आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका तपाचं व्रत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या हातातले चॉकलेटचे रॅपर सहज रस्त्यावर टाकले जाते, चालता चालता पायात आलेला कागदाचा कपटा आपण तसाच पडू देतो. अशा आणि यासारख्याच वातावरणात आपण नेहमी वावरत असतो. पण या सगळ्यापासून वेगळं व्हायचं असेल तर त्यासाठी लागतात ते परिश्रम. आणि असावी लागते निष्ठा. कचरा व्यवस्थापनासारखा विषय असला तर नकोच ते, कोण आपले हात खराब करून घेणार हाच विचार मनात येतो. पण हाच विचार बदलणाऱ्या सुप्रिया आगाशे यांच्याबद्दल.

कचरा व्यवस्थापनात गेल्या १२ वर्षांपासून काम करणाऱ्या नाशिकमधील सुप्रिया आगाशे यांना नुकतेच वसुंधरा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रियाताई सांगतात, ‘शिक्षण घेत असतानाच कचरा व्यवस्थापन हा भविष्यात पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर आिण महत्त्वाचा विषय होऊ शकतो, हे लक्षात आले होते. एकदा सांगलीला मी भावाकडे गांडूळखत तयार करताना पाहिले होते. ते खत सांगलीहून नाशकात माझ्या घरी घेऊन आले. हाच प्रयोग माझ्याही बागेत करण्याचा प्रयत्न केला. पण पहिला प्रयोग पूर्णच फसला. त्या काळी फार कुणाला या कामाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती नव्हती. माझाही नवा अनुभव होता. कचरा गोळा करून त्याचे खत तयार करणे म्हणजे लोकांना सपशेल वेडेपणा वाटायचा. त्यातही ही १२ वर्षांपूर्वीची गोष्ट, तेव्हा तर कचरा व्यवस्थापन हा धक्काच होता.’

सुप्रियाताईंनी मग नव्यानं गांडूळखत निर्मितीचा प्रयोग सुरू केला. फक्त घरातला ओला आणि सुका कचरा, प्लास्टिक वेगळे करून घरातल्या बागेमध्ये खत तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला घरच्यांनाही हा कारभार अजब वाटला. मात्र प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सगळ्यांनीच त्यांच्या प्रयोगाला पाठिंबा दिला. त्यानंतर सुप्रियाताईंच्या कामाचा व्याप वाढत गेला. हळुहळू आजुबाजूच्या दोन घरांमधला कचरा आणून त्यांनी खतनिर्मिती सुरू केली. त्या वेळी त्या एकट्याच या कचऱ्याचे व्यवस्थापन करत होत्या. व्यवस्थापन म्हणजे प्लास्टिक वेगळे करायचे, ओला-सुका कचरा वेगळा करायचा, हा कचरा कुजवून त्यात गांडुळं सोडायची. मातीचे प्रमाण योग्य ठेवायचे। या सगळ्या प्रक्रियेनंतर कचऱ्याचे खत तयार होते. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेळ देण्याची गरज आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे आहे सुप्रियाताईंच्या खतनिर्मितीचे स्वरूप ?