आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका बनियाचा गहिवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत, पण ते कधीचेच धर्माच्या पलीकडे गेले होते. ते कर्मकांडी धार्मिक नसले, तरी धर्माची पोकळी व्यापण्याचं मोल त्यांना माहीत होतं.
राम गांधीजींच्या हातातून निसटला, तो थेट अडवाणींच्या हातात गेला. गांधीजींच्या अनुयायांना ही चतुराई ना कधी कळली, ना जमली. ते आदरणीय अमितभाईंच्या पथ्यावरच पडलं आणि पडतंय.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
 
कुसुमाग्रजांच्या ‘अखेर कमाई’ या गाजलेल्या कवितेचा हा शेवट. आदरणीय अमितभाई शाह महाराष्ट्राचे जावई असले तरी त्यांनी ही कविता वाचलेली नसावीच. पण तेही कवीच. आधुनिक भारताला आकार देणाऱ्या जुमल्यांचे रचनाकार. जे न देखे रवी ते देखे अमितभाईंसारखे कवी. कुसुमाग्रजांच्या महान प्रतिभेला जाणवलेला गांधींच्या गळ्यातला गहिवर एकटे अमितभाईच समजू शकले. त्यांनी महात्म्याची जात काढली. निवडणूक जवळ असलेल्या छत्तीसगढमधील प्रतिष्ठितांच्या बैठकीत त्यांनी गांधीजी ‘बनिया’ असल्याची जगाला आठवण करून दिली. नुसते बनिया नाहीत, तर ‘चतुर बनिया’.
 
खोटं बोलून निवडणुकीत मतं मिळवणं आणि नंतर ‘मन की बात’ सांगत गुंडाळून ठेवणं, हा आज चतुरपणाचा अर्थ झाला असला तरी, चतुर हा मुळातून वाईट शब्द नाही. गांधीजी त्या अर्थाने चतुर तर होतेच होते. आदरणीय अमितभाईंच्या वैचारिक पूर्वसुरींच्या किमान चार तरी पिढ्या गांधीजींना भोळसट, बावळट आणि कमजोर ठरवण्यात वायाच गेल्या म्हणायच्या. त्या चार पिढ्यांनी पाहिलेलं हिंदू राष्ट्राचं स्वप्न वास्तवात येत असताना, आता त्याचा एक सेनापतीच गांधीजींना चतुर म्हणतो, म्हणजे सगळंच मुसळ केरात. अमितभाई म्हणतात, इंग्रजांनी स्थापन केलेल्या काँग्रेस नावाच्या क्लबाचं या चतुर बनियाने स्वातंत्र्याच्या चळवळीत रूपांतर केलं. हे ऐकल्यावर चार पिढ्या कळवळल्या असणारच. हे गांधींनी केलं तर आमचे लोकमान्य काय फक्त अडकित्त्याने सुपारी कातरत बसले होते का?
 
१९२०मध्ये मुंबईच्या सरदारगृहात लोकमान्य टिळकांनी देह ठेवला. तेव्हा त्यांना खांदा देण्यासाठी गांधीजी पुढे आले. आता आदरणीय अमितभाईंनी काढली तशीच तेव्हाही कुणीतरी त्यांची जात काढली, ‘तुम्ही ब्राह्मण नसल्यामुळे खांदा देऊ शकत नाही.’ गांधीजींचं त्याला निरुत्तर करणारं उत्तर तयार होतं, ‘लोकसेवकाला जात नसते!’ त्यांनी भर पावसात टिळकांच्या पार्थिवाला खांदा दिला. इतकंच करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांचे सहकारी मौलाना शौकत अलींनाही खांदा देण्यास भाग पाडलं. बनियाच्या या चतुराईने अमितभाईंच्या पूर्वसुरींच्या पिढ्या कायमच्या हादरल्या.
 
गांधीजींच्या बनियागिरीमुळेच असे हादरे नंतरही बसतच राहिले. चळवळीतलं पैशांचं मोल या बनियाला पक्कं ठाऊक होतं. कार्यकर्त्याला ते फक्त कार्यक्रमच द्यायचे नाहीत, तर त्यासोबत निधीही उभारून देत. टिळक गेले त्याच वर्षी गांधीजींनी असहकाराचं आंदोलन घोषित केलं. त्यासोबत त्यांनी काँग्रेसला एक कोटी निधी उभारायचं टार्गेटही दिलं. नाव दिलं ‘टिळक फंड’. ठरलेल्या वर्षभरात पैसे जमा झाले नाहीत, तर ते परत करायचं विचित्र आश्वासनही त्यात होतं. शेवटचा दिवस आला. काही हजार रुपये कमी पडत होते. अनुयायी म्हणाले, ‘घोषणा करा. उरलेले पैसे जमा करू लवकरच.’ पण हा शब्दाला आणि हिशेबाला पक्का असणारा बनिया पैसे परत करायच्या तयारीला लागला. सगळ्यांनी धावाधाव करत संध्याकाळपर्यंत एक कोटी पूर्ण केले. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमासाठी गांधीजींनी त्यांचा आवडता हरिजन फंड उभारला. त्यांच्याबरोबर फोटो काढायचे असतील तर पैसे ठरले होते. कुणाला त्यांना आपल्या घरी घेऊन जायचं असेल, तर मिनिटाप्रमाणे पैसे लागायचे. कुणीतरी त्यांना दान म्हणून फुटकी कवडी दिली. हे एखाद्या गरिबाचं सर्वस्व आहे, असं सांगत त्यांनी त्याचाही लिलाव केला आणि फुटक्या कवडीला तेव्हा सव्वाशेहून अधिक रुपये मिळवले. दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी मूठभर मीठ उचललं आणि साम्राज्याचा पाया खचला. त्या मूठभर मिठाचाही त्यांनी तिथेच लिलाव केला. साडेचारशेहून जास्त रुपये मिळवले. ते सारं होतं हरिजन फंडासाठी.
 
गांधीजींनी जमा केलेल्या पै अन् पैचा हिशेब दिला. एकही पैसा वाया जाणार नाही, अशी कडक शिस्त घालून दिली. त्याचबरोबर या बनियाने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचाही हिशेब दिला. कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता आपल्या प्रत्येक कृतीचा, मनातील विचारांचाही हिशेब पेपरांत लेख लिहून मांडला. त्यामुळे लोक कोणताही हिशेब न करता त्यांच्यामागे ओढले गेले. गांधीजी सांगायचे तसं देशाच्या कानाकोपऱ्यातले कोट्यवधी लोक करायचे. स्वतःची जात विसरून आणि या बनियाचीही जात विसरून. संध्या करणारे हात संडास साफ करू लागले आणि मेलेली ढोरंही ओढू लागले. दुसरीकडे मूठभर जातीवर्चस्ववाद्यांची स्वप्नरंजनं सुरू होती. आमच्या जातीतल्या पेशव्यांकडून इंग्रजांनी सत्ता घेतली म्हणून त्यांच्याकडून सत्ता घेण्याचा हक्क आमचाच आहे, असं लिखाण पुण्यातले मोठमोठे विचारवंत करत होते. ही मंडळी स्वातंत्र्याला धर्माशी जोडत असताना गांधीजी त्याला जातीशी जोडत होते. देशाच्या राजकारणात स्थिरस्थावर होण्याआधीच त्यांनी सांगितलं होतं, मेहतराची मुलगी भारताचा राष्ट्रपती बनणं, हा माझ्या लेखी स्वातंत्र्याचा अर्थ आहे. जातवर्चस्ववाद्यांची गांधीजींशी दुश्मनी तेव्हाच सुरू झाली होती. फाळणी आणि पाकिस्तानला पंचावन्न कोटी देण्याची मागणी, हे सांगितले गेलेले बहाणे खूप नंतरचे. गांधीजींना मारण्याचे प्रयत्न त्या आधीच सुरू झाले होते. अशा सलग पाच प्रयत्नांमध्ये शेवटच्या हल्ल्यातील कुणी ना कुणी जोडलेला होता. हल्लेखोरांमधला एखादा अपवाद वगळता सगळेच एकाच जातीचे आणि पुण्याचे. खोटं वाटत असेल, तर जगन फडणीसांचं ‘महात्म्याची अखेर’, सदानंद मोरेंचं ‘लोकमान्य ते महात्मा’ आणि तुषार गांधींचं ‘लेट्स किल गांधी’ ही पुस्तकं आहेत. तरीही नसेल पटत तर, पाचगणीत गांधीजींवर हल्ला करण्यासाठी चाकू उगारणाऱ्या नथुरामला पकडणारे भि. दा. भिलारे गुरुजी मुंबईत राहतात आजही.
 
अमितभाईंच्या वैचारिक पूर्वसुरींची चतुर बनियाने अडचणच करून ठेवली होती. गांधीजींनी आपलं बनिया असणं कधीच नाकारलं नाही. तरीही ते जातींच्या पलीकडे गेले होते. चातुर्वर्ण्याचं समर्थन करण्यापासून आंतरजातीय लग्नांचा पुरस्कार करण्यापर्यंतचा बदल त्यांनी स्वतः
कमावला होता. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत, पण ते कधीचेच धर्माच्या पलीकडे गेले होते. ते कर्मकांडी धार्मिक नसले, तरी धर्माची पोकळी व्यापण्याचं मोल त्यांना माहीत होतं. राम गांधीजींच्या हातातून निसटला, तो थेट अडवाणींच्या हातात गेला. गांधीजींच्या अनुयायांना ही चतुराई ना कधी कळली, ना जमली. ते आदरणीय अमितभाईंच्या पथ्यावरच पडलं आणि पडतंय.
 
अमितभाईंच्या नरेंद्रभाईंना गांधीजींचं मोठेपण पक्कं माहित्येय. म्हणूनच ते भाषणांमध्ये हेडगेवार- गोळवलकरांऐवजी गांधीजींचे गोडवे गातात. अमितभाईंचा संघही गांधीजींचीच कॉपी करतो. तो गोसेवेची महती गातो. स्वदेशीसाठी जागरण करतो. साधेपणाचा आग्रह धरतो. आवर्जून खादी वापरतो. निसर्गोपचाराचे प्रयोग करतो. आदिवासींसाठी आश्रम बांधतो. आध्यात्मिक गुरुंना ताब्यात ठेवतो. प्रार्थना वगैरे न चुकता म्हणतो. गांधीवादाचं तत्त्वज्ञान एकात्म मानवतावाद्याच्या पुडक्यात बांधून वापरतो. तरीही हा बनिया इतका चतुर आहे की, तो संघवाल्यांच्या ताब्यात येत नाही. त्याला वारंवार मारूनही तो मरत नाही.
आदरणीय अमितभाई, एकच सांगायचंय, अशी कितीही कॉपी केली तरी गांधी असे नाही सापडायचे कधी. त्यांच्यासारखंच प्रामाणिकपणे जात, धर्म आणि देशाच्याही पलीकडे माणूस म्हणून जगायला लागलं, की मग मात्र गांधी भेटतील, अगदी कडकडून. हिंमत असेल तर एकदा बघा करून. मग तुम्ही त्यांना बनिया म्हणा की इतर काहीही...
 
लेखकाचा संपर्क : ९९८७०३६८०५
ssparab@gmail.com
बातम्या आणखी आहेत...