आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Paranjape Article About A Baby Girl’s Feelings

पाळण्‍यातून पाहताना...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सकाळी उठायचा खरं तर मला प्रचंड कंटाळाच आला होता, पण काय करणार? माझ्या आजूबाजूला इतका गोंगाट सुरू करतात ना हे लोक की मला उठावंच लागतं. इलाजच नसतो. सकाळी सकाळी ती शोभाताई येते मला आणि ममाला अंगाला लावायला. इतकी इरिटेटिंग बाई आहे ना की सांगायची सोयच नाही हो. मी तिच्या आवाजाने दचकून रडायला लागले की, ही अजून मोठमोठ्याने ‘काऽऽऽय झालं माझ्या सोनुलीला? कश्शाला रडतेस?’ हे असले बकवास डायलॉग बोलायला लागली की माझं डोकंच उठतं; पण इलाज नसतो. मी पडले इवलीशी आणि अशक्त. माझ्या हातापायात शक्ती असती तर हिची खैरच नव्हती. अहो, सकाळी उठल्यानंतर मला काही कळायच्या आतच ही मला नंगू करून कसली कसली खरखरीत उटणी, पावडरी, तेलं चोळायला सुरुवात करते. हात चोळ, पाय चोळ, पाठ चोळ. नंतर गरम पाण्याने शेक. नाक चोळून आतली घाण काढून टाक. नंतर लगेच अंघोळ. अंघोळ झाली की खसखसून पुसून टाकते. मग नाकातोंडात जाणा-या धुरात धरते (कशाला तर म्हणे शिंका येऊन नाक स्वच्छ होते. तो धुपाचा उग्र वास आताशा मला सहनही होत नाही हो, पण इलाजच नसतो. पण मी कशीबशी अधूनमधून हसण्याची अ‍ॅक्टिंग करते (मग हिला वाटतं, बेबी मजेत आहे) मग तिची बडबड जरा कमी तरी होते. माझं रडणं आणि हिची बडबड एकत्र झाली की अख्ख्या घरात तमाशा. काल तर पपा डोकावूनही गेले काय झालं सोनूला इतकं रडायला म्हणून? अंघोळीनंतर मग दुपट्यात गुंडाळून पाळण्यात झोपवून शोभाताई गेली की जरा शांतता पसरते मग घरात.


इतका प्रचंड हेवी मसाज, स्टीमबाथ नंतर ऑब्व्हियसली मला जरा पेंग येते न येते तोवर च्यायला नेमके कुठले तरी नातेवाईक टपकतातच मला बघायला. बाळासारखं बाळ, त्यात काय एवढं बघायला यायचंय? मी डोळ्यांच्या कॉर्नरमधून बघते आणि झोपण्याची अ‍ॅक्टिंग करते. ‘झोपलीये वाटतं सोनू? झोपू दे, झोपू दे,’ असं म्हणत नंतर मी ममासारखी दिसते की पपांसारखी, यावर दोन मिनिटे चर्चा. रंग छान गोरा आहे, असं म्हणत एखादी आजीबाई ममाला अजून चार-दोन गोष्टी उटण्यात घालायच्या सूचना देते. कोणी तरी माझ्या उशाशी शंभराची, कधी पाचशेची नोटही ठेवून जातात. (मी हात लावायच्या आत ममा उचलून ठेवते ती नोट. ‘आता पुढल्या महिन्यापासून तुझ्या नावे आरडी उघडूया हं,’ असं म्हणत कपाटात ठेवूनही देते. असं गेले दोन महिने म्हणतेय, पण अजून आरडी का काय म्हणतात ते उघडलेलं दिसत नाहीये.) काय करते कुणास ठाऊक? आत्तापर्यंत चोवीसशे रुपये झालेत गोळा (मला येतात मोजता.) मोठी झाले की मागून घेईन की नाही बघा.


माझं दिसणं यावर कोणताही नातेवाईक आला की पंधरा मिनिटे चर्चा करतोच करतो. हिचं नाक केशव आजोबांसारखं आहे. हिची जिवणी (म्हणजे काय कोण जाणे) ही माईआजीसारखी आहे. पपांकडचे रिलेटिव्ह आले की त्यांना मी पपांसारखीच दिसते.


मग ते तिकडच्या वर बाप्पाकडे गेलेल्या नातेवाइकांपैकी मी कोणाचं रूप घेऊन आलेय त्याची यादी सुरू करतात. आणि ममाकडचे आले की त्यांची लिस्ट ऐकवतात. च्यायला म्हणजे मी माझ्यासारखी दिसतच नाहीये की काय?
हळूहळू दुपार होते. मग मध्येच एकदा माझं मिल्क फीडिंग झालं की आई कसल्याशा भयंकर चवीच्या गुटी/कडू औषधांची पेस्ट कायतरी घेऊन येते आणि मग ती कशातनं तरी पाजायचा प्रयत्न करते. वेखंड, हरडा, सागरगोटा, रिंगणी, कडुकिराईत, वावडिंग, समुद्रफेस... काय काय भयंकर नावे आहेत हो? ते पिताना माझ्या तोंडाला फेस येतो, ते कोणीच बघत नाही. आणि हे भरवताना माझ्याशी बोबडं का बोलतात देव जाणे? मला स्पष्ट मराठी कळतंय तरीही. ‘आश्शं नाई कलायचं सोनू. तुला मोथ्थं व्हायचंय ना? मग हे घ्याय्लाच हवं. मग पोटात बाऊ नाही होनाल...’ हे असं बोलायला लागले की मला जाम वैताग येतो. मी मग रडायला सुरुवात करते. एकदा तर नेम धरून मी वाटीला जी लाथ दिली की ती वाटी सांडलीच; पण माझं टायमिंग चुकलं सालं. भरवणं संपत आलं आणि मी लाथ मारली त्यामुळे ममाने पुन्हा तितकी वाटी फुल्ल भरून आणली आणि मला कोंबत होती. असो.


नंतर दादा शाळेतून यायची वेळ होते. तो तसा शांत आहे. शाळेतून आला की डायरेक्ट माझ्या पाळण्याजवळ येतो. ममा आतून ओरडत असते, ‘हात पाय धू आणि मग जा तिच्याजवळ.’ पण तरी तो ऐकून न ऐकल्यासारखं करतो आणि येऊन माझ्या दोन-चार पाप्या घेतोच. त्याच्या अंगाला घामाचा, शाळेतल्या टिफिनचा, मातीचा वास येत असतो; पण तरीही मला त्याचं पापी घेणं आवडतं. माझा डिअर ब्रो आहे ना तो. तो माझी खूप केअर घेतो. तो बोबडा बोलत नाही. माझ्या पाळण्याजवळ येऊन शाळेतल्या गमतीजमती सांगतो, त्याला प्राइझ मिळालं असेल तरी तो ममापपांआधी मला सांगतो. मी खुदकन हसले की जाम खुश होतो. एकदा त्यानं आनंदाच्या भरात कोणी
नाही असं बघून डेअरी मिल्कचा एक तुकडा माझ्या तोंडात कोंबला (मला दात नाहीत हे त्याला नाही समजलं बिचा-याला) मला लागला ठसका. तशी ममा धावत आली आणि तुकडा काढला. आणि दादाला बिचा-याला दोनचार धपाटे दिले ठेवून. तो रडू लागला म्हणून खरं तर मी रडत होते, पण ममाला वाटलं, मी ठसका लागल्याने रडतेय. ‘बघ मूर्खा... अरे गुदमरून काही झालं असतं तर तिला...’ असं म्हणत त्याला अजून फटके ठेवून दिले. तो रडत रडत निघून गेला. आय रिअली फेल्ट सॉरी ब्रो.
पपा शांत आहे तसा. संध्याकाळी आला की डेटॉलने स्वच्छ हातबीत धुऊन मला पाळण्यातून घेतो. अंगणात फिरवत बसतो. जुन्या कविता ऐकवतो, गाणी गातो. त्याची दाढी कधीकधी पापी घेताना मला मुद्दामहून टोचवतो आणि मी तोंड वाकडं केलं की घाबरतो. कधी कधी मला बघत गंभीर होतो आणि ममाला म्हणतो, ‘आता ही वर्षाची झाली की एखादी लाँग टर्म पॉलिसी काढूया. हिच्या एज्युकेशन, करिअरसाठी.’ पपा शांत आहे. तो म्हणतो, आपली फॅमिली आता ‘फोर स्क्वेअर फॅमिली’ झाली.


संध्याकाळ थोडी बोअर जाते; पण मला सगळ्यात वैताग येतो तो म्हणजे हे लोक मला पाळण्यात टाकून टीव्ही बघायला जातात तेव्हा. दादाचं कार्टून, ममाच्या सीरिअल्स, पपांची न्यूज चॅनेल्स यांच्या वेळा फिक्स आहेत; पण माझं काय? मला म्हणे टीव्ही दाखवायचा नाही. डोळे बिघडतात. अरे, पण मी कशी एंटरटेन करू स्वत:ला. मग कंटाळा आला की पाळण्यावर लावलेल्या गोलगोल फिरणा-या बदकाकडे बघत बसते, नायतर तोंडात घालायचं एक खेळणं आहे ते चावत विचार करत बसते. पण एकंदरीत बोअर होतं. अशातच मग सातेक वाजता झोप लागते. नऊ वाजेपर्यंत यांचं सगळं आटपलं की मला जाग येते. मग फीडिंग झाल्यावर पुन्हा कशी झोप येणार? हे झोपायला गेले की माझं टाळकं सटकतं. मी मध्येच घड्याळाकडे बघते. मला माहितीये दोन्ही काटे एकमेकांवर आले की मी ठो ठो रडायला सुरुवात करते. ममा जागी होते. ‘कारटीला बरोबर बारा वाजले की कळतात. मागच्या जन्मी भूत होती की काय देव जाणे,’ असं वैतागून म्हणते. पुन्हा फीडिंग करते आणि झोपी जाते. मला तिची दया येते. बिचारी घरची जेवणं, दादा-पपांची तयारी, आवराआवरी करत असतेच. मग मी पुन्हा रडत नाही. ती झोपी गेली की मी पाळण्यावर लटकवलेलं हलणारं बदक पाहत झोपी जाण्याचा प्रयत्न करते. अशीच मध्ये पेंग येते आणि मी झोपते ती डायरेक्ट शोभाताई किंचाळायला लागल्या की सकाळीच जागी होते मग.


astroguru.sachin@gmail.com