आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेजे की सुनेगा, तो मरेगा कल्‍लू...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्याचा शोध घ्यायचाय... आपल्याला, त्यांना, सगळ्यांना... पण सत्य म्हणजे काय गुलबकावलीचं फूल आहे, विकत घेतलं आणि धरलं हातात... सत्य हे सूर्याइतकं प्रखर आहे, त्याचा दाह सहन होण्यातला नाही... तरीही कुणीतरी मायेचा पूत बुद्धिला स्मरून पुढे येतो. तो पुढे आला की, मागून कोरस सुरू होतो - भेजे की सुनेगा तो... 


आपण निवांत आहोत. निवांत राहूया. निवांत राहणं, हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आपल्याला वेगळा मिळवावा लागत नाही. आपण सगळे असतोच, निवांत. काहीही झालं तरी आपल्या निवांतपणाची इस्त्री बिघडत नाही. निवांतपणा आपला राष्ट्रीय गुणधर्म आहे. तो निभावला की आपली राष्ट्रभक्ती सिद्ध होते. आपण मस्त निवांत आहोत. तसंच राहू द्यावं आपल्याला. ‘गोली मार भेजे में, भेजा शोर करता हैं... भेजे की सुनेगा, तो मरेगा कल्लू...’ हे आपलं मनापासूनचं राष्ट्रगीतच. आणि कल्लू मामा राष्ट्रपुरुष.  


नागपूर ही आपल्या देशाची राजधानी व्हायलाच हवी. मुन्ना यादव यांनी तशी मागणीच केलीय. तुम्ही त्यांना ओळखत नाही? पाप लागेल तुम्हाला!  ते लाभार्थी आहेत. असंघटित कामगार कल्याण मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत. काही विघ्नसंतोषी लोक त्यांना नागपूरचा वाल्या नंबर वन म्हणतात. पण देवेंद्रांच्या परिसस्पर्शाने वाल्याचा वाल्मीकी झालाय, कधीचाच. नारायण! नारायण!!  

 
काय म्हणता? श्री मुन्ना यादव यांनी नाही तर डब्बल श्री रविशंकर यांनी नागपूरला राजधानी बनवण्याची मागणी केलीय. काय फरक पडतो म्हणा? नागपूर आहेच देशाची राजधानी. इथूनच हलतात देशाची सगळी सूत्रं. काही बाहुल्या देशाच्या रंगमंचावर देश चालवण्याचा अभिनय करताना दिसतात आपल्याला. पण त्यांच्या रेशमी दोऱ्या इथल्याच बागांमधून हलतात. 


नागपुरी सॉफ्टवेअरवर चालणारी डोकी नागड्या नावाच्या सिनेमांना संस्कृतीविरोधी ठरवतात. नागपुरातच घडलेली डोकी पुरोहितशाहीची दशक्रिया करण्याच्या धूसर प्रयत्नांनाही धर्मद्रोही ठरवतात. स्वतःच्या धडावर नागपुरी डोकी मिरवणारेच मलिक मोहंमद जायसी या सुफी फकिराच्या कवितेतल्या नायिकेला राष्ट्रमाता ठरवतात. राष्ट्रमाता राजपूतच हवी, तर राजस्थानच्या पवित्र मातीत वावरलेल्या आमच्या संत मीराबाई आहेत. पण त्या कशा राष्ट्रमाता बनणार?  त्यांनी तर पुरुषांच्या सत्तेला आव्हान दिलंय. लग्न संस्थेला खडे सवाल विचारलेत. पायातल्या घुंगरांचा दणदणात करत नाचताना जातीच्या खोट्या रुबाबांना मातीमोल ठरवलंय. पग घुंगरू बांध मीरा नाचेगी... या राष्ट्रमातेने घडवलेली आमची माती पद्मावतीच्या निमित्ताने नापीक करायचीय यांना.  


गुजरातच्या आणि कदाचित राजस्थानच्याही निवडणुका होईपर्यंत आपल्याला संजय लीला भन्साळीचा ‘पद्मावती’ नाही पाहायला मिळणार बहुधा. काही हरकत नाही. ‘न्यूटन’ बघूया. तो भारतीय सिनेमाचा प्रतिनिधी म्हणून ऑस्करला गेलाय. म्हणजे, तो सध्याचा राष्ट्रसिनेमा आहे. आपण राष्ट्रभक्त आहोत, राष्ट्रसिनेमा बघताना दोन तास उभं राहून मान द्यावा लागला तरी तो बघायलाच हवा. त्यात एक नवशिक्या अधिकारी देशाने सोपवलेलं निवडणूक घेण्याचं काम करण्यासाठी जीव पणाला लावतो. एक दलित हीरो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवलेली लोकशाही पुढे नेण्याची जबाबदारी सिनेमात का होईना पार पाडतो. सिनेमा आहे म्हणून त्याची नि:स्पृहता त्याचा जीव घेत नाही एवढंच. 


पण ‘न्यूटन’ सिनेमातच बरा. बाहेर असेल तर त्याला म्हणावं, नागपुरात जाऊ नकोस. न्यूटनसारखं जबाबदारीचं भान असणारा कुणी नागपुरात आला तर तो संपूही शकतो. साधं लग्नासाठी आला तरी मरू शकतो. त्याला अचानक हार्ट अॅटॅक येऊ शकतो. मोठ्यात मोठ्या रकमेची लालूच त्याच्या प्रामाणिकपणाला मारू शकत नसेल, मोठ्यात मोठ्या पदावरच्या माणसाचं वजन त्याला झुकवू शकत नसेल, मोठ्यात मोठी भीती त्याच्यातला न्यायाधीश मारू शकत नसेल, तर त्याला खरोखर मरावंच लागतं.  


नैसर्गिकरीत्या म्हणा, अनैसर्गिकरीत्या म्हणा, माणूस मरतो. गोष्ट संपल्यासारखी वाटते. तीन वर्षं शांतपणे जातात. पण गोष्ट संपत नाही. कुणीतरी आणखी एखादा न्यूटन पुन्हा आपली जबाबदारी पार पाडतो. जिवंत न्यूटन मेलेल्या न्यूटनची गोष्ट शोधण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. ती गोष्ट जगाला ओरडून सांगायची  म्हणून घुसमटतो. पोटापाण्याचं एकमेव साधन असणारी नोकरी सोडतो. ज्यांचं कामच गोष्ट सांगणं आहे असे सगळे त्याला जागा देत नाहीत. पण न्यूटनच्या सोबतीला स्वतःतला थोडा थोडा न्यूटन जागवणारे आणखी सवंगडी जमा होतात. मेलेल्या न्यूटनच्या गोष्टीला जागा देतात. नदीतून पाणी वाहत वाहत लांबवर पोहोचावं तशी जिवंत न्यूटनने सांगितलेली मेलेल्या न्यूटनची गोष्ट सोशल मीडियामधून जगभर पोहोचते. सूर निरागस हो. सत्य ‘निरंजन’ हो.  


सगळ्यांना सगळं माहीत असतं, पण कुणी काही बोलत नाही. सगळे पेपर निवांत. सगळे चॅनल निवांत. सगळे नेते निवांत. सगळे प्रवक्ते निवांत. सगळे अग्रलेख निवांत. सगळ्या चर्चा निवांत. सगळे पक्ष निवांत. सगळ्या संघटना निवांत. तुम्ही निवांत. आम्ही निवांत. देश निवांत. समाज निवांत.


गोली मार भेजे में. भेजा शोर करता है... भेजे की सुनेगा तो...?  
पण कितीही निवांत राहायचं ठरवलं तरी गोळी लागतेच. भेजातला कल्लोळ शांत बसू देत नाही. मेलेल्या न्यूटनचं मरण वाया जात नाही. कारण न्यूटन मरत नसतातच मुळी. मेलेल्या न्यूटनची गोष्ट जमिनीवर पडताना दिसली की नवे न्यूटन उसळी मारून जन्म घेतात. तोवर ते झाडावरून पडणारं फळ बघत निवांत बसलेलेच असतात. पण निवांतपणाला अस्वस्थतेचं आकर्षण असतं. गुरुत्वाकर्षणाइतक्याच ताकदीचं.  


म्हणून जे निवांत आहेत त्यांना निवांत बसू द्यावं. कुणी समाधानाने बसलं असेल तरीही बसू द्यावं आणि कुणी दहशतीने निवांत बसलं असेल तरीही बसू द्यावं. निवांतपणे निवांत बसू द्यावं. जितके ते आज निवांत आहेत. तितके ते उद्या अस्वस्थ होतील. त्यांनाही दिसेल मेलेल्या न्यूटनची गोष्ट पडताना. मग त्यांच्यातलाही न्यूटन उसळी मारेल.  


नेमकं हेच होऊ नये यासाठी सत्तेची धावपळ सुरू असते. मेलेल्या न्यूटनची गोष्ट जिवंत न्यूटनला दिसू नये म्हणून पद्मावती हेडलाइनची जागा सोडत नाही. अयोध्येतल्या मशिदीच्या शिळ्या कढीला पुन:पुन्हा उकळ्या काढल्या जातात. ‘त’ वरून ताकभात नाही, तर ताजमहाल येतो. कारण नसताना खिचडी शिजायला ठेवली जाते. मतांसाठी इतिहासाची मॅगी दोन मिनिटांत तयार होते. न्यूटनची गोष्ट कोणाच्या कानावर पडू नये यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचे फटाके जास्त जोरात फोडले जातात. मग विराटच्या डबल सेंच्युरीचं आणि अश्विनच्या तीनशे विकेटचे नगारे वाजताना ऐकले की उगाचच वाटतं, कुठेतरी कुणातरी न्यूटनचा गळा दाबला जातोय.  


पण तुम्ही काहीही करा. फटाके फोडा. नगारे वाजवा. आणखी काहीही करा. न्यूटनची गोष्ट ऐकणारा कुणीतरी असतोच. न्यूटन संपणार नाहीच. न्याय संपणार नाहीच. आपण नका काळजी करू याची. आपण निवांत आहात ना, मग छान निवांत राहा, एकदम चिडीचूप. हाताची घडी तोंडावर बोट. 

 

- सचिन परब
ssparab@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९९८७०३६८०५

बातम्या आणखी आहेत...