Home | Magazine | Rasik | sachin parab writes on poet vishnu surya wagh

शूद्रसुक्‍ताची लढाई

सचिन परब | Update - Aug 27, 2017, 03:00 AM IST

विष्णू सूर्या वाघ हा पहाडासारखा भरभक्कम माणूस गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गोव्याच्या राजकारण, समाजकारण आणि संस्कृत

 • sachin parab writes on poet vishnu surya wagh
  विष्णू सूर्या वाघ हा पहाडासारखा भरभक्कम माणूस गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गोव्याच्या राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरणात वादांच्या केंद्रस्थानी आहे. रुग्णशय्येवर नसते तर त्यांनी त्यांच्या `सुदिरसूक्त`कवितासंग्रहावरून सध्या सुरू असलेला नवा वाद एकहाती निभावला असता...

  ते मासे खातात, आम्हीही मासे खातो
  ते दारू पितात, आम्हीही दारू पितो
  ते बायकांना भोगतात, आम्हीही बायकांना भोगतो
  ते न्हातात, आम्हीही न्हातो
  पण न्हाल्यानंतर, ते पवित्र होतात
  आणि आम्ही मात्र, भ्रष्टच उरतो
  नाहीतर
  त्यांनी देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन
  देवाला कसं शिवलं असतं?
  आणि आम्ही बाहेरून दर्शन घेऊन
  कशाला सटकलो असतो?
  फरक आहेच, त्यांच्यात आणि आमच्यात

  शांत सुशेगाद गोव्यात सध्या या कवितेने धुमाकूळ घातलाय. कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या ‘सुदिरसूक्त’ या काव्यसंग्रहातली ‘फरक’ ही कविता. मूळ कविता कोंकणीत आहे. त्याचा हा भावानुवाद. बऱ्यापैकी जशाच्या तसा. पेपर, टीव्ही आणि सोशल मीडियावरच्या चर्चांमध्येच नाही, तर चार दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लढवत असलेल्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतच्या प्रचारातही ‘सुदिरसूक्त’ हा एक मुद्दा होता.

  विष्णू सूर्या वाघ हा पहाडासारखा भरभक्कम माणूस गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गोव्याच्या राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरणात वादांच्या केंद्रस्थानी आहे. कोणत्याही कविसंमेलनात त्यांची कविता कधी पडली नाही. वक्ते म्हणूनही त्यांना गोव्यात तोड नाही.
  गोव्यात दीर्घकाळ संपादक असणारे ल. त्र्यं. जोशी यांनी केवळ त्यांचं भाषण वैदर्भीयांना ऐकता यावं म्हणून नागपुरात गोवा महोत्सव आयोजित केला होता. मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांवर त्यांची पक्की हुकुमत आहे. वयाच्या तिशीच्या आत गोव्यातल्या दोन आघाडीच्या पेपरांचे ते संपादक होऊन त्यांनी गोवा गाजवला आहे. ते उत्तम नाटककार आहेत. ते गायक, नट आणि गायक नट आहेत. त्यांची नाटकं महाराष्ट्रातही गाजलीत. ते चित्रकारही आहेत आणि व्यंगचित्रकारही. तत्त्वज्ञान, अध्यात्म हादेखील त्यांच्या आवडीचा विषय. त्यांची रसाळ प्रवचनं ऐकण्यासाठी गर्दी होते. शिवाय ते राजकारणी आहेतच. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ते एकेकाळी वादळी प्रचारक होते. काँग्रेसमध्येही ते रमले होते. शिवसेनेचे ते प्रवक्ते होते आणि भाजपच्या तिकिटावर ते आमदार बनले होते. पहिल्याच टर्ममध्ये ते गोवा विधानसभेचे उपाध्यक्षही बनले होते. कला अकादमीचे अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचं काम गाजलं होतं.

  आता हे सारं वर्तमानकाळात न लिहिता भूतकाळात लिहावं की काय, असं वाटायला लावणारी परिस्थिती आहे. वाघांना जवळपास वर्षभरापूर्वी मागोमाग दोन हार्ट अटॅक आले. डॉक्टरने त्यांना जवळपास मृत घोषितही केलं होतं. त्यांनी केवळ दुर्दम्य जीवनेच्छेच्या जोरावर काळावर मात केलीय. ते आता व्हीलचेअरवर असतात. फारसं बोलू शकत नाहीत. ते फक्त बोलू शकत असते, तरी त्यांच्या कवितेकडे बोट दाखवायची कुणाची शामत नव्हती. ‘तुका अभंग अभंग’ या नाटकात पुरोहितांची टोळी संत तुकारामांचा खून करताना दाखवून त्यांनी दोन दशकांपूर्वी वादाला जन्म घातला होता. तो वाद त्यांनी निधड्या छातीने झेलला होता. तसाच ‘सुदिरसूक्त’चा वादही त्यांनी एकहाती निभावला असता. याच कवितासंग्रहात त्यांची ‘तुकलो’ नावाची कविता आहे. त्यावरून याची कल्पना येऊ शकते.
  दुस्वासाच्या खोऱ्यात घालून
  त्यांनी तुडवले तुझे अभंग
  घातले इंद्रायणीचे पात्रात
  त्यांना वाटलं तुला काळाने गिळून टाकलं.
  पण त्या दीडदमडीच्यांना कुठे माहीत?
  बहुजनसमाजाच्या ओटीत त्या आधीच
  तुझ्या अध्यात्माचे वीर्य साकळलंय!

  बहुजनवाद हा विष्णू वाघांच्या कवितेचाच नाही, तर व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातल्या सत्ताधाऱ्यांनी गोव्यातल्या बहुजन समाजावर वर्षानुवर्षं अन्याय केल्याचा इतिहास आहे. त्यावर वाघ कायम तुटून पडत आलेले आहेत. `सुदिरसुक्त` या काव्यसंग्रहाचा तर विषयच तो आहे. सुदिरसूक्त म्हणजे शूद्रसूक्त. त्यात जातींचे थेट उल्लेख आहेत. भाषा कडक आहे. कुणाला ती शिवराळही वाटू शकते. शिव्या हे बहुजनांचं शस्त्र असल्याचं वाघ त्यांच्या ‘गाळी’ या कवितेत सांगतात.
  आम्ही शिकलो, शिकून सभ्य झालो
  त्यात भ्रष्टलो, शिव्या विसरलो
  तेव्हापासून, आमचे दांडे
  आम्हीच मोडून घातले
  आता ते, आम्हाला भीत नाहीत...
  कशाला म्हणाल तर
  त्यांनी आमची कापाकापी केल्यावरही
  आम्ही शिव्या घालत नाही.

  गोवा कोकणी अकादमीच्या पुरस्कारांसाठी ‘सुदिरसूक्त’ या काव्यसंग्रहाची निवड होऊ घातली होती. पण तीन परीक्षकांमधील एक संजीव वेर्णेकर यांनी आधीच निकाल फोडला. वाघांची कविता समाजात फूट पाडणारी आणि अश्लील असल्याचा आरोप करत त्यांनी या पुरस्काराला विरोध केला. इतर दोन परीक्षकांनी बहुमताच्या जोरावर ‘सुदिरसूक्त’ची निवड केल्यामुळे त्यांचा नाइलाज झाला. त्यामुळे ते होऊ नये या हेतूने त्यांनी आधीच माध्यमांमध्ये आपली भूमिका मांडली. त्यावरून दोन तट होऊन जोरदार हमरीतुमरी सुरू आहे. अर्थात विष्णू वाघांना गोवा कोकणी अकादमीच्या पुरस्काराचं फार कौतुक नसावं. त्यांना यापेक्षाही मोठमोठे पुरस्कार मिळालेत. फक्त कुणाच्या तरी बुरसटलेल्या विचारांमुळे ‘सुदिरसूक्त’ला पुरस्कार नाकारला जाणं योग्य नाही. रुग्णशय्येवर पडलेले वाघ केवळ आपल्या अस्तित्वाने कवितेच्या सन्मानाची लढाई लढत आहेत. गोव्यातल्या केवळ बहुजन समाजातलेच नाही तर गौड सारस्वत ब्राह्मणांमधलेही संवेदनशील लोक त्यांच्या सोबत आहेत. वाघांकडे सत्ता असताना त्याचे फायदे उकळणारे महाराष्ट्रातले त्यांचे कविमित्र मात्र या लढाईत कुठेच दिसत नाहीत. ‘सुदिरसूक्ता’तून वाघांनी घातलेली साद त्यांना ऐकू येत नाहीय.

  नवयुगाची मशाल घेऊन
  पुढे गेलेल्या भावांनो,
  माझ्यासाठी परत याल
  मला सामील कराल
  तुमच्या प्रकाशाच्या यात्रेत.
  तुमच्या भगभगीत काजव्यांमध्ये
  आणखी एकाची भर पडेल.
  क्षणाक्षणाला धगधगती
  माझ्या आयुष्याची ती चूड आहे.
  ssparab@gmail.com
  लेखकाचा संपर्क : ९९८७०३६८०५

Trending