आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदलांचे हिरवे गाणे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋतू बदलले की झाडांना पर्याय उरत नाहीत...’ प्रतिभासंपन्न कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांचं हे काव्यविधान व्यक्तीला त्याच्या अस्तित्व जाणिवेची बूज राखायला शिकवून जातं... पुढे पुढे सरकणारे दिवस मागं बरंच काही ठेवून जात असतात, हे विसरून कसं जमेल. ‘बदल’ हा शब्द जगातला सर्वात मोठा नियम... बदल स्वीकारणारी व्यक्ती एकीकडे ‘यारा सिलीसिली बिरहा की रात का जगना’ असं लिहू शकते, तर दुसरीकडे ‘जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है...’ या अशा ओळीसुद्धा त्यांच्या लेखणीतून सहजतेनं सदाबहार होऊन बाहेर पडत असतात... परंतु कोणत्याही समाजात असे ‘गुलजार’ कमी असतात, हे मात्र त्या समाजाचं दुर्दैव असतं.

चेंज हा सृष्टीचा अंतिम निर्णय असतो. ज्याला हा निर्णय ऐकू येतो तो वर्तमानात भविष्याची नांदी उभी करण्यासाठी सज्ज होऊन जातो. मात्र ज्याला या निर्णयाचं सोयरसुतक नसतं, त्याला त्याचा भविष्यकाळ तितकंसं बरं जीवन दाखवत नाही, हे मात्र अगदी पक्कं. लहान मूल जिज्ञासू असतं, त्यामुळे त्याच्या विकासामध्ये असा एक झपाटा असतो... हे काय... ते काय... सतत हे असं विचारून विचारून ते मूल आपल्याला भंडावून सोडतं... किशोरवयीन अवस्थेत ही उत्सुकता आणि जिज्ञासा अधिक वाढते, अन् पुढे त्याच्या तरुणपणात तर या उत्सुकतेला जिज्ञासेचं टोक मिळतं... अशा वेळी तर मग प्रत्येकच गोष्ट त्याला माहीत करून घ्यावीशी वाटते... जगातलं आजूबाजूचं सारं सारं आपलं व्हावं किंवा किमान जे आपल्याला भावतंय ते तरी आपल्याला गवसावं, अशी त्याची धारणा व्हायला लागते... याच ठिकाणी तो जिज्ञासेच्या वृत्तीतून महत्त्वाकांक्षेच्या विश्वात प्रवेश करतो... एकदा का तो महत्त्वाकांक्षी झाला की मग बर्‍या-वाईट अनुभवांची मालिकाही त्याच्या जीवनात सहजतेनं प्रवेश करते. मात्र याच कालावधीत त्याच्यात विद्रोहाचे अंकुरसुद्धा मोठ्या प्रमाणावर उगवायला लागतात... युरोपमध्ये एक जुनी म्हण आहे... व्यक्ती तरुणपणात साम्यवादी बनते तर उतारवयात समाजवादी... अंगातली रग त्याला त्याच्या बाह्या वर करायला लावतेच... कुणाशी दोन हात करायलादेखील तो मागंपुढं पाहत नाही... उजाडेल तिथं उजाडेल, ही सरळसोप्पी व्याख्या मग त्याच्या जीवनाची फिलॉसॉफी बनून जाते. त्या-त्या वेळी त्याला यश मिळतं ज्या-ज्या वेळी तो स्वत:च्या कानापेक्षा काळाचं ऐकतो... असं काळाचं ऐकणाराच खर्‍या अर्थानं लंबी रेस का घोडा बनू शकत असतो... मी मी म्हणणारे कित्येक जण काळाचं म्हणणं एक तर ऐकतच नाहीत किंवा ऐकून न ऐकल्यासारखं करतात. अशांची भविष्यात माती झाल्याशिवाय राहत नाही, कारण ही मंडळी ‘बदल’ या शब्दाच्या आसपासही भटकत नाहीत.

हम बोले सो कायदा, असं म्हणत सुरू केलेला प्रवास कदाचित आपल्या ठिकाणापर्यंत आपल्याला नेईलच असे नाही. कोणत्याही अनुचित मर्यादा व्यक्तीच्या विकासाला घातकच असतात. आम्ही आणि आमचं या अशा शब्दांना जगात फारशी किंमत नसते, हे लक्षात ठेवावं आपण... संकुचित आणि अशा दृष्टीनं मर्यादित वृत्ती जिवंतपणाचा आणि बुलंदीचा आधार बनू शकत नाही. मी मी म्हणणारी संस्कृत भाषा या देशातून जवळपास नामशेष झाली, त्याचं कारणच ते आहे... मुळात भाषा लहान-मोठी असत नाही, तिला वापरणार्‍यांच्या कुवतीवर आणि वृत्तीवर त्या भाषेचा उत्कर्ष ठरत असतो. आजघडीला दहावी किंवा बारावीला अधिकचे गुण मिळावे, याच एका हेतूने संस्कृतसारख्या भाषेला घेण्यात येतं. हे नेमकं कुणाचं दुर्दैव? किमान संस्कृतच्या पाठीराख्यांनी या बाबीकडे जरा टाच उंच करून बघावं. ज्याने त्याने आपापला मार्ग धुंडाळत असताना स्वत:चं आणि आपल्या आजूबाजूच्यांचं जीवन मात्र हिरवंगार करावं... येणार्‍यांना येऊ द्यावं... जाणार्‍यांना जाऊ द्यावं. अपेक्षा हे दु:खाचं मूळ कारण असल्यानं स्वामित्वाची बूज नेहमीच राखता येत नाही जीवनात. अन्यथा तथागतांना अपेक्षित अत्त दीप भवचा मार्ग जीवनात आनंद घेऊन येणार नाही. बदलाची किंवा परिवर्तनाची चाड असल्याशिवाय समाजात समग्र क्रांती होत नसते. वैयक्तिक दु:ख सामाजिक झालं पाहिजे... चार-पाच डोक्यांमध्ये निर्माण झालेला विचार लगेचच त्या समाजात आमूलाग्र बदल करेलच असे नाही.

कुठल्याही प्रयत्नाला अस्सलतेची साथ लाभली की अशा ठिकाणी मग नवनिर्मितीचे अंकुर जलद गतीनं फुटायला लागतात. भारावून टाकावं असं बरंच काही मग घडायला लागतं आपल्या जीवनात, ज्या वेळेस अशा प्रत्येक क्षणाची दोन्ही हातांनी काळजी घ्यायला आपण पुढे सरसावतो. निरीक्षणांचा आधार हा कणा बनत असतो, आपल्या वळण घेत जात असलेल्या जीवनासाठी. मात्र या क्षणांना जर आपण पाहिजे तेवढी अहमियत दिली नाही तर भविष्य एक प्रकारे रुसून बसतं आपल्यावर, मग कुठले नवस-अंगारे कामाला येत नाहीत. सृजनाची शक्ती वास्तवाचे भान देणारी असावी, हेही तितकेच महत्त्वाचे; नसता अक्कल असून शिस्त नसल्यासारखे व्हायला लागते. भयकंपित मनाने कुठलेच निर्णय घेऊ नये. मुळात भय आणि यश यांचा असा कुठला दूरदूरचाही संबंध नसतो.

निर्मितीला आणि त्यातून मिळणार्‍या यशाला तडजोडीची भाषा समजतच नसते, हे आपण डोक्यात अगदी फिट्ट करून घ्यावं. खणखणीत नाणं असेल ना तर ते वाजतंच... कोंबडा आरवला नाही म्हणजे काही सूर्य उगवायचा राहत नसतो... मोठ्या गोष्टी मोठ्याच असतात...

युद्धाला निघायच्या आधी मी हरेन का... आणि मग हरलो तर कसं... असे विचार डोक्यात घेऊन युद्धभूमीवर उतरणार्‍यांना मग कोण जिंकवून देईल. जिंकायचं म्हटल्यावर बस जिंकायचं... इतका आणि एवढाच काय तो विचार तुमच्या डोक्यात असला पाहिजे... याच्या-त्याच्याशी स्पर्धा करून स्वत:ला जिंकवण्याची इच्छाशक्ती फारशी कामाची ठरत नसते, त्यापेक्षा रोज आणि रोजच स्वत:ला कालपेक्षा अधिक सक्षम, कृतिशील आणि शिस्तबद्ध बनवत नेणं... यातूनच यशाची पायवाट ज्याला त्याला सापडून जाईल...