आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर फॅमिली 'फॅलिली' नहीं होती... (साहिल कल्लोळी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मोठ्या पार्किंग लॉटमध्ये दोन तरुण चर्चा करत आहेत. साधारण चर्चेचा सूर त्यांच्या चांगल्या भविष्याबद्दलचा आहे. ती पार्किंगची जागा विकत घेणे हे कसे फायद्याचे आहे, असे एक तरुण दुसऱ्या तरुणाला सांगत आहे. ज्याला ती घ्यायची आहे, त्याला त्याचे कॅल्क्युलेटेड उज्ज्वल भविष्य दिसते आहे. प्राथमिक बोलणे होते आणि निघताना पहिला तरुण म्हणतो की, तीन लाख रु. तयार ठेव आणि विकत घेणारा तरुण आधी ठरल्यापेक्षा जास्तीचे तीस हजार कसे आणि कुठून जमवायचे, याचा विचार करू लागतो. त्यानंतर त्याचा चेहरा हा प्रश्नांकित निस्तेज डोळ्यांचा होऊन जातो. इथून सुरुवात होते एका अस्वस्थ आणि जिवाची घालमेल करणाऱ्या प्रवासाची.
कुटुंब हे नेहमीच गोड-गोंडस डायबेटीस होऊन मरेपर्यंत फक्त प्रेमच करणारे वगैरे असते, अशी खुळचट मांडणी आजवर करण जोहर, सूरज बडजात्या यांसारख्या दिग्दर्शकांनी केली. ‘तितली’ ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. असे कुटुंब आजपर्यंत भारतीय चित्रपटात मांडण्याचे धाडस कुणी केलेले नाही. विक्रम (रणवीर शौरी) हा सर्वात मोठा भाऊ, बावला (अमित सियाल) मधला भाऊ, आणि तितली (शशांक अरोरा) धाकटा भाऊ; तसेच त्यांचा बाप (ललित बहल) आणि धाकट्या मुलाची बायको निलू (शिवानी रघुवंशी) अशा व्यक्तिरेखा. दिवसभर काहीतरी किरकोळ काम करणाऱ्या भावंडांचा दुसरा धंदा असतो, दिल्लीच्या निर्मनुष्य भागात गाड्या लुटण्याचा. हा त्यांचा पिढीजात धंदा. बापाला त्याच्या बापाने शिकवला आणि बापाने त्याच्या पोरांना. पण कोंडी अशी आहे की, प्रत्येकाला या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे. चांगलं जगायचंय. दोन पिढ्यांना ते जमलेलं नाहीये, कोणाला यापुढे ते जमेल असंही वाटत नाहीये. कुटुंबातील सर्वात तरुण असणारा तितली हा एकटा काहीतरी वेगळा विचार करणारा आहे. आपल्या कामातूनच निर्माण होणाऱ्या उत्पादनाशी कोणतेही जैविक नाते तयार होऊ शकत नसल्याने या घरात एक मोठी पोकळी निर्माण झालेली दिसते. अशाच एका वाटमारीमध्ये तितली आणि त्याचा भाऊ पोलिसांना सापडतात. तितलीच्या स्वप्नांचा चुराडा होतोच; पण त्याच्या या दलदलीतून एकट्याने बाहेर पडण्याची योजना भावांना कळते आणि मोठा भाऊ विक्रम त्याला प्रचंड मारतो. तितलीला घरी अडकवायचं ठरतं. आपल्या गँगमध्ये ‘लौण्डिया’ नसल्यानं आपण धंद्यात मागे पडत आहोत, असं कुटुंबाचं मत पडतं. ‘अंडरवेअर से लेके कार तक लोग लौण्डिया दिखाके बेचते है।’ असा त्यामागे युक्तिवाद असतो. मुलगा घरी राहावा, त्याने स्वतंत्र विचार करू नये, त्याने कुटुंबाची संपत्ती वाढवावी, कुटुंबाचे भले बघावे, अशी बुरसटलेली मानसिकता या घटनेतून दिसते.
सिनेमा पुढे सरकत जातो. कुटुंबसंस्थेचे पाशवी स्वरूप येत जाते. स्वतःचा अजेंडा घेऊन घरी आलेल्या निलूला पहिल्याच रात्री संघर्षाची जाणीव होते. नंतर कुटुंबाच्या धंद्याची माहिती होते व तिला या घरातून बाहेर पडावेसे वाटते. आपल्या जुन्या प्रियकराशी नवऱ्याची भेट करून देते. नवऱ्याबरोबर करार करून त्या घरात राहते. तितली हा स्वार्थी आहे, त्याला फायदा कळतो. त्याला घरातल्या बाकीच्यांविषयी कसलंही प्रेम नाही. त्याला अनुभवणाऱ्या घुसमटीतून मोकळा श्वास हवा आहे. त्याला झोपेत स्वप्नेदेखील जिन्यावरून पळण्याची दिसतात. जिन्यावरून पळत जाताना प्रत्येक मजल्यावर पडणारा फोटो आणि रक्त हे त्याच्या आयुष्यातील तोचतोपणा दाखवत जाते. तो जितका वेगाने पळतोय, तितक्या वेगाने त्याला आत खेचलं जातंय. ज्याला यातून बाहेर पडायचे आहे त्याला बाहेरून विरोध तर आहेच, पण आतून असणारा विरोध तितकाच प्रचंड आहे. ‘गॉडफादर’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अल पचिनोचा एक संवाद आहे. तो म्हणतो, “ज्या वेळी मला असं वाटतं की, मी यातून बाहेर पडलोय, तेव्हा ते मला पुन्हा आत खेचून घेतात.” (They Pull Me Back In) इथेही परिस्थिती तीच आहे. तितली अखेर त्यातून बाहेर पडतो. आणि सगळ्यांकडून फसवल्या गेलेल्या निलूकडे परत जातो.
प्रेम ही एकमेव जगण्याची आशा आहे, हे चिरंतन सत्य त्याला गवसतं.
हा चित्रपट एका उद्ध्वस्त कुटुंबाचं चित्र मांडताना अस्ताव्यस्त, कसेही, कुठूनही फुगलेल्या दिल्ली शहराचेही विदारक चित्र मांडतो. दिल्ली हे या चित्रपटातले अव्यक्त पात्रच आहे. दिल्लीतील रिअल इस्टेट उद्योग, गुन्हेगारी व त्या परिघात सामान्य माणसाचं जगणं हा चित्रपट जसेच्या तसे उभे करतो. रोजगाराच्या निमित्ताने विस्थापित होणारे लोकांचे लोंढे, विकासाच्या नावाखाली समाजाची होणारी पिळवणूक, समाजात कोणताच आवाज नसलेली हजारो कुटुंबे यांचे कोरडे चित्रण िदसून येते. प्रचंड कोरडेपणा हे दिल्लीचे दुसरे रूप आहे, असे वाटून जाते. हा कोरडेपणा अचूक चित्रित केला आहे. दिल्लीमधली आर्थिक-सामाजिक विषमता दाखवताना दिग्दर्शक कोणाचीही बाजू घेत नाही. सडलेला उच्च वर्ग, नोकरशाही जशी आहे तशी दाखवली जाते. आयुष्याची दिशा हरवलेले तितलीसारखे युवक दिसतात. सिनेमाचं नाव ‘तितली’च का? ‘तितली’ हे शोषणात अडकलेल्या जाती आणि वर्गाचं प्रातिनिधिक रूप आहे. या वर्गाला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास हवा आहे. त्यांची जगण्याची धडपड आहे. आकांत आहे. ते मनातून प्रामाणिक आहेत; पण जगण्याची एवढी सक्ती आहे की, ते अप्रामाणिक होत जातात. कोणी एक शहाणा नाही किंवा कोणी मूर्ख नाही, कोणी एक नैतिक नाही आणि कोणीही अनैतिक नाही तरीही आपण सर्व असे आहोत, याची जाणीव हा चित्रपट करून देतो.
- साहिल कल्लोळी
sahilkalloli@gmail.com
बातम्या आणखी आहेत...