आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadanand Shahi Article About Varanasi, Divya Marathi

वाराणसी एक्स्प्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात की, ही दुनिया शेषनागाच्या फण्यावर टिकून आहे, पण बनारस (आताची वाराणसी) मात्र शंकराच्या त्रिशूलावर टिकून आहे. म्हणजेच, बनारस सगळ्या दुनियेपासून वेगळं आहे. प्रारंभापासूनच स्वतंत्र अस्तित्व जपणारी बनारस ही भोलेनाथाची नगरी आहे. कधी कधी तर मला असंही वाटतं की, कैलासपती शंकराच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेले सगळे अंतर्विरोध बनारसच्या प्रकृतीतही वास करून आहेत. एरवी, चंद्राची शीतलता आणि विषाचे हलाहल पचवून नशिबी आलेला दाह सहन करूनही स्वत:त मग्न आहे बनारस. इथल्या हवेत भोलेनाथाच्या भांगेचा अंमल आहे. या हवेचा अनुभव घेणारे किंवा न घेणारेसुद्धा जगाची पर्वा न करता स्वत:च्या मस्तीत जगणारे मस्तमौला आहेत. गंमत म्हणजे, या मस्तीतही नवचेतनेचा तिसरा नेत्र कायम उघडा राहिला आहे, अगदी शंकराच्या त्रिनेत्रासारखा!

भारताचं धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैविध्य बनारसइतकं क्वचितच दुसर्‍या शहरानं जपलं आहे. गौतम बुद्ध आपला पहिला उपदेश देण्यासाठी बनारसमध्येच आले होते. बुद्धाला पहिले शिष्यही इथेच लाभले. जैन धर्मातल्या चोवीस तीर्थंकरांपैकी चार इथेच झाले. बुद्धाप्रमाणेच महावीरांनाही आपला मार्ग अनुसरणारे शिष्य बनारसमध्येच मिळाले. शैव आणि शाक्त पंथीयांचे केंद्र असलेल्या बनारसमध्येच वैष्णवपंथीय भक्तिमार्गही विकसित झाला. इतकंच नव्हे, तर कबीर आणि रविदास यांची संतवाणी बनारसच्या कणाकणांत सामावली. रामाचा जन्म भलेही अयोध्येत झाला असेल, पण रामायणाचा पट मांडणारी रामलीला बनारसलाच सुरू झाली आणि पुढे जनामनांत जपली गेली. ज्या बनारसने रामलीलेस व्यासपीठ दिले, त्याच बनारसने अघोरी विद्येचा पुरस्कार करणार्‍या संत किनाराम यांचाही प्रेमानं सांभाळ केला. आस्तिक असो वा नास्तिक, निर्गुण असो वा सगुण, बनारसमध्ये पिढ्यान् पिढ्या अनेक विचारधारा गुण्यागोविंदाने एकत्र नांदत राहिल्या.

संगीत-नृत्य -साहित्य आदी कला बनारसमध्येच रुजल्या. उत्तरोत्तर बहरत गेल्या. किती तरी दशकं काशी विश्वनाथ मंदिराच्या नौबतखान्यातून निघालेले उस्ताद बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या शहनाईचे सूर सार्‍या जगात निनादत राहिले. ऐन भरात असताना खाँसाहेबांना कुणी तरी अमेरिकेला स्थायिक होण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, वहाँ गंगा है? नही है, तो वहाँ क्यों जाए?
सौंदर्य व मांगल्याचं प्रतीक बनलेली बनारसी साडी हिंदू आणि मुसलमानांच्या ज्या ताण्याबाण्यांतून आकारास येते, त्यातही असंच प्रेम आणि अशीच जिव्हाळ्याची आसक्ती झळकत राहिली आहे.

त्रिखंडात पोहोचलेलं खास बनारसी पान याच ताणाबाण्यातून रंग धारण करत आलंय. किंबहुना, ‘ताना-बाना’ हा बनारसच्या जगण्याचा स्थायीभाव बनला आहे. हा शब्द विणकरांच्या रोजच्या जगण्यातून बाहेर पडत कबीराच्या दोह्यांतून बनारसच्या जगण्यात पुरेपूर उतरलाय. हिंदू आणि मुसलमानांचा ऐतिहासिक वारसा बनारसच्या नसानसांत भिनलेला आहे. उदात्त, उन्नत आणि उदार ही बनारसची शतकांपासूनची खरी ओळख बनली आहे. मोक्षप्राप्तीच्या विलक्षण ओढीने देशाच्या प्रत्येक कोपर्‍यातून इथे लोक आले आहेत. इथेच वसले आहेत. त्यातूनच बंगाली, मराठी, गुजराती इतकंच नव्हे तामिळ, कन्नड आणि मल्याळी मोहल्ले इथे आकारास आले. प्रसिद्धीस पावले. खरं तर गंगेच्या अर्धचंद्राकृती किनार्‍यावर वसलेल्या बनारस नगरीने सबंध जगाला आकर्षित केलंय. असं म्हणतात, बनारसच्या सौंदर्याने भाळल्याने श्रेष्ठ शायर मिर्झा गालिब कलकत्त्याला जाताना वाटेत हटकून बनारसमध्ये क्षण-दोन क्षण विसावत असे. चित्तवृत्ती प्रफुल्लित करणार्‍या अशाच एका विसाव्यात गालिबने बनारसला उद्देशून ‘चिराग-ए-दैर’सारखी बावनकशी नज्म चाहत्यांना नजर केली.

संगीत-नृत्यादी कलांचा सांभाळ करणार्‍या बनारसने विद्येचं केंद्र म्हणूनही नावलौकिक राखला आहे. नावाजलेले वैज्ञानिक शांतिस्वरूप भटनागर यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयाचा गौरव करताना बनारसला विद्येची राजधानी म्हणून गौरवलं आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून बनारसमध्ये वेगवेगळ्या विचारधारा प्रवाही राहिल्या आहेत. नव्हे, क्रांतिकारी, समाजवादी तसेच गांधीवादी विचारांची प्रयोगभूमी राहिलंय, बनारस. ज्या वेळी मदनमोहन मालवीय विद्येच्या क्षेत्रात नवा इतिहास रचत होते, त्याच वेळी देशातलं एकमेव असं भारतमातेचं मंदिरही येथे आकारास येत होतं. परंपरा आणि नवतेचा विवेकवादी स्वीकार करण्याची वृत्तीच बनारसला जडत्व येण्यापासून वाचवत आली आहे. हीच वृत्ती बनारसचा जिवंतपणा कायम ठेवत आली आहे. भारत विविध धर्म-पंथ, संस्कृती आणि परंपरांचा देश राहिला आहे. हीच या देशाची सगळ्यात मोठी ठेव आहे. बनारस नि:संशय त्या विविधतेचं प्रतिनिधित्व करत आलं आहे. पण बनारसचा आणखी एक पैलूसुद्धा आहे. हिंदीचे महान लेखक भारतेंदूबाबू हरिश्चंद्र यांनी ‘देखी तुमरी कासी’ नावाच्या पुस्तकात बनारसला खोट्यांची, भुईला भार असलेल्यांची, निर्लज्जांची, टेंभा मिरवणार्‍यांची नगरी संबोधून भरपूर दूषणे दिली आहेत. असं म्हणतात, तुलसीदासांनाही बनारसच्या या पैलूचा परिचय आधीच झाला होता, म्हणून त्यांनी कलियुगाचं जे चित्रण केलं होतं, त्याचा आधारही बनारसच होतं.

एका बाजूला मनोवेधक सृजन आहे, तर दुसर्‍या बाजूला मनोभंग करणारी विघातकता आहे. या दोन प्रवृत्तींच्या संघर्षातून बनारस आकारास येत गेलं आहे. बनारसमध्ये एका बाजूला ढोंगी प्रवृत्तीचा वरचश्मा असेल, तर त्या ढोंगाला उघड क रत सत्याचा जीवतोड आग्रह धरणार्‍यांचाही खास प्रभाव राहिला आहे. मला वाटतं, बनारसमधल्या सत्याचा आग्रह धरणार्‍या वर्गासाठी येती लोकसभा निवडणूक सगळ्यात मोठं आव्हान घेऊन आली आहे. भाजपने नरेंद्र मोदींना बनारसमधून उमेदवारी जाहीर केल्याने बनारस या घडीला देशातला सगळ्यांत हायप्रोफाइल म्हणता येईल, असा मतदारसंघ बनला आहे. मीडिया गुजरातच्या विकासाला वेड्यासारखं लोकांपुढे आणतंय. त्यामुळे सगळीकडे गुजरातच्या विकासाचेच गुणगान होताना दिसतेय. मात्र, या गाण्याचे बोल बरेचसे अस्पष्ट आहेत. तरीही बनारसचा एक वर्ग या गाण्यावर बेभान होऊन नाचताना दिसतोय. बनारससमोर पुन्हा एकदा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचं आव्हान उभं ठाकलंय. हे आव्हान मुख्यत: बनारसचा ताणाबाणा जपण्याचं, म्हणजेच देश जपण्याचं आहे.

दुसर्‍या बाजूला बनारसच्या काही भौतिक गरजा आहेत, ज्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. बनारसचे बहुसंख्य रस्ते खड्ड्यात गेले आहेत. विणकरांची अवस्था दयनीय झालेली आहे. शोषणाच्या बहुस्तरीय चक्रात ते आजही भरडले जाताहेत. कधीही प्रकाशात न येणार्‍या त्यांच्या आत्महत्या आहेत. बघता बघता बनारसची लोकसंख्या चारपट वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असूनही बनारसमध्ये पायाभूत सुविधा नाहीत. शिक्षण संस्थांची प्रतिमा मलिन होताना दिसतेय. शुद्धीकरणाचे कोट्यवधींचे दावे करूनही गंगामैया अजूनही गढुळलेलीच आहे. अपवाद वगळता गेली वीस वर्षे भाजप बनारसचे प्रतिनिधित्व करत आलीय. अयोध्या-मथुरेचं राजकारण करणारा हा पक्ष आता बनारस ताब्यात घेऊ पाहतोय. बनारसमधला एक वर्ग असा आहे, ज्याला दूरवरून तारस्वरांत सांगितली जाणारी विकासगाथा अस्वस्थ करतेय. हा वर्ग तथाकथित विकासगाथेच्या नायकाला याचा जाब विचारण्याच्या तयारीत आहे...
(लेखक बनारस विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक आहेत.)

पुढे वाचा, बनारसी राजकारण....