आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचा समलिंगी संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संसार कशाला म्हणायचा? आणि तो स्त्री-पुरुषाने एकत्र येण्यानेच पूर्णत्वाला जातो, असं तरी का समजायचं? दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया मन, भावना, आचार-विचार, संस्कृती-परंपरा, परस्परांबद्दलचा आदर-सन्मान या आधारे एकत्र आल्या तर त्याला संसार नाही म्हणायचं का? शरीरापलीकडे या जगात बरंच काही असतं, यावर आम्हा दोघांचाही विश्वास आहे. आम्हाला आमचा समलिंगी संसार प्रिय आहे…
कोलंबस-इंडियाना, इथे रीतसर महाराष्ट्रीय पद्धतीने सप्तपदी घालून, मंगलाष्टकांच्या गजरात आमचं लग्न झालं. पाच वर्षांपूर्वीची ही घटना. अत्यंत साधा पण संस्मरणीय असा तो क्षण होता. आम्ही दोघांनीही छान कुर्ता-शेरवानी घातली होती. माझी बहीण, तिचा नवरा, आमचे ऑफिसमधले काही सहकारी आणि मित्र-मैत्रिणी असे मिळून ५०-६० लोक लग्नसमारंभाला हजर होते. मी आणि अमित दोघेही सर्वसाधारण महाराष्ट्रीय कुटुंबातून आलेलो. त्यामुळे आधी एकमेकांवरचे प्रेम आणि जिव्हाळा जाहीर करणे, मग जाहीरपणे आपल्या संबंधांची वाच्यता करणे या सगळ्या गोष्टींना बराच कालावधी जावा लागला. हे म्हटलं तर अवघडच होतं. कारण, मला मुलगी नव्हे मुलगा आवडतो आणि त्याच्यासोबतच संसार करायचा आहे, हे कुटुंबीयांना पटवून देणं, हे आमच्यापुढचं मोठंच आव्हान होतं. माझ्या मनात पहिल्यापासूनच हा विचार स्पष्ट होता की, मला मुलासोबतच संसार करायचा आहे. केवळ समाज म्हणतो म्हणून एखाद्या मुलीबरोबर संसार थाटायचा आणि तिचं आयुष्य बरबाद करायचं, हे मला क्रूर वाटत होतं.
शेवटी, माझ्या काय किंवा अमितच्या कुटुंबीयांनी आमच्या संबंधांना होकार देण्यास, आमच्या लैंगिकतेस मान्यता देण्यास बराच अवधी घेतला. मला वाटतं, इतरांच्याही बाबतीत हे तितकंच खरं आहे. कारण समलैंगिकता, समलिंगींच्या आवडी-निवडी हे समजून घेण्यास खूप मोठा कालावधी जावा लागणार आहे. मला खरं तर इतकं आश्चर्य वाटतं, की ज्या देशात ‘कामसूत्र’सारखा ग्रंथ जन्माला आला, त्या देशातच लैंगिकतेबाबत असहिष्णुता कायम आहे.
अमित आणि मी गेली १३ वर्षे एकत्र आहोत. ऑनलाइन गप्पा मारण्यातून आमची ओळख झाली आणि पुढे फोन आणि व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून आमच्यात प्रेम फुलत गेलं. लोक जेव्हा समलिंगी संबंधांचा विचार करतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात केवळ शारीरिक संबंधांचाच विचार येतो. परंतु शरीराच्याही पलीकडे भावनिक बंध, एकमेकांबद्दलचा आदर, एकमेकांना स्पेस देण्याची प्रगल्भता अशा अनेक अनेक गोष्टी या नात्यात असतात. मी आणि अमित एकमेकांकडे अशा व्यापक परिघात बघत असतो. मला वाटतं, याच गोष्टी समलिंगीच कशाला, इतर कोणत्याही प्रकारच्या नात्याला परिपूर्णताही देत असतात.
आम्ही दोघेही अमेरिकेत राहात आहोत. आमचं दोघांचंही आयुष्य त्या अर्थाने बऱ्यापैकी साधं आणि तणावरहित आहे. सामाजिक-कौटुंबिक-कायदेविषयक असे कोणतेही दबाव आमच्यावर नाहीत. किंबहुना, अमेरिकी कायद्याने आणि समाजाने आमच्या लग्नसंबंधांना आनंदाने मान्यता दिलेली आहे. ऑफिसात आमच्या सहकाऱ्यांना आमच्या संबंधांची पूर्ण माहिती आहे. त्या बाबतीत आम्ही पारदर्शकता ठेवल्याने एकमेकांवरचा विश्वास दृढ होत गेला आहे. आमच्यावर विश्वास ठेवण्यात आमचे भारतीय मित्र-मैत्रिणीदेखील आघाडीवर आहेत. हे सगळेच आमच्याकडे माणूस या नजरेने पाहताहेत, हेच आमच्या दृष्टीने कितीतरी समाधान देणारं आहे. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या बहुसंख्य अनिवासी भारतीयांसाठी हे सगळं अजूनही अब्रह्मण्यम प्रकारात मोडणारं आहे. त्यांचा माइंडसेट बदललेला नाही.

एरवी, जोडपं म्हणून आम्ही इतरांपासून जराही वेगळे नाही. इतरांसारखंच आम्ही भांडतो, रडतो, एकमेकांवर प्रेम करतो, प्रसंगी खचतो, घाबरतो, दुखावतो, आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी करतो. इतरांप्रमाणेच आम्ही करदेखील भरतो. त्यात सूट नाही किंवा अधिकचा दंडही नाही. अनेकदा लोक मला विचारतात, समाजाकडून तुमच्या अपेक्षा काय? मी एवढंच म्हणतो, अपेक्षा एवढीच की, होमोसेक्शुअॅलिटी ही हेटेरोसेक्शुअॅलिटीइतकीच नैसर्गिक आहे, हे या समाजाने समजून घ्यावं. आम्ही संख्येने कमी आहोत, याचा अर्थ आम्ही चुकीचे आहोत, असा नाही.
एक भारतीय म्हणून आणि एक पुरोगामी राज्याचा वारसा सांगणारे महाराष्ट्रीय म्हणून आपली ख्याती आहे. आपण आजवर सर्व प्रकारच्या विचारांचा, आचारांचा आदरसन्मान केला आहे. अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण, कुटुंब नियोजन आदीबाबत महाराष्ट्रात क्रांतिकारक कार्य आजवर झालेले आहे.

असा प्रगल्भ वारसा सोबत असताना माझी अशी प्रामाणिक अपेक्षा आणि इच्छा आहे की, आपल्या समाजाने इतरांनी आयुष्य जगण्यासाठी निवडलेल्या पर्यायांचा आदर करावा, आणि त्यांना त्यांच्या अटींवर समाधानाने आयुष्य जगू द्यावे. एवढं साधलं तरीही आपण माणूसपणाचा खराखुरा सन्मान केल्यासारखं होईल…