आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीतल्‍या विद्रोहाची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यात्माचा दुसरा अर्थ विवेक असा आहे. त्या अर्थाने विवेकाने जे साधलं जातं ते अध्यात्म. मात्र, आज वास्तव हे आहे की, वारकरी परंपरेतील आजरेकर फडाचा वारसा पुढे चालवू पाहणाऱ्या संपत देसाईंना पंथाचेच नाव घेऊन धमकावले जात आहे... 

आंबोली घाटमार्गे कोकणात उतरण्याआधी आजरा लागतं. तिथून डोंगराच्या दिशेने आणखी पाच किलोमीटर आत गेलं की पेरणोली गाव येतं. गावाच्या वेशीवरच कॉम्रेड संपत देसाईंचं घर आहे. आपल्यासाठी धावणाऱ्या, लढणाऱ्या कार्यकर्त्याला घर हवं, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या चार-पाच तालुक्यांतल्या लोकांनी वर्गणी काढून त्यांना हे घर बांधून दिलेलं. या घरात गुरुवारी २६ ऑक्टोबरला पोस्टाने एक पत्र पोहोचलं. फुलस्केपच्या तीन पानांवर हाताने लिहिलेल्या या पत्रातली अक्षरं धमक्यांनी रक्ताळलेली होती. ‘जय श्रीराम, जय हनुमान, जय शिवराय’ अशी पत्राची सुरुवात करणाऱ्या आराध्यांच्या शिकवणुकीशी बेइमानी करणारा मजकूर पुढे होता. पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला ‘कट्टर हिंदुत्ववादी’ असं म्हणवून घेतलंय.  तू आता डोचक्यात बसलाईस. तवा मर्यादेत वाग. न्हाईतर लांडक्यांच्या आदी तुलाच हिसका दाकवू...’ अशी या पत्रातली कॉम्रेडना संपवून टाकणारी हिंसक आणि विखारी भाषा आहे.

दक्षिण महाराष्ट्रात कॉम्रेड संपत देसाईंना वेगळ्या परिचयाची गरज नाही. डॉ. भारत पाटणकरांच्या ‘श्रमिक मुक्ती दला’चे संघटक म्हणून ते काम करतात.  धरणग्रस्तांच्या प्रश्नावर त्यांनी केलेलं काम महत्त्वाचं आहे. विशेषतः चित्री धरणाच्या लढ्याचं त्यांनी केलेलं नेतृत्व. सगळ्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन झाल्यानंतरच धरणात पाणी सोडायला लावणारं ते राज्यातलं पहिलं धरण ठरलं. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कायद्यात बदल घडवून आणण्यातही त्यांचा पुढाकार होता. पहिल्या विद्रोही संमेलनाच्या आयोजनापासून ते विद्रोही चळवळीत ते सक्रिय आहेत. दक्षिण कोल्हापुरातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी लढे दिले. कधी अपंगांचा मोर्चा काढला, कधी धनगरांवरचा अन्याय दूर करून घेतला. त्यांच्या जनसंपर्कामुळे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदापासून मोठ्या पक्षांच्या आमदारकीच्या तिकीटापर्यंत अनेक मान मरातब त्यांच्यापर्यंत चालत आले. पण ती प्रलोभनं सोडून फाटकं राहणंच त्यांनी पसंत केलं. त्यामुळे आज दर महिन्याला कोणतीही निश्चित आर्थिक आवक नसतानाही लोकांच्या आधारावर कॉम्रेडचं घर टिकून आहे.  
असंच फिरता फिरता कॉम्रेड कधीतरी ‘रिंगण’ वार्षिकाच्या संपर्कात आले. तिथे त्यांना आजरेकर फडाविषयी कळलं. डॉ. सदानंद मोरे यांनी ‘तुकाराम दर्शन’ या महाग्रंथात वारकरी परंपरेतल्या आजरेकर फडाविषयी महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलीत. मूळ आजऱ्याचे असलेल्या बाबासाहेब आजरेकरांनी १८३२ मध्ये हा फड सुरू केला. वारकरी विचारांना दर्शन म्हणून मांडताना माउली बाबासाहेब आजरेकरांनी भक्तीचं मोल नव्याने सांगितलं. त्यासाठी बंडखोरीही केली. आम्ही फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीलाच भजणार असं सांगत अध्यात्माच्या नावाने चालणाऱ्या इतर कचऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजरेकर फडाच्या हरिमंदिरांमध्ये दीर्घकाळ कोणत्याही मूर्तीएेवजी फक्त ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत आणि तुकोबारायांची गाथा या ग्रंथांच्या हस्तलिखित पोथ्या असायच्या. एरवी, इतर फडांमध्ये वारसाहक्काने फडाचे प्रमुख ठरतात. पण इथे लोकशाही पद्धतीने मिळून पुढचा प्रमुख ठरवला जातो. त्यामुळे बाबासाहेब आजरेकर या सारस्वत ब्राह्मण समाजातल्या मूळपुरुषानंतर या फडात माळी, मराठा अशा विविध जातींतील प्रमुख झालेत. या फडाने तुकाराम महाराजांचे सरकारी गाथेत नसलेले अनेक बंडखोर अभंग सांभाळून ठेवलेत. तसंच परंपरागत चालीत ज्ञानेश्वर माउलींचे अभंग गाण्याची वेगळा वारसाही यात आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यावर ‘प्रार्थना समाज’ सुरू करताना या फडाचा प्रभाव असल्याचे दाखलेही शोधता येतात. या फडाने साने गुरुजींच्या दलित मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाला समर्थन दिलं.   

हे सारं समजून घेतल्यानंतर कॉम्रेड संपत देसाईंना त्यांच्या चुलत्यांची आठवण झाली. ते जिवंत असेपर्यंत त्यांनी कधी पांडुरंगाखेरीज दुसऱ्या कोणत्या देवाला नमस्कार केला नाही. घरी सत्यनारायण घालू दिला नाही. लग्नात पुरोहिताला बोलावू दिलं नाही. ते तुकोबांच्या विचारांशी आजन्म एकनिष्ठ राहिले. कॉम्रेडने चौकशी केल्यावर कळलं की, ते आजरेकर फडाच्या एका दिंडीचे विणेकरी होते. आपला हा वारसा समजून घेण्यासाठी कॉम्रेडनी ‘रिंगण’च्या सोबतीने आजऱ्यातच  ९ एप्रिल २०१६ ला ‘आजरेकर फड कृतज्ञता सोहळा’ आयोजित केला. त्यासाठी आजरेकर फडाच्या तिन्ही शाखांचे प्रतिनिधी पहिल्यांदाच एकत्र आले. लांबून लांबून फडाचे वारकरी मोठ्या संख्येने आले. सदानंद मोरेंनी त्यांना आजरेकर फडाचं महत्त्व सांगितलं. ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे नियंत्रक राजाभाऊ चोपदार आवर्जून आले. आजरा शहराच्या विस्मृतीत गेलेला एक वारसा या कार्यक्रमामुळे उजळून निघाला.  कॉम्रेडने आधीही त्यांच्या गावात वारकरी परिषद आयोजित केली होती.  परंतु  एका विद्रोही पुरोगाम्याने अध्यात्माच्या क्षेत्रात घुसणं धर्मांधांना खटकणं स्वाभाविक आहे. तुम्ही कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, शोषितांच्या, दलित-आदिवासींच्या, स्त्रियांच्या, अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर हवं तितकं बोला, काम करा, पण आम्ही घुसखोरी केलेल्या अध्यात्माच्या क्षेत्रात विवेकाला घेऊन शिरलात अशी त्यांची भूमिका असते. तोच राग कट्टरवाद्यांनी पाठवलेल्या पत्रातून व्यक्त झालाय.  

दक्षिण महाराष्ट्रातला कृष्णाकाठ कायम परंपरेशी नातं टिकवून पुरोगामित्वाची पताका खांद्यावर घेऊन चालत आला आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी कृष्णाकाठ समृद्ध आहे. पण गेल्या काही वर्षांत धर्मद्वेषाने या पवित्र मातीत विष पेरलंय. त्याचे धक्कादायक परिणाम आता दिसू लागले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनांमध्ये प्रामुख्याने इथल्याच माथेफिरू तरुणांची नावं आरोपी म्हणून नोंदवली गेलीत. कॉम्रेडना आलेलं पत्रंही त्यांच्याच या परिसरातील मडिलगे या गावातून आलेलं आहे. पत्र लिहिणारा वारकरी नाही हे त्याच्या भाषेवरून स्पष्टच आहे. तो हिंदुत्ववादीही नाही, कारण इथल्या परंपरेतले हिंदुत्वादी कार्यकर्तेही सर्वांशी मिळून मिसळून राहताना दिसतात. हे पत्र लिहिणारा धर्मांध, अतिरेकी आहे. हिंदू धर्मही त्याला कळलेला नाही, मग संत तर दूरच राहिले. त्या माथेफिरूचा साधा शोधही पोलिसांना घेता आलेला नाही, याचं आश्चर्य आहे. पण कॉम्रेड संपत देसाईंचे सहकारी शांत बसलेले नाहीत. ७  नोव्हेंबरला आजऱ्याच्या भाजी मंडईत निर्धार रॅली त्यांनी आयोजित केली आहे. त्याला राज्यभरातून भालचंद्र कानगो, भारत पाटणकर, श्रीपतराव शिंदे, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, प्रमोद मुजुमदार, हुमायून मुसरूल, धनाजी गुरव,  गौतमीपुत्र कांबळे, भीमराव बनसोड, उदय नारकर, अंकुश कदम असे आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने कृष्णाकाठचं विष संपवण्याचा निर्धार व्हायला हवा, हीच विवेकवादी वारकऱ्यांची मागणी आहे.  

- सचिन परब, ssparab@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९९८७०३६८०५
बातम्या आणखी आहेत...