आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झपूर्झा’ ही एक रसयात्रा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारची सकाळ. वेळ ९.००. ठिकाण- राधाकृष्ण हॉटेल, विलेपार्ले (पूर्व), मुंबई. निमित्त-अनेक विषयांत मुशाफिरी करणारे, ‘झपूर्झा’ या द्विखंडात्मक पुस्तकाचे लेखक अच्युत गोडबोले यांची मुलाखत.

मनात अनेक प्रश्नांचे जाळे विणून अच्युत गोडबोले यांची मुलाखत घ्यायला पोहोचले. थाेडा उशीर झाल्याने त्यांना भेटल्या भेटल्या थेट ‘मुलाखत सुरू करायची का?’ असे विचारले. प्रसन्न चेहर्‍याने बसलेले गोडबोले यांचे यावर उत्तर होते, ‘इथे रस्सम- वडा अप्रतिम मिळतो, आपण आधी तो खाऊ; मग गप्पा तर काय होतीलच.’ वेगवेगळ्या विषयांत रस असणारे गोडबोले हे खाण्याचेही शौकीन आहेत, याचा प्रत्यय मुलाखतीच्या प्रारंभी आला. अच्युत गोडबोले यांची पुस्तके वाचणार्‍या वाचकाला अगदी सहज पडणारा प्रश्न म्हणजे, गणितापासून संगीतापर्यंत आणि व्यवस्थापनापासून विज्ञानापर्यंतच्या तमाम विषयांत गोडबोले यांना आवड ती कशी?

कुटुंबीय, आयआयटीतील आणि इतर मित्र परिवार, पुजारी सर यांच्यामुळे वाचनाचे, संगीताचे संस्कार गोडबोलेंवर होत गेले. पं. कुमार गंधर्व, पं. जसराज अशा संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या बैठकीत आणि मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर अशा प्रतिभावंत साहित्यिकांच्या सहवासात त्यांनी जडणघडणीचा काळ घालवला. या सगळ्या दिग्गजांच्या बैठका त्यांच्या घरीच होत असत. खरं तर पुजारी सरांनी गोडबोले यांना वाचनाची गोडी लावली. जगात जे जे चांगलं आहे, ते समजून घ्यायला, त्यावर प्रेम करायला शिकवले. त्यामुळेच एखादी गोष्ट समजली नाही की, ती समजण्यासाठी ते अतोनात श्रम घेतात, गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजावून घेतात. मग ती सोपी करून इतरांना समजावून सांगणे, हे त्यांना विलक्षण आवडते. ‘मनात’ या पुस्तकात मानसशास्त्राचा इतिहास आणि सगळ्या थिअरीज आहेत. आणि ‘अर्थात’मध्ये अर्थशास्त्राचा आजवरचा इितहास आणि सिद्धांत.

दुसरा प्रश्न मनात येतो तो म्हणजे, इतके सगळे विषय लोकांसमोर मांडण्यामागे गोडबोलेंची काही उद्दिष्टं आहेत का? विशेषतः ‘झपूर्झा’च्या निर्मितीमागे त्यांची नेमकी काय धारणा आहे?
गोडबोले म्हणतात, आजकाल अनेक लोकांचे कुतूहल मेलेले आहे. याला अवजड आणि अवघड पुस्तके मुख्यत: कारणीभूत आहेत. इतरांचे कुतूहल वाढावे म्हणून ती गोष्ट सोपी करून सांगतात, जेणेकरून इतरांमध्ये विविध विषयांच्या वाचनाची, लेखनाची आवड निर्माण व्हावी. वाचकांनी एका नव्या दृष्टिकोनातून अनेक विषयांकडे पाहावे. त्यातून आनंद आणि ज्ञान मिळावे, असा हा ‘झपूर्झा’ निर्मितीमागचा त्यांचा हेतू आहे.

‘झपूर्झा’ लिहिताना इंग्रजी साहित्याकडे आणि साहित्यिकांकडे लोकांचा ओढा वाढावा, ही त्यांची प्राथमिक अपेक्षा होतीच. साहित्य क्षेत्रातील चळवळी, त्यांचा इतिहास, त्यांच्याभोवती असलेली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, याची वाचकांना जाण असावी, हेसुद्धा ‘झपूर्झा’ची निर्मिती करताना गोडबोलेंचे उद्दिष्ट होते. पुस्तकासाठी त्यांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करणार्‍या, जीवनात अनेक चढउतारांना तोंड देणार्‍या दिग्गज साहित्यिकांची निवड केली. ‘झपूर्झा’चा पहिला खंड लिहून झाल्यानंतर अजून काही साहित्यिकांविषयी लिहावे, असे गोडबोले यांच्या मनात होते. म्हणून त्यांनी दुसरा खंड काढायचे ठरवले, ज्यात नीलांबरी जोशी या त्यांच्या साहित्य आस्वादक सहलेखिकेने त्यांना मोलाचे सहकार्य केले. पहिल्या खंडात १२, तर दुसर्‍या खंडात १७ साहित्यिकांची माहिती आहे. ‘झपूर्झा’चे आणखी चार खंडसुद्धा लवकरच वाचकांच्या हातात येणार आहेत.

‘झपूर्झा’मध्ये साहित्यिकांची किंवा साहित्याची समीक्षा केली आहे का? यावर गोडबोलेंचे म्हणणे असे की, ‘झपूर्झा’ ही इंग्रजी साहित्यिकांच्या आयुष्याची आणि त्यांनी निर्माण केलेल्या सृजनशील साहित्याची एक रसयात्रा आहे. झपूर्झा त्या अर्थाने समीक्षा नाही. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा लेखणी घेऊन पुढे सरसावलेल्या ग्रेट लोकांच्या या रसाळ गोष्टी आहेत. गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांनी त्यांना हे साहित्यिक जसे भासले तसे ते आपल्यासमोर मांडले आहेत. टी. एस. इलियटच्या ‘वेस्ट लँड’मधल्या कविता कळत नाहीत किंवा जेम्स जॉईसच्या ‘युलिसिस’मधली काही वाक्येही कळत नाहीत, हे गोडबोले प्रामाणिकपणे मान्य करतात. पण पुढे ते असेही सांगतात की, पण टी. एस. इलियट काय त्रासातून गेला आणि त्याने कशा प्रकारे साहित्यिक निर्मिती केली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. किंवा टेनिसन काय माणूस होता आणि त्याची लेखनाची प्रेरणा काय होती, हे जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. या सगळ्यांतून आपल्याला प्रेरणा मिळत जाते.

गोडबोले यांना काफ्का, चार्ल्स डिकन्स आणि डोस्टोवस्की हे लेखक अतिशय आवडतात. काफ्काची मेटामॉर्फोसिस, डोस्टोव्हस्कीची ‘क्राइम अँड पनिशमेंट’ या त्यांच्या आवडत्या कादंबर्‍या आहेत. याशिवाय हेमिंग्वेची ‘ओल्ड मॅन अँड द सी’, अल्बर्ट कामुची ‘आउटसाइडर’, जॉन स्टाइनबेकची ‘ग्रेप्स ऑफ रॅथ’ या आणखी काही गोडबोलेंच्या लाडक्या साहित्यकृती आहेत. शिवाय मानसशास्त्रात ऑलिव्हर सॅक्स, व्ही. रामचंद्रन यांचे मानसशास्त्रीय विचार त्यांना भावतात. बर्ट्रांड रसेल हा त्यांचा विशेष आवडता तत्त्वज्ञ आहे.

रसेलला गोडबोले जास्त मानतात, याचे कारण त्याने कायम समानतेचा संदेश दिला. धर्म, शांतता, समानता यांविषयी त्याने खूप काही सांगितले. स्त्री-पुरुष स्वातंत्र्याविषयीही त्याने खूप मूलगामी असे लिहून ठेवले आहे.

जे जे आपणास ठावे ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करून सोडावे सकलजन... याच शुद्ध हेतूने विविध विषय जाणून घेऊन, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आगळा छंद जोपासलेल्या गोडबोले यांना अजूनही अनेक ज्ञानशाखा खुणावत आहेत. त्यांच्या या मुशाफिरीचा आनंद वाचकांनासुद्धा अखंड मिळत राहणार, याविषयी शंका नाही.
sanarajwadkar@gmail.com