आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरमेची गोष्ट लाइफमंत्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्याख्यान झाल्यावर कित्येक जणी त्यांचं मन, त्यांच्या समस्या, त्यांचं दु:ख व्यक्त करतात, त्या वेळी एकीएकीचं दु:ख वा त्यांचे अनुभव ऐकत असताना कोणत्या आधुनिकतेच्या गप्पा हाणत बसलोय आपण, असा सवाल मनात उभा राहायला लागतो...

दर तेरेसा नेहमी म्हणत, ‘माय लाइफ इज माय मेसेज.’- ‘आपलं जीवनच आपला संदेश बनू शकतं.’ यात दुमत असण्याचं कुठलंच कारण नसावं. एरवी, नव्या-जुन्या परंपरांचं संचित म्हणजे त्या त्या देशातल्या जगण्याच्या व्याख्या ठरतात. समाजमान्यतेतून निर्माण झालेल्या कुठल्याही परंपरा एकतर धर्माच्या सावलीखाली मस्तपैकी जिवंत राहतात किंवा त्यांना त्या त्या देशातील पुरुषी अहंकाराचं कवचकुंडल प्राप्त होत जातं. अशा निर्माण झालेल्या किंवा निर्माण करण्यात आलेल्या कोणत्याही परंपरा बहुत करून सरंजामी मानसिकतेतूनच निर्माण होताना दिसतात. कोणत्याही सरंजामी मानसिकतेचा वा वागणुकीचा पहिला बळी त्या देशातला एकतर सर्वात कमकुवत समाज तरी असतो किंवा त्या देशातली स्त्री तरी असते. आपला देशही यास अपवाद नाही. सती परंपरेच्या नावाखाली जळत्या चितेवर महिलेला बांधून जिवंत जाळण्याचा अमानुषपणा क्वचितच दुसऱ्या कुठल्याशा देशात घडला असेल. त्या आगीचे जीवघेणे चटके जाणवताच, चितेवरून उडी मारू पाहणाऱ्या त्या स्त्रीला पुन्हा त्या चितेत ढकलण्यासाठी काही ‘मर्द’ हातात लांब लांब बांबू घेऊन उभे राहायचे. काय हा शूरवीरपणा…
हे झालं गतकाळातलं एक उदाहरण… मात्र आजही अशा ना तशा विविध लाजिरवाण्या प्रथा देशभरात डंके की चोट पर राबवण्यात येतात, हे काही लपून रािहलेलं नाही.
लहानपणापासूनच मुलीला किती किती वाईट बाबींना अनुभवत पुढं पुढं सरकत जावं लागतं याची दाहकता लक्षात घेतली, तर डोकं सुन्न होऊन जातं. व्याख्यानाच्या निमित्तानं मी विविध शहरांमध्ये- गावांमध्ये जात असतो. अनेकदा महिलांचे जथ्थेच्या जथ्थे माझ्या व्याख्यानाला गर्दी करतात… व्याख्यान झाल्यावर कित्येक जणी त्यांचं मन, त्यांच्या समस्या, त्यांचं दु:ख व्यक्त करतात, त्या वेळी एकीएकीचं दु:ख वा त्यांचे अनुभव ऐकत असताना कोणत्या आधुनिकतेच्या गप्पा हाणत बसलोय आपण, आणि कोणत्या उज्ज्वल परंपरेचे दाखले देत असतो आपला समाज, असा सवाल मनात उभा राहायला लागतो.
कित्येक मुलींच्या जीवनात त्यांच्या नकळत्या वयापासून आलेले अत्यंत जीवघेणे अनुभव ऐकल्यावर तर अंगावर काटा उभा राहतो. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासून कित्येकींना शारीरिक शोषणाचा सामना करावा लागतो. हे असं कोण करतं, तर बाळा बाळा म्हणत, बेटा बेटा म्हणत, तू माझ्या मुलीसारखीच असं म्हणत... नको तिथे स्पर्श करणारा त्या मुलीचा अत्यंत जवळचा नातेवाईक. म्हणजे, लांबचा कुणी मामा, काका वा भाऊ. मात्र खरं तर भयानक तर याही पुढं असतं की, आता हे सगळं सांगू कुणाला आणि कसं सांगायचं? या चक्रात त्या अडकतात. सांगण्याची हिंमत करावी म्हटलं, तर नातेवाइकांमधे काय चर्चा सुरू होईल किंवा आपल्या अशा सांगण्यामुळे कुटुंबाच्या नातेसंबंधावर परिणाम होईल, या गुंत्यात त्या अडकून जातात. असा अनुभव आलेल्या काही जणी जेव्हा घरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा “चूप बस काहीही बरळू नकोस… कळतंय का तुला तू काय बोलत आहेस... आमचं नाक कापतेस का…त्याने वा त्यांनी उगाच पाठीवरून मायेचा हात फिरवला असेल तुझ्या’, असं बोलून त्या मुलीची अधिक जास्त कुचंबणा करून टाकतात…
हे सगळं भयंकर आहे… त्रासदायक आहे, पण दुर्दैव हे की, हे समाजातलं सत्य आहे. खरं तर अशा मुलींच्या मागं त्यांच्या कुटुंबांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे... कुठल्याशा नालायक व्यक्तीमुळं आपल्या मुलीचं भवितव्य अंधकारमय होऊ नये, याची त्या त्या पालकांनी काळजी घेतली पाहिजे. मुलगी जे सांगतेय ते जर खरं असेल, तर कुठले फुटकळ नातेसंबंध जपत बसलोय आपण... असं काही कळताच शहानिशा करून जर मुलीचं म्हणणं सत्य असेल, तर अशा ‘व्हाइट कॉलर’वाल्यांचा खरा चेहरा जगापुढे आणलाच पाहिजे. पण अनेकदा असं होत नाही. आपल्या मुलीची बदनामी होईल, वा आपल्या सो कॉल्ड खानदानाची अब्रू जाईल, या भीतीने कित्येक जण आपल्याच मुलीचं तोंड बंद करतात…
स्त्रियांना अगदी घरापासून मिळणारी ही सापत्नभावाची वागणूक… समाजात मिळणारा दुय्यम दर्जा… धर्माचं नाकारलेपण… या सगळ्याच बाबींचा परिणाम आजच्या स्त्रीला भोगावा लागत आहे.
घरामध्ये बाप आपल्या आईला कसा बोलतो, आपल्या बहिणीला कशी दुय्यम वागणूक देतो... आजी-आजोबांचा मुलीकडं पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, या व अशा अनेक बाबी घरातला तो भाऊ पाहात असतो. भविष्यात जेव्हा त्याच्या हातात कुटुंबाची सत्ता येते, त्या वेळी तोही त्या सगळ्या बाबी राबवण्यात खानदानाची परंपरा आहे, असं म्हणून अभिमान बाळगतो. साधं दोन वेळचं पौष्टिक अन्न जर घरात मुलीला मिळत नसेल, तर भविष्यात तिला इज्जत काय मिळणार, हे आपण मन संवेदनशील ठेवून समजून घेतलंच पाहिजे!

sachingtayade@gmail.com