आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटाच्या दारात उभा आहे ‘पँथर’....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय समाजात आजवर एक असा समाज घटक जो कायम वर्णवादी व्यवस्थेमध्ये पिचला गेला होता, त्या सर्वहारा समाजाची घालमेल 1970च्या दशकात साहित्य, चळवळ, राजकारण आणि समाजकारण या माध्यमातून बाहेर यायला लागली. सदाशिव पेठी आणि हिंदू कॉलनी असे शिक्के असलेले अभिजनवर्गाचे साहित्य आता टीकेचे धनी ठरत होते. शृंगारिक साहित्य निर्मितीपेक्षा क्रांतिकारी साहित्य निर्मिती व्हावी आणि आपल्या जाणिवांचा प्रवास जगासमोर यावा, यासाठी नवी पिढी काम करू लागली. वर्णव्यवस्थेच्या जुलमी जाचातून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सोडविण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला मूठमाती दिली जात असल्याची भावना 1970च्या काळात आंबेडकरी तरुणांच्या मनात रुंजी घालू लागली. आणि ‘अ‍ॅक्शन को रिअ‍ॅक्शन दो’ म्हणत अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धर्तीवर दलित पँथर ही सशस्त्र संघटना 1972मध्ये सुरू केली. आणि या संघटनेचा मुख्य म्होरक्या होते ‘पद्मश्री नामदेव ढसाळ’!
नामदेव ढसाळ हे एक कवी म्हणून, राजकारणी म्हणून, कार्यकर्ता म्हणून आणि सामाजिक विश्लेषक म्हणून सगळ्या भारताला माहीत आहेत. त्यांच्या कवितेचा लहेजा आजही अनेक क्रांतिकारी विचारांच्या तरुणांवर अधिराज्य गाजवतो आहे. त्यांच्या कवितेतून प्रसवणारी वेदना कधी शिव्यांच्या माध्यमातून तर कधी जडत्वाच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भारदस्त शब्दातून वाहात असते. अस्पृश्य समाजात जन्माला आलेले नामदेव ढसाळ नंतर इतके विद्रोही कसे होतात, या प्रश्नाची उकल करताना थक्क होऊन जायला होतं. खाटकाच्या हाताखाली काम करणारा बाप, समाजव्यवस्थेचा भार डोक्यावर वाहणारी आई, आणि आजूबाजूला जातीयतेचे बिकट सावट, अशा सगळ्या परिस्थितीतून ढसाळ घडत होते. हा सगळा जाणिवांचा प्रवास मग ‘गोलपिठा’ या काव्यसंग्रहातून बाहेर व्यक्त झाला. गोलपिठाच्या वेश्यावस्तीत शरीरविक्री करणारी बाई त्यांना आपली आई-बहीण वाटू लागली, ज्या आया बहिणी पोटापाण्यासाठी आपली शरीरं विकतात त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण उभं राहावं हे फक्त ढसाळ यांनाच सुचलं. आणि ते ख-या अर्थाने पीडितांच्या मोर्च्याचं नेतृत्व करणारा सेनापती झाले... एक कार्यकर्ता म्हणून नामदेव ढसाळ वेगळेच वाटतात. सगळं आयुष्य समष्टीसाठी वाहून देण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळेच तर आयुष्याच्या शेवटी स्वत:जवळ स्वत:ची तजवीज काहीच नसते. अमानुषीकारणाविरोधात पहिला ‘ब्र’ उच्चारण्याची ऊर्मी याच माणसाने आणली. हाच माणूस मग सूर्याच्या रथाचे सात घोडे मारण्यासाठीसुद्धा मागे-पुढे पाहू लागला नाही, त्याच्या गाठी हे शृंगारिक जग गांडू बगीचा आहे. त्यांच्या लिखाणाने सारस्वतांच्या मेळ्यात धरणीकंप माजला. काहींनी ‘ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झाला आहे’ अशी निर्भर्त्सना केली, तर काहींनी त्यांना ‘पोएट ऑफ अंडरवर्ड’ अशी उपाधीही दिली.
अशा सगळ्या कमालीच्या वातावरणातून घडलेला हा पँथर सध्या संकटाच्या दारात उभा आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ते मायस्थेनिया ग्रेव्हिस या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी त्यांना पोटाचा त्रास होऊ लागला आणि त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. नामदेव ढसाळ हे कॅन्सरच्या विकाराने आजारी असून आयुष्यभर परिस्थितीशी लढणारा योद्धा आज दुर्धर अशा आजाराशी लढतो आहे. सगळ्या गोष्टींची सोंगे आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. सामान्य माणसासारखा विचार कधी ढसाळसरांनी केलाच नाही. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पैसे साठवावे आणि मस्तपैकी आयुष्याची संध्याकाळ मौजमजेत घालवावी, असं त्यांना वाटण्याचं कारणही नाही. काल त्यांनी व्यवस्थेला दिलेल्या शिव्या आज गोड वाटताहेत. त्यांच्या प्रसवणा-या वेदना आता कुठे जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे हा अवलिया चळवळीसाठी किती महत्त्वाचा आहे, हे कळते. आज आंबेडकरी तरुणांसमोर नीट, पारदर्शी नेतृत्व नाही. समाजाची झालेली सामाजिक आणि राजकीय ससेहोलपट सगळेच जाणतात, त्यातल्या त्यात कधी धर्मांध शक्तींबरोबर गेल्याची ओरड ढसाळांवर झाली, तर कधी भारतीय समाजरचनेपेक्षा पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण असल्याचं बोललं गेलं. पण या सगळ्या टीकेत ढसाळसर स्थितप्रज्ञ होते. त्यांना माहीत होतं की आंतरराष्टÑीय पातळीवर जेव्हा हे सर्वहारा समाजाचे मुद्दे चर्चिले जातील, तेव्हा त्याचा होणारा परिणाम वेगळा असेल. असा दूरदृष्टी असलेला नेता लाभणे आजच्या काळात तर दुर्मीळच!
‘मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो,
इव्हन मी आई-बापाला शिव्या देतो, बांबलीच्यांनो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात, आता आम्हालाही जन्म देऊन बरबाद केलंत.’
अशी भळभळ व्यक्त करणारा कवी आपली मनाची घालमेल व्यक्त करतो, चाकोरीच्या आतलं जिणं त्याला नको वाटतं. अक्राळ-विक्राळ भांडण त्याला आवडतं. सृजनाचा एल्गार त्याला काही अंशी पटतो; पण त्याचबरोबर दांभिकतेवर तोंडसुख घ्यायलाही त्याला तितकाच आनंद होतो. असा अष्टपैलू कवी, सजग कार्यकर्ता आणि डोंगराएवढा तत्त्वचिंतक आज खाटेला खिळलेला पाहावा लागत आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून कित्येक कार्यकर्ते धावपळ करताहेत, त्यांची बायको म्हणजे शाहीर अमर शेखांची मुलगी प्रख्यात कवयित्री मल्लिका अमर शेख त्यांच्या प्रकृतीवर रात्रंदिवस नजर ठेवून आहेत. नामदेव ढसाळांच्या प्रत्येक कार्यात खांद्याला खांदा लावून चालणारी ही महिला पत्नी म्हणून आज ढसाळसरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. बॉम्बे रुग्णालयात त्यांना भेटायला येणा-या त्यांच्या चाहत्यांची रीघ थांबता थांबत नाहीये. त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी भरपूर असली तरी आजपर्यंत कुणासमोर हात न पसरणारे ढसाळ परिवाराचे हात सध्या आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहेत. ज्या सरकारला आपल्या उभ्या आयुष्यात शिव्यांच्या पन्हाळ्याखाली उभं केलं, त्या महाराष्टÑ सरकारनेदेखील या योद्ध्याची अगतिकता समजून घेऊन त्यांना 7 लाखांची मदत जाहीर केली आहे, सिद्धीविनायक ट्रस्टनेदेखील 2 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, असा प्रत्यय सध्या येतो आहे.ढसाळसरांसारखा निडर योद्धा आपल्याला हवा आहे. त्यांच्या विचारांचा, आचारांचा आणि समजुतीचा वारसा संपूर्ण देशाला हवा आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो आणि संकटाच्या दारात उभा असलेला हा ‘पँथर’ लवकरच मार्गदर्शक म्हणून आजच्या तरुण पिढीला लाभावा, अशी इच्छा.