर्यंत जाणार, हे अध्याहृतच होतं.  ‘गळा माळ असो नसो’ जातधर्माचे ‘भेदाभेद अमंगळ’ मानण्याची परंपरा मानणाऱ्या महाराष्ट्राला शेलारमामांचा हा प्रवास खूप काही शिकवून जाणारा आहे. शेलारमामांच्या मोठेपणाला मनापासून नमस्कार करून आपल्या सगळ्यांनाच आपल्या प्रवासाची दिशा शोधावी लागणार आहे. 


- सचिन परब
ssparab@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९९८७०३६८०५

बातम्या आणखी आहेत...